ज्ञानेश भुरे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदाच्या कतार २०२२ विश्वचषक स्पर्धेचे स्पर्धागीत जेवढे लोकप्रिय झाले नाही, तेवढे अर्जेंटिना चाहत्यांनी आपल्या संघासाठी केलेले ‘मुचाचोस’ हे संघ गीत कमालीचे लोकप्रिय झाले आहे. अर्जेंटिनाच्या सामन्याच्या दिवशी या गाण्याने स्टेडियम अक्षरशः दणाणून जाते. अंतिम सामन्याच्या पूर्वसंध्येला तर दोहा येथील रस्तेही जणू हे गीत गाऊ लागल्याचे चित्र दिसून येत आहे.

काय आहे ‘मुचाचोस’ गीत ?

‘मुचाचोस, अहोरा नोस व्हॉल्विमोस अ इल्युजन’ असे या गाण्याचे मूळ शब्द आहेत. स्पॅनिश भाषेतील हे गीत फुटबॉल चाहता फर्नांडो रामोस याने लिहिले असून, ‘मुलांनो, आम्हाला पुन्हा आशा आहेत, आपण तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकू,’ असा गाण्याचा एकूण अर्थ आहे. अर्जेंटिनाचा दिग्गज खेळाडू दिवंगत डिएगो मॅराडोना, सध्याचा हिरो लिओनेल मेसी आणि विश्वचषकातील मागील हृदयद्रावक पराभव आणि गेल्या वर्षीच्या कोपा अमेरिकन स्पर्धेतील विजेतेपदाचा या गीतात संदर्भ आहे. कतारमध्ये तिसऱ्यांदा विश्वविजेतेपद जिंकण्याच्या आशा बळावल्या आहेत, असा बदल विश्वचषकासाठी करण्यात आला आहे.

विश्लेषण: विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील पंचांची कामगिरी वादग्रस्त का ठरली?

‘मुचाचोस’ गीत सर्वप्रथम कधी लोकप्रिय झाले ?

गेल्या वर्षी कोपा-अमेरिका फुटबॉल स्पर्धेत अर्जेंटिनाने ब्राझीलचा १-० असा पराभव केल्यानंतर हे गाणे समाजमाध्यमांवर कमालीचे लोकप्रिय झाले. या स्पर्धेतच सर्वप्रथम हे गीत अर्जेंटिनाच्या खेळाडूंसाठी गायले जाऊ लागले. कोपा विजेतेपदानंतर मेसीनेही हे आपले आवडते गीत असल्याचे सांगितले आणि गाण्यातील काही शब्दही मेसीने गुणगुणले. तेव्हा हा व्हिडिओ देखील कमालीचा लोकप्रिय झाला.

या गाण्याचे मूळ नेमके कशात आहे ?

अर्जेंटिनाचे चाहते आणि खेळाडू जे गाणे गात आहेत ते खरे तर अर्जेंटिनातील ब्युनोस आयर्स येथील पंक बँडच्या गाण्याची रूपांतरित आवृत्ती आहे असे म्हटले जात आहे. अर्जेंटिनाच्या खेळाडूंसाठी फर्नांडो रामोस याने या गाण्यात प्रत्येक वेळेस बदल केले. मॅराडोना, मेसीपासून अगदी यंदाच्या कामगिरीचाही यात उल्लेख केला गेला आहे.

असे काय आहे गाण्यात की ज्याने सर्वच जण प्रेरित होतात ?

खेळाडूंना प्रोत्साहित करणारे साधे सरळ हे गाणे आहे. पण, यातील संदर्भ असे काही आहेत, की ज्यामुळे मैदानावर हे गीत गायले जाते तेव्हा मैदानातील एक ऊर्जा वेगळ्याच पातळीवर पोचते. प्रत्येकाचे डोळे पाणावलेले असतात. पण, हे आनंदाश्रू असतात. हे गाणे ऐकले की खेळाडू सगळा थकवा विसरून नव्या ऊर्जेने खेळू लागतात. जसे मैदानावरील दडपण वाढत जाते, तसा प्रेक्षकांमधील गाण्याचा स्वर टिपेला पाचतो. हे सगळे वातावरण भारावून टाकल्यासारखे आणि अंगावर शहारे आणणारे असते. गाण्यामधील ‘मालविनास’चा संदर्भ हा १९८२च्या युद्धात ब्रिटिशांविरुद्ध लढलेल्या अर्जेंटिनाच्या सैनिकांचे स्मरण करायला लावतो. फॉकलंड युद्ध म्हणून हे परिचित झाले होते. या युद्धात जे मरण पावले ते आमचे नायक होते. त्यांना आम्ही विसरू शकत नाही. हा संदर्भ घेऊन फुटबॉलपटूंना उद्देशून आम्ही तुम्हालाही विसरू शकत नाही. तुम्ही आमचे सैनिक आहात. आम्हाला तिसऱ्यांदा विश्वविजेतेपदाची आशा आहे. असा बदल करण्यात आला.

या गाण्याचा शेवट काय आहे ?

आम्ही विश्वचषक विजेतेपदाची अंतिम लढत हरलो याचा किती वर्षे शोक करायचा. ही प्रतीक्षा आता संपली आहे. आमची मुले आता लढणार आहेत. आम्हाला तिसऱ्यांदा विश्वचषक मिळवून देणार आहेत, अशाच चाहत्यांचा अपेक्षा आहेत. मॅराडोना आमचे दैवत आहे. आकाशातून तो हा सामना बघत आहे, अशी त्यांची भावना आहे. म्हणूनच लिओनेलसाठी मार्ग मोकळा करा…पुन्हा अजिंक्य व्हा, असा या गीताचा भावनात्मक शेवट करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained fifa world cup why argentina fans adopt muchachos as world cup anthem print exp sgy