ज्ञानेश भुरे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खेळाच्या मैदानावरील सर्वांत महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे पंच. सामन्याचा निर्णय एक प्रकारे त्याच्या हाती असतो. पंचांचा निर्णय अंतिम, असे कायम म्हटले जाते. अनेकदा पंचांचे निर्णय वादग्रस्त ठरतात. काही वर्षांपूर्वीपर्यंत फुटबॉलमध्ये मैदानावरील पंचांनाच महत्त्व होते. मात्र, आता निर्णयांमध्ये अचूकता आणण्यासाठी पंचांना टीव्ही पंचाचे साहाय्य मिळते. कठीण जाणारे निर्णय पंच अशा तंत्राचा वापर करून ते सोपे करतात. कतार येथे सुरू असलेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत तर ऑफसाइडचा निर्णय ठरविण्यासाठी बारा कॅमेऱ्यांची मदत घेण्यात आली. यानंतरही अनेक निर्णय वादग्रस्त ठरले. एका पंचांची हकालपट्टीही झाली. काय झाले असे वाद…

स्पॅनिश पंचांची हकालपट्टी का झाली?

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिना विरुद्ध नेदरलँड्स हा सर्वांत तणावपूर्ण वातावरणात खेळला गेलेला सामना होता. अर्जेंटिनाने २-० अशी आघाडी घेतल्यानंतरही लुई व्हॅन गाल यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या नेदरलँड्सने दमदार पुनरागमन केले. त्यांनी बरोबरी साधून सामना पेनल्टी शूट-आऊटमध्ये नेला होता. या सामन्यात स्पॅनिश पंच ॲन्टोनियो माटेओ लाहोज यांनी तब्बल १८ पिवळी कार्डे दाखवली. यात नेदरलँड्सचा बचावपटू डेन्झेल डम्फ्रिजला दोन पिवळी कार्डे मिळाल्याने त्याला मैदान सोडावे लागले. दोन गोलच्या आघाडीनंतरही सामना जिंकण्यासाठी झगडावे लागल्यामुळे अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेसी पंचांच्या कामगिरीवर कमालीचा असमाधानी होता. पंचांबाबत त्याने थेट मत वक्तव्य करणे टाळले. मात्र, सामन्यात जे निर्णय घेण्यात आले, ते सर्वांनी पाहिले, असे म्हटत त्याने लाहोज यांना लक्ष्य केले. नेदरलँड्सच्या खेळाडूंनीही लाहोज यांच्यावर टीका केली. त्यामुळे ‘फिफा’ने लाहोज यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला.

लाहोज यांच्याबद्दल मेसी काय म्हणाला होता?

सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत मेसीने पंचांबाबत थेट विधान करणे टाळले होते. मात्र, नकळत मेसी टीका करून गेला होता. ‘‘मी पंचांबद्दल काही बोलणार नाही. कारण मी तसे केले तर, माझ्यावर कारवाई होईल. मात्र, मैदानात जे काही घडले ते सर्वांनी पाहिले आहे. ‘फिफा’ने या सामन्याच्या अहवालाचे अवलोकन करण्याची गरज आहे. विश्वचषकातील महत्त्वाच्या सामन्यात असे पंच नियुक्त करणे योग्य नाही,’’ अशी टिप्पणी मेसीने केली होती.

लाहोज यांची स्पर्धेतील कामगिरी कशी होती?

लाहोज यांनी स्पर्धेत दोन साखळी आणि एक उपांत्यपूर्व फेरी अशा तीन सामन्यांत पंच म्हणून काम पाहिले. हे तीनही सामने वादग्रस्त ठरले. लाहोज यांनी तीन सामन्यांत मिळून एकूण २३ पिवळी कार्डे दाखवली. अमेरिका विरुद्ध इराण आणि कतार विरुद्ध सेनेगल या दोन साखळी सामन्यांत लाहोज यांनी पंचाची भूमिका बजावली होती.

पंचांची विश्वचषक स्पर्धेतील कामगिरी वादग्रस्त ठरली का?

पंचांचे निर्णय आणि वाद हे प्रसंग खरे तर बाद फेरीपासून प्रकर्षाने समोर आले. पोर्तुगालचा बदली कर्णधार पेपेनेही पंचांशी हुज्जत घातली होती. मोरोक्को फुटबॉल महासंघानेही उपांत्य फेरीतील फ्रान्सविरुद्धच्या पराभवानंतर पंच सीझर रामोस यांची ‘फिफा’कडे तक्रार केली. मोरोक्कोला सामन्यात फ्रान्सकडून ०-२ असा पराभव पत्करावा लागला. या सामन्यात निश्चित असलेल्या दोन पेनल्टी रामोस यांनी नाकारल्याची तक्रार मोरोक्को महासंघाने केली आहे.

क्रोएशियाचा कर्णधार लुका मॉड्रिच पंचांविषयी काय म्हणाला?

उपांत्य फेरीत अर्जेंटिनाविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतर क्रोएशियाचा कर्णधार लुका मॉड्रिचने सामन्यातील इटलीचे पंच डॅनिएले ऑरसाटो यांच्यावर टीका केली होती. ‘‘पंचांविषयी मी कधी बोलत नाही. मात्र, मला आज बोलावे लागते आहे. आजपर्यंत पाहिलेली ही पंचांची सर्वांत खराब कामगिरी होती. मी खेळलेल्या अनेक सामन्यांत ऑरसाटो पंच होते. प्रत्येक वेळी ते वादग्रस्त ठरले. आजच्या लढतीत पंचांनी दिलेली पेनल्टी आश्चर्यकारक होती. अर्जेंटिनाच्या अल्वारेझने गोल करण्यासाठी किक मारली होती आणि ती अडवताना गोलरक्षक लिव्हाकोव्हिचची त्याच्याशी झालेली धडक ही नैसर्गिक होती. ऑरसाटो आम्हाला कॉर्नरही देत नव्हते. त्यांनी अर्जेंटिनाला थेट पेनल्टी दिली. हे अनाकलनीय आहे,’’ असे मॉड्रिच पत्रकार परिषदेत म्हणाला.

कोणत्या देशांनी पंचांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली?

अर्जेंटिना, पोर्तुगाल, मोरोक्को यांच्यासह इंग्लंडनेही पंचांविरुद्ध टीका केली आहे. फ्रान्सविरुद्धच्या सामन्यात पंच सॅम्पायो यांचे अनेक निर्णय आमच्याविरुद्ध गेले. सामन्यात असे काही मोठे क्षण असतात की ते सामन्याला कलाटणी देतात. आम्ही चुका केल्यास आमच्यावर टीका होते. पंच आम्हाला कार्ड दाखवतात. मात्र, पंचांची कामगिरी चांगली झाली की वाईट हे कोण ठरवणार, असा प्रश्न इंग्लंडचा बचावपटू हॅरी मग्वायरने उपस्थित केला होता.

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत किती पंच नियुक्त होते?

फुटबॉलच्या मैदानात ९० मिनिटे एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे धावणे आणि खेळाडूंच्या हालचालींकडे बारीक नजर ठेवणे हे सोपे काम नाही. खेळाडूंपेक्षा अनेकदा पंचांच्या कामगिरीकडे अधिक लक्ष असते. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी ‘फिफा’कडून सर्वोत्तम आणि सर्वांत तंदुरुस्त अशा पंचांची नियुक्ती केली जाते. त्यांची तंदुरुस्ती चाचणीही घेतली जाते. या वेळी विश्वचषक स्पर्धेत सहा संयुक्त महासंघांमधून ३६ पंच आणि ६९ साहाय्यक पंचांची नियुक्ती करण्यात आली होती. त्याचबरोबर २४ चित्रफीत साहाय्यकांचीही नियुक्ती करण्यात आली होती. या वेळेस ‘फिफा’ने पुरुषांच्या सामन्यांसाठी प्रथमच महिला पंचही नियुक्त केल्या होत्या.

ऑफसाइड निर्णयासाठी ‘फिफा’ने काय उपाययोजना केली?

फुटबॉलमध्ये ऑफसाइडचे निर्णय नेहमीच वादग्रस्त ठरत असतात. हे टाळण्यासाठी ‘फिफा’ने या वेळी ‘अर्ध-स्वयंचलित ऑफसाइड तंत्रज्ञान’ (सेमी ऑटोमेटेड) या नव्या तंत्रप्रणालीचा वापर केला. यासाठी प्रत्येक मैदानाच्या छतात खेळाडूंच्या हालचाली टिपण्यासाठी १२ कॅमेरे बसविले होते. हे कॅमेरे प्रत्येक सेकंदाला ५० वेळा खेळाडूंच्या हालचाली वेगवेगळ्या कोनातून टिपत होते. यामुळे या स्पर्धेत केवळ हात किंवा शरीराचा थोडासा भाग जरी प्रतिस्पर्धी खेळाडूच्या पुढे राहिला तरी त्या खेळाडूस ऑफसाइड ठरविण्यात येत होते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained fifa world cup controversial decisions of referees print exp sgy