भक्ती बिसुरे
गर्भाशय मुखाच्या कर्करोगावरील (सर्व्हायकल कॅन्सर) पहिली भारतीय लस लवकरच उपलब्ध होणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियातर्फे विकसित करण्यात आलेल्या या लशीला केंद्रीय औषध महानियंत्रक कार्यालयाने (ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया) मान्यता दिली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी नुकतीच ट्विटरवरून ही घोषणा केली. या कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या लशींमध्ये भारतीय पर्याय नसल्याने हे लसीकरण सर्वसामान्य महिलांच्या आवाक्यातील नाही. त्यामुळे सीरमतर्फे तयार करण्यात येत असलेली संपूर्ण भारतीय लस ही सर्वसामान्य महिलांना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होईल. त्याचाच परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात महिलांना या कर्करोगापासून संरक्षण मिळेल. २०२२ च्या अखेरपर्यंत ही लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणजेच केंद्रीय औषध महानियंत्रक कार्यालयाने या लशीला परवानगी दिली आहे. त्यानिमित्ताने हा कर्करोग काय आहे, त्यावर उपलब्ध लशी कोणत्या याबाबत हे विश्लेषण.

गर्भाशय मुखाचा कर्करोग सर्वाधिक?

गर्भाशय मुखाचा कर्करोग हा स्तनांच्या कर्करोगाखालोखाल महिलांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारा कर्करोग आहे. ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) नामक विषाणूमुळे हा कर्करोग होतो. दरवर्षी भारतातील सुमारे १ लाख २२ हजार ८४४ महिलांना या कर्करोगाचे निदान होते. त्यांपैकी सुमारे ६७ हजार ४७७ महिलांचा या कर्करोगामुळे मृत्यू होतो. १५ वर्षांवरील वयोगटातील महिलांना या कर्करोगाचा धोका सर्वाधिक आहे. गर्भाशय मुखाच्या कर्करोगास प्रतिबंध करण्यासाठी एचपीव्ही लस दिली जाते. प्रतिबंधात्मक लस उपलब्ध असलेला हा एकमेव कर्करोग आहे.

हा कर्करोग कशामुळे होते?

प्रतिबंधात्मक लस उपलब्ध असलेला तसेच कर्करोग होण्याचे निश्चित कारण माहिती असलेलाही हा एकमेव कर्करोग आहे. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस या नावाच्या विषाणूमुळे हा कर्करोग होतो. योनीमार्गातील संसर्ग, स्वच्छतेच्या सवयींचा अभाव अशा कारणांमुळे या विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता असते. लहान वयापासून आलेले शारीरिक संबंध किंवा एकापेक्षा अधिक व्यक्तींशी आलेले संबंध, धूम्रपानासारख्या सवयी, अनेक बाळंतपणे अशी पूरक कारणेही हा कर्करोग होण्यामागे आहेत. ४० ते ५० वर्ष वयोगटात याची लक्षणे दिसली असता त्याची सुरुवात काही वर्षे आधीच झालेली असण्याची शक्यता असते. इतर बहुतांशी कर्करोगांप्रमाणे हा कर्करोगही प्राथमिक अवस्थेत लक्षात आला आणि त्याचे निदान झाले तर पूर्ण बरा होऊ शकतो. विशेष म्हणजे पॅप स्मिअर नावाच्या चाचणीद्वारे हा कर्करोग होण्याची शक्यताही पडताळून पाहता येते.

लक्षणे आणि उपचार?

प्राथमिक टप्प्यात या कर्करोगाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. मात्र रक्तस्राव, पांढरा स्राव, ओटीपोटात दुखणे, शारीरिक संबंधांनंतर होणारा रक्तस्राव ही या कर्करोगाची काही प्रमुख लक्षणे असू शकतात. यांपैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास पॅप स्मिअरसारखी चाचणी किंवा इतर तपासण्या करून घेतल्यास आजाराचे लवकरच्या टप्प्यात निदान होणे शक्य असते. गर्भाशय मुखाशी असलेली गाठ, त्यातून होणारा रक्तस्राव हेही एक लक्षण असल्यास योग्य उपचार आणि तपासण्यांची गरज असते. शस्त्रक्रियांद्वारे यावर उपचार केले जातात. मात्र, फारशी लक्षणे न दाखवता कर्करोग वाढला असता तो उर्वरित शरीरात पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे शक्यतो कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष न करता आपल्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते.

पाहा व्हिडीओ –

लशींबाबत सद्यःस्थिती काय?

गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर प्रतिबंधासाठी सध्या दोन प्रकारच्या लशी उपलब्ध आहेत. गार्डासिल आणि सर्व्हिरिक्स या दोन लशी वय वर्ष ११ ते ४५ दरम्यान तीन मात्रांमध्ये दिल्या जातात. या लशींमुळे गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची शक्यता ९० टक्के कमी होते. मासिक पाळी जास्त दिवस येणे, अतिरिक्त रक्तस्राव होणे, दोन मासिक पाळ्यांतील अंतर कमी असणे, मासिक पाळी गेल्यानंतरही रक्तस्राव होत राहणे, यांपैकी कोणतेही लक्षण दिसल्यास आवश्यक शारीरिक तपासण्या करुन निदान करणे योग्य ठरते. नियमित तपासणी, जनजागृती, योग्य उपचार या गोष्टींच्या मदतीने गर्भाशयाच्या कर्करोगामुळे होणारे मृत्यू टाळता येतात. त्याचबरोबर लस घेण्यामुळे कर्करोगाची शक्यता कमी करणेही आपल्या हातात आहे. सध्या भारतात उपलब्ध असलेल्या गार्डासिल आणि सर्व्हिरिक्स या दोन लशी तीन मात्रांमध्ये घ्याव्या लागतात. त्यांच्या किमती प्रत्येक मात्रेसाठी अनुक्रमे तब्बल ३३०० आणि २८०० एवढ्या आहेत. सर्व्हिरिक्स ही एचपीव्ही प्रतिबंधात्मक लस ग्लॅक्सो स्मिथ क्लाईन या ब्रिटिश कंपनीतर्फे बनवली जाते. गार्डासिल ही लस अमेरिकन मर्क ॲण्ड कंपनीतर्फे बनवली जाते. त्यामुळेच संपूर्ण भारतीय बनावटीची लस उपलब्ध झाली असता लशीची किंमत पर्यायाने गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरोधातील संरक्षणच सर्वसामान्य महिलांच्या आवाक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Story img Loader