संतोष प्रधान
देशाच्या १६व्या राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलैला निवडणूक होणार आहे. देशातील ७७६ खासदार आणि ४०३३ आमदार असे एकत्रित ४८०९ जण या निवडणुकीचे मतदार असतील. एकूण मतांचे मूल्य हे १० लाख ८६ हजार ४३१ आहे. यामुळे विजयासाठी ५ लाख ४३ हजार २१५ मतांची आवश्यकता असेल. लोकसभेत बहुमत, राज्यसभेतील सर्वाधिक खासदार, देशातील निम्म्या राज्यांमध्ये भाजप किंवा मित्र पक्षांची सत्ता असल्याने जादुई ५ लाख ४३ हजार मतांचा आकडा गाठणे भाजपला फारसे कठीण नाही. भाजपला हा जादुई आकडा गाठण्याकरिता काही मतांची गरज असली तरी बिजू जनता दल, वायएसआर काँग्रेस, अण्णा द्रमुक अशा विविध प्रादेशिक पक्षांच्या मदतीने भाजपला उमेदवार निवडून आणण्यात काहीच अडचण येणार नाही. या निवडणुकीसाठी मतांची जुळवाजुळव भाजपने आधीच केली आहे. भाजपच्या नेतृत्वाने या संदर्भात विविध पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली आहे. दुसरीकडे, विरोधकांची आघाडी जुळते का, हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा मुद्दा. कारण काँग्रेसचे नेतृत्व मान्य करण्यास आम आदमी पार्टी, तेलंगणा राष्ट्र समिती, तृणमूल काँग्रेस तयार नाहीत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदार कोण असतात आणि मतांचे मूल्य कसे निश्चित केले जाते?

लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार आणि विधानसभेचे आमदार हे मतदार असतात. राज्यसभेतील नामनियुक्त सदस्य किंवा विधान परिषदेच्या आमदारांना मतदानाचा अधिकार नसतो. यानुसार देशातील ४८०९ खासदार-आमदारांमधून राष्ट्रपतींचा निवड होणार आहे. या खासदार आणि आमदारांच्या मतांचे मूल्य हे १० लाख, ८६ हजार, ४३१ आहे. यातील ५ लाख ४३ हजार २१५ मते मिळविणारा उमेदवार निवडून येईल. मतांचे मूल्य हे १९७१च्या जनगणनेनुसार निश्चित करण्यात आले आहे. म्हणजे ५० वर्षे झाली तरी अजूनही जुन्याच जनगणनेच्या आधारे खासदार आणि आमदारांच्या मतांचे मूल्य निश्चित केले जाते. १९७१च्या जनगणनेत देशाची लोकसंख्या ही ५५कोटींच्या आसपास होती. सध्या लोकसंख्या १३० कोटींपेक्षा अधिक आहे. म्हणजेच ५० वर्षांत लोकसंख्या दुपटीपेक्षा अधिक वाढूनही अजूनही जुन्याच आकडेवारीनुसार मतांचे मूल्य निश्चित केले जाते.

२०१७च्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत एकूण मतांचे मूल्य कमी का झाले?

२०१७च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदारांची संख्या व मतांचे मूल्य अधिक होते. तेव्हा १० लाख ९८ हजार ९०३ एकूण मतांचे मूल्य होते. जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा अस्तित्वात नसल्याने तेवढी लोकसंख्या वगळून मतांचे मूल्य निश्चित करण्यात आले आहे. यामुळेच यंदा एकूण मतांचे मूल्य हे १० लाख ८६ हजार ४३१ झाले. खासदारांच्या मतांचे मूल्य हे आता ७०० झाले. आधीच्या निवडणुकीत खासदारांच्या मतांचे मूल्य हे ७०८ होते. आमदारांच्या मतांच्या मूल्यात फरक झालेला नाही.

महाराष्ट्रातील मतांचे मूल्य किती असेल?

राज्यातील आमदारांच्या मतांचे मूल्य हे १७५ असेल. १९७१च्या जनगणनेनुसार राज्याची लोकसंख्या पाच कोटी चार लाख होती. या लोकसंख्येला विधानसभा सदस्यसंख्या असलेल्या २८८ ने भागले जाते. त्यातून मतांचे मूल्य १७५ येते. त्यानंतर २८८ ला १७५ ने गुणले जाते. त्यातून राज्यातील आमदारांच्या एकूण मतांचे मूल्य हे ५०,४०० येते. राज्यातील खासदारांची संख्या ६७ आहे. (लोकसभेचे ४८ तर राज्यसभेचे १९) प्रत्येक खासदाराच्या मताचे मूल्य हे ७०० असेल. यानुसार ७०० गुणिले ६७ केल्यावर राज्यातील खासदारांच्या मतांचे मूल्य हे ४६,९०० होते. महाराष्ट्रातील आमदारांच्या मतांचे मूल्य हे ५०,४०० तर खासदारांच्या मतांचे मूल्य हे ४६,९०० असेल.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained election commission announce date of president election print exp 0622 abn