काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीची म्हणजेच सीडब्ल्यूसीची निवडणुकही जाहीर झाली आहे. काँग्रेस कार्यकारिणीची समितीची निवडणूक ७५ वर्षांत तिसऱ्यांदा आणि सोनिया गांधींच्या नेतृत्वातील २४ वर्षांच्या काळात पहिल्यांदाच होणार आहे.

काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत २३ सदस्य असून त्यापैकी १२ जणांची निवड निवडणुकीद्वारे घेण्यात येते, तर ११ जणांची निवड नामनिर्देशित पद्धतीने होते. जर राष्ट्रीय कार्यकारणीसाठी १२ पेक्षा जास्त अर्ज आले, तर राष्ट्रीय कार्यकारणीसाठी निवडणुका घेण्यात घेईल, अशी माहिती काँग्रेस केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी दिली आहे. सेच यासाठी काँग्रेसचे राज्य निवडणूक अधिकारी सर्व राज्यांना भेट देणार असून सर्व प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल, असेही ते म्हणाले.

काँग्रेसच्या सद्यस्थितीवर पक्षाच्या धोरणांविरोधात आवाज उठवणाऱ्या पक्षाच्या नेत्यांच्या ग्रुप 23 नेही सीडब्ल्यूसीच्या १२ जागांसाठी निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे माजी नेते गुलाब नबी आझाद यांच्या बंडखोरीनंतर आणि कपिल सिब्बल आणि अश्विनी कुमार यांच्यासारख्या नेत्यांच्या दबावानंतर काँग्रेसला सीडब्ल्यूसीच्या निवडणुका घेणे भाग पडले असल्याचे मानले जात आहे.

तर काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आता भलतेच रंग भरू लागले आहेत. पुढील तीन-चार दिवसांमध्ये राज्या-राज्यांतील प्रदेश काँग्रेसमध्ये ठराव संमत केला जाण्याची शक्यता असून प्रदेशाध्यक्ष, कार्यकारिणी समिती तसेच, पक्षाध्यक्ष निवडीचे सर्वाधिकार हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे देण्यात येतील. प्रदेश काँग्रेसमधील हे ठराव पक्षातील सूत्रे गांधी कुटुंब व त्यांच्या निष्ठावानांकडे कायम ठेवण्यासाठी केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

‘जी-२३’चे लक्ष :

दरम्यान, काँग्रेसमधील ‘जी-२३’ गट या निवडणूक प्रक्रिया आणि त्याच्या पारदर्शकतेवर बारकाईने लक्ष ठेवेल. गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, भूपेंद्रसिंह हुड्डा आणि मनीष तिवारींसह ‘जी-२३’ गटातील नेत्यांनी ‘सीडब्ल्यूसी’पासून ब्लॉक स्तरापर्यंतच्या निवडणुका योग्य रीत्या घेण्याचा आग्रह धरला आहे.

काँग्रेस वर्किंग कमिटी (CWC) म्हणजे काय? –

कार्यकारिणी ही काँग्रेसचे “सर्वोच्च कार्यकारी प्राधिकरण”आहे आणि पक्षाच्या घटनेतील तरतुदींचा अर्थ लावण्याचा आणि अंमलबजावणी करण्याचा अंतिम अधिकार सीडब्ल्यूसीकडे आहे. काँग्रेसच्या घटनेनुसार, सीडब्ल्यूसीमध्ये पक्षाध्यक्ष, त्यांचा संसदेतील नेता आणि २३ इतर सदस्य असतील, ज्यापैकी १२ अखिल भारतीय काँग्रेस कमिटीद्वारे निवडले जातील आणि उर्वरीत नियुक्ती पक्षाध्यक्षाडून केली जाईल.

सीडब्ल्यूसीची पुनर्रचना सामान्यत: काँग्रेस अध्यक्षाच्या निवडीनंतर किंवा पुन्हा निवड झाल्यानंतर केली जाते. सीडब्ल्यूसीची पुनर्रचना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या पूर्ण सत्रादरम्यान केली जाऊ शकते, जे निवडणूक किंवा पुनर्निवडणुकीनंतर होते किंवा अध्यक्षांद्वारे याची पुनर्रचना करण्यासाठी अधिवेशाद्वारे अधिकृत केल्यानंतर.

CWC ची मागील निवडणूक कधी झाली होती? –

गेल्या ५० वर्षांत प्रत्यक्ष निवडणुका दोनदाच झाल्या आहेत. दोन्ही प्रसंगी नेहरू-गांधी घराण्याबाहेरची व्यक्ती सत्तेत होती. १९९२ मध्ये, तिरुपती येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या पूर्ण अधिवेशनात, काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष पी.व्ही. नरसिंह राव यांनी CWC साठी निवडणूक घेतली, या आशेने की त्यांनी निवडलेले लोक जिंकतील. त्यांचे विरोधक – सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्जुन सिंग, पण शरद पवार आणि राजेश पायलट निवडून आल्यानंतर, राव यांनी संपूर्ण सीडब्ल्यूसीचा हे सांगून राजीनामा दिला की, एकही एससी, एसटी किंवा महिला निवडून आली नाही. त्यानंतर त्यांनी CWC ची पुनर्रचना केली आणि सिंह आणि पवार यांचा नामनिर्देशित वर्गात समावेश केला.

१९९७ मध्ये सीताराम केसरीच्या नेतृत्वाखाली कलकत्ता येथे CWC च्या निवडणुका पुन्हा झाल्या. मतमोजणी दुसऱ्या दिवशीपर्यंत चालल्याचे पक्षाच्या नेत्यांच्या लक्षात आहे. अहमद पटेल, जितेंद्र प्रसाद, माधव राव सिंधिया, तारिक अन्वर, प्रणव मुखर्जी, आरके धवन, अर्जुन सिंग, गुलाम नबी आझाद, शरद पवार आणि कोटला विजया भास्कर रेड्डी हे विजेते होते.

तत्पूर्वी, १९६९ च्या बॉम्बे प्लेनरीमध्ये काँग्रेसमधील छोट्याशा विभाजनानंतर शेवटच्या क्षणी एक निवडणूक पुढे ढकलण्यात आली, जेव्हा मूळ चंद्रशेखर यांचा दहा “सहमतीने निवडलेल्या” उमेदवारांमध्ये समावेश करण्यात आला होता. यानंतर एप्रिल १९९८ मध्ये जेव्हा सोनिया गांधी या काँग्रेस अध्यक्षा झाल्यानंतर, CWC सदस्यांना नेहमीच नामनिर्देशित केले गेले.