गेल्या वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत भारताच्या निव्वळ कर महसुलात ६५ टक्के वाढ झाली होती. सोमवारी संसदेत मांडण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षणाच्या आकडेवारीत हे नमूद करण्यात आले आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत वैयक्तिक आयकर संकलन ४७.२ टक्क्यांनी वाढले आहे. त्याच वेळी, एप्रिल ते नोव्हेंबर २०२० च्या तुलनेत २०२१ च्या एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान कॉर्पोरेट इन्कम टॅक्समध्ये ९०.४ टक्के वाढ झाली आहे. २०१९ च्या तुलनेत एप्रिल-नोव्हेंबरमध्ये त्यात २२.५ टक्क्यांनी वाढ झाली होती.
सरकारच्या उत्पन्नाचा स्रोत
सरकारच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कर आणि करेत्तर महसूल (नॉन टॅक्स रेव्हेन्यू) आहे. सरकार प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष करांच्या माध्यमातून उत्पन्न मिळवते. प्रत्यक्ष करात आयकर, स्थावर मालमत्ता कर, वैयक्तिक मालमत्ता कर किंवा मालमत्तेवरील कर यांचा समावेश होतो. दुसरीकडे, जीएसटी, कस्टम ड्युटी आणि टॅक्स अॅट सोर्स (टीडीएस) अप्रत्यक्ष करांतर्गत येतात.
गेल्या आर्थिक वर्षात अशी कमाई
२०२०-२१ या आर्थिक वर्षात, सरकारने वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) स्वरूपात २८.५ टक्क्यांची कमाई केली. त्याच वेळी, कॉर्पोरेट टॅक्सद्वारे २८.१ टक्के आणि वैयक्तिक आयकराद्वारे २८.३ टक्के कमाई झाली.
आर्थिक सर्वेक्षणात काय म्हटले?
कॉर्पोरेट कंपन्यांचा नफा वाढणे, अर्थव्यवस्था सुव्यवस्थित करणे आणि कर सुधारणांमुळे अधिक अनुपालन यामुळे सरकारच्या कॉर्पोरेट कर संकलनात वाढ झाली आहे. यासोबतच सरकारने जीएसटीबाबत उचललेल्या पावलांचा परिणाम सरकारच्या कमाईच्या आकड्यांवर झाला आहे.
त्याच वेळी, कराव्यतिरिक्त इतर स्त्रोतांकडून आवर्ती उत्पन्न आहे. या उत्पन्नामध्ये व्याज आणि लाभांश आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे उत्पन्न यांचा समावेश होतो. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) सह अप्रत्यक्ष कर संकलनाचे संपूर्ण स्वरूप बदलले आहे.
दरम्यान, दोन वर्षांतील करोनाच्या अडथळ्यातून अर्थव्यवस्था बाहेर पडली असून आता करोनाच्या आगामी संभाव्य लाटेचा पहिल्या दोन लाटांइतका तीव्र फटका बसणार नाही, अशी आशा अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. जागतिक बँक आणि आशियाई विकास बँकेनेही २०२२-२३ मधील देशाचा वास्तव विकासदर अनुक्रमे ८.७ टक्के व ७.५ टक्के राहू शकेल, असा अंदाज बांधला आहे. आगामी आर्थिक वर्षांत देशाचा विकास दर ७.१ टक्के तर, चालू आर्थिक वर्षांत आर्थिक वृद्धीदर ९ टक्के राहील, असे भाकित आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने केले आहे.