रसिका मुळ्ये

स्क्रीनसमोर बसून बाराखडी, पाढ्यांची उजळणी करणारी मुले ते पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा देणारे विद्यार्थी ही दृश्ये गेली दोन वर्षे सरावाची झाली होती. छंदापासून ते संगणक कोडींगपर्यंत आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांपर्यंत सर्वकाही ऑनलाईन, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुरवणाऱ्या कंपन्यांमुळे शिक्षण पद्धती पूर्णपणे बदलणार असल्याची चर्चा गल्लोगल्ली रंगली. शाळा हवीच कशाला असे प्रश्नही चघळले गेले. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव ओसरू लागल्यानंतर हे चित्र आता बदलत असल्याचे दिसत आहे. तंत्रज्ञानाधारित अध्ययन-अध्यापन प्रणाली पुरवणाऱ्या कंपन्यांच्या (एज्युटेक) जागतिक बाजारपेठेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतातही या कंपन्यांमधून शेकडो कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यास सुरूवात केली आहे. वेदांतू या आघाडीच्या कंपनीने नुकतेच दुसऱ्यांदा शेकडो कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे.

एज्युटेक क्षेत्रात भारतीय बाजारपेठेचे स्थान काय ?

करोना साथीच्या काळात विविध क्षेत्रांतील उलाढाल मंदावलेली असताना शिक्षण क्षेत्रातील गरजांनी व्यावसायिकांना आशेचा किरण दाखवला. खरेतर करोनाच्या साथीपूर्वीपासूनच प्रत्यक्ष अध्यापनाला पर्याय म्हणून तंत्रज्ञानाने बाजारपेठेत शिरकाव केला होता. मात्र, शाळा, महाविद्यालये अशा पारंपरिक अध्ययन पर्यायांना समांतर राहून फोफावलेल्या शिकवण्यांच्या बाजारपेठेला पर्याय म्हणून तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली उपलब्ध करून देण्याकडे व्यावसायिकांचा कल होता. करोनाच्या साथीच्या काळात म्हणजेच २०२० आणि २०२१ या कालावधीत शाळा महाविद्यालयांतील वर्गांची जागा ऑनलाइन वर्गांनी घेतली आणि त्याबरोबर शिक्षणाची बाजारपेठ झपाट्याने फोफावली. या बाजारपेठेतील दहा टक्के (३२७) स्टार्टअप कंपन्या या भारतातील असून भारताचा क्रमांक जगात दुसरा आहे. अमेरिकाचा पहिला क्रमांक असून जगातील एकूण कंपन्यांपैकी ४३ टक्के (१३८५) कंपन्या तेथील आहेत. बाजारपेठेचा अभ्यास करणाऱ्या विविध संस्थांच्या अहवालांमध्ये गेल्या पाच वर्षांत भारतात या क्षेत्रात ७५ हजारांहून अधिकांना नोकरीची संधी दिल्याचे नमूद केले आहे.

सद्यस्थिती काय?

काही महिन्यांपूर्वी युनिकॉर्न स्टेटस मिळवणाऱ्या वेदांतू या स्टार्टअपने एक हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात या कंपनीने शेकडो कर्मचाऱ्यांना अलीकडेच घरी बसवले. या कंपनीने सहाशे कर्मचारी, शिक्षक यांना नोकरीवरून काढून टाकले. सध्या जगावर आर्थिक मंदीचे सावट आहे. त्यामुळे भांडवलाची उपलब्धता आणि एकूण आर्थिक उलाढालीवर परिणाम झाला आहे, असे वेदांतूचे सह-संस्थापक वामसी कृष्णा यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये नमूद केले आहे. वेदांतूप्रमाणेच भारतातील आघाडीच्या बायजू, लिडो, अनॲकॅडमी यांसह इतरही छोट्या-मोठ्या कंपन्यांमधील साधारण १४०० कर्मचारी, शिक्षकांची नोकरी गेल्या महिन्या-दोन महिन्यांच्या कालावधीत गेली आहे. यातील अनेक कंपन्यांनी त्यांचे स्वरूप बदलण्यास सुरूवात केली आहे.

या कंपन्यांसमोर आव्हाने काय?

एज्युटेक कंपन्यांनी बाजारपेठेत शिरकाव केला तेव्हापासूनच भारतात या कंपन्यांसमोर आव्हाने आहेत. तंत्रज्ञानाच्या वापराबाबत असलेली अढी करोना काळात काहीशी कमी झाली. मात्र, इतर अनेक आव्हानांवर सक्षम तोडगा निघाल्याचे दिसत नाही. प्रणालीच्या वापरासाठी मुळात आवश्यक असलेली इंटरनेटची उपलब्धता अनेक भागांत नाही. इतर आवश्यक पायाभूत सुविधांचाही अभाव आहे. त्यामुळे या व्यावसायिकांना त्यांचे संभाव्य ग्राहक (विद्यार्थी-पालक) मोठ्या प्रमाणावर दिसत असले तरी ते प्रत्यक्षात वापरकर्ते होऊ शकले नाहीत. तंत्रज्ञानकुशल शिक्षकांचे प्रमाणही मर्यादित आहे. भारतातील बहुभाषकता, अभ्यासक्रमांतील वैविध्य, पारंपरिक शिक्षण पद्धतीची वर्षानुवर्षे घट्ट झालेली चौकट याबाबीही काही प्रमाणात या कंपन्यांसाठी आव्हानात्मक ठरत असल्याचे दिसते.

करोनाची साथ ओसरू लागल्यावर काय झाले?

करोनाची साथ ओसरू लागल्यावर शाळा, महाविद्यालयांमधून प्रत्यक्ष अध्यापन सुरू झाले. त्यानंतर ऑनलाईन अध्यापन प्रणालींकडे वळलेला मोठा वर्ग त्यापासून पुन्हा दुरावला. शाळांनीही पुन्हा पारंपरिक अध्यापन प्रणाली आणि ऑनलाइन प्रणालीतून समोर आलेल्या काही चांगल्या गोष्टी एकत्रितपणे अंमलात आणण्यास सुरूवात केली. करोनाची साथ कमी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा प्रत्यक्ष अभ्यास साहित्य उपलब्ध होण्यास सुरूवात झाली. करोना काळात अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागले. त्यात नेहमीच्या खर्चात भर पडलेला इंटरनेट आदी विविध प्रणालींच्या शुल्काचा खर्च परवडेनासा झाला.

प्रत्यक्ष अध्यापनाला पर्याय नाही?

गेली दोन वर्षे प्रत्यक्ष शाळा, महाविद्यालये बंद असल्यामुळे अध्ययन आणि अध्यापनासाठी तंत्रज्ञानावर आधारित प्रणालींचा वापर वाढला असला तरी प्रत्यक्ष शिक्षकांसमोर बसून शिकण्यासाठी या प्रणाली शंभर टक्के पर्याय असू शकत नाहीत हे देखील प्रकर्षाने दिसून आले. ऑनलाइन शिक्षणात शिक्षक-विद्यार्थी संवादाचा अभाव असल्याची टीका सार्वत्रिक झाली. विषय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्याचा सर्वांगिण विकास, मानसिक आरोग्य या सर्वांतील शिक्षकांच्या भूमिकेची उणीव ऑनलाइन शिक्षणात मोठ्या प्रमाणावर भासू लागली. त्याचबरोबर ऑनलाइन शिक्षण प्रणालीत मूल्यांकनाच्या सक्षम पद्धती नसल्याचेही आक्षेप घेण्यात आले. आता अनेक एज्युटेक कंपन्यांनी प्रत्यक्ष अध्यापन वर्ग सुरू करण्याकडे मोर्चा वळवल्याचे दिसत आहे.

Story img Loader