हृषिकेश देशपांडे
एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकवत भाजपच्या साह्याने महाविकास आघाडी सरकार पाडले. दोन वर्षांपूर्वी काँग्रेसचे मध्य प्रदेशातील ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंड करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. शिंदे यांनी कमळ हाती घेताच त्यांच्या २० ते २२ समर्थक आमदारांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे मध्य प्रदेशातील कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार गडगडले. या दोन शिंदेंच्या नाराजीने देशातील दोन मोठी राज्ये दोन वर्षांत विरोधकांच्या हातातून निसटली.
या बंडाची कारणे आणि नंतरचे राजकीय चित्र काय आहे?
एकनाथ शिंदे यांनी मूळ शिवसेनेतील ५५ पैकी ४० आमदार फोडत धक्का दिला. त्यातही गुलाबराव पाटील, शंभुराज देसाई, उदय सामंत असे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री त्यांच्या गटात गेले. मूळचे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील असलेल्या एकनाथ शिंदे यांचे ठाणे जिल्हा कार्यक्षेत्र. पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणे, सातत्याने जनतेशी संपर्क यामुळे ठाणे जिल्ह्यात त्यांची मोठी ताकद निर्माण झाली. विधानसभेला सातत्याने निवडून येणाऱ्या शिंदे यांना मुख्यमंत्रीपद खुणावत होते. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर त्या पदाने हुलकावणी दिल्याने ते निराश झाले. त्यातून मग संधीची वाट पहात राहीले. राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीतून बंडाला संधी मिळाली. पक्षात डावलले जात असल्याचा आरोप करत शिंदे आमदारांना राज्याबाहेर घेऊन गेले. पुढे हा खेळ काही दिवस रंगला. नंतर अनपेक्षितपणे मुख्यमंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. अर्थातच केंद्रात असलेल्या सत्तेचा खुबीने वापर करत भाजपने विरोधकांचे एक मोठे राज्य आपल्याला अनुकूल केले. या खेळीमागे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीची गणिते आहेत. शिंद्यांच्या बंडामागे भाजपने मोठी मोठी भूमिका बजावली हे स्पष्ट आहे.
मध्य प्रदेशात आधीच हा खेळ?
मध्य प्रदेशात भाजपची पंधरा वर्षांची सत्ता उलथून काँग्रेस २०१८मध्ये सत्तेत आली होती. विलक्षण चुरशीच्या लढतीत आकड्यांच्या खेळात काँग्रेस थोडी पुढे होती. त्यामुळे भाजप संधीच्या शोधात होता. पुन्हा केंद्रातील सत्ता कामी आली. इथेही ज्योतिरादित्य या शिंदेंचेच बंड भाजपला आपसूक राज्याची सत्ता देऊन गेले. मध्य प्रदेशात कमलनाथ यांच्याकडे धुरा सोपवणे ग्वाल्हेरचे ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासारख्या तुलनेने तरुण नेत्याला रुचले नव्हते. त्यांची अस्वस्थता भाजपने हेरली. थेट त्यांना केंद्रात महत्त्वाचे मंत्रिपद देत त्यांचे २० ते २२ समर्थक आमदार फोडले. त्यामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात आले. पुढे पोटनिवडणुकीत भाजपने यश मिळवत आपली सत्तेवरची मांड घट्ट केली. इथे दुसरे शिंदे भाजपच्या मदतीला आले. थोडे इतिहासात डोकावले तर ज्योतिरादित्य यांच्या आजी राजमाता विजयाराजे शिंदे १९६७ मध्ये काँग्रेसकडून विजयी झाल्या होत्या. मात्र पक्षावर नाराज असल्याने त्यांनी स्वतंत्र पक्षात प्रवेश केला. नंतर जनसंघ आणि पुढे भाजपमधून त्यांनी आपली कारकीर्द घडवली.
बंडानंतर पुढे काय?
मध्य प्रदेशातील ज्योतिरादित्य भाजपमध्ये केंद्रात महत्त्वाच्या पदांवर आहेत. भाजप श्रेष्ठींना धक्कातंत्राची आवड आहे. मध्य प्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक अपेक्षित आहेत. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. यातून काही प्रमाणात पुढील राजकीय दिशा स्पष्ट होईल. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची सत्ता आली तर शिवराजमामांना (शिवराजसिंह चौहान) ठेवले जाणार की अन्य पर्याय शोधले जाणार, याची उत्सुकता आहे. त्यामुळे ज्यासाठी अट्टाहास केला होता त्या मुख्यमंत्रीपदाची ज्योतिरादित्य यांना प्रतीक्षा आहेच. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांना बंडानंतर थेट मुख्यमंत्रीपद मिळाले आहे. त्यांच्यामागे पन्नास आमदारांचे बळ तर भाजपकडे ११०. पद सांभाळताना शिंदे यांची कसोटी आहे. समर्थकांची आमदारकी वाचवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागणार आहे. एकूणच दोन शिंद्यांनी दोन वर्षांत भाजपला दोन राज्यात सत्ता आणून दिली. ती राखताना आता कस लागणार आहे.