भारताच्या पहिल्या अणु चाचणीला, पोखरण ( Pokhran-I) इथे जमिनीाखाली केलेल्या पहिल्या अणु स्फोटाला नुकतीच म्हणजे १८ मे ला ४८ वर्षे पूर्ण झाली. १८ मे १९७४ ला भारताने राजस्थानमधील पोखरण इथे सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी पहिली अणु चाचणी घेत अण्वस्त्रक्षम झाल्याची नांदी भारताने जगाला दिली. त्याचा हा थोडक्यात आढावा…
अणु चाचणीचे स्वरुप नेमके काय होते ?
राजस्थानमधील पोखरण इथे मानवी वस्तीपासून दूर अशी जागा अणु चाचणी करता निश्चित करण्यात आली. जमिनीखाली सुमारे १०७ मीटर अंतरावर सुमारे १४०० किलो एकुण वजन असलेल्या अण्वस्त्राचा विखंडन प्रक्रियेद्वारे स्फोट करण्यात आला. यामध्ये प्लुटोनियम हा किरणोत्सारी पदार्थ मुख्य स्फोटक वापरला होता. या स्फोटाची क्षमता १० किलोटन एवढी होती असा दावा करण्यात आला. म्हणजेच नागासाकी इथे जो अणु बॉम्ब टाकण्यात आला त्या बॉम्बच्या क्षमतेपेक्षा निम्मी होती. या चाचणीला Operation Smiling Buddha असं सांकेतिक नाव देण्यात आले होते. त्या दिवशी असलेल्या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने हे नाव देण्यात आले. या चाचणीमुळे तीन रिश्टर स्केलपेक्षा जास्त भुकंपाची नोंद करण्यात आली.
देशात अणु कार्यक्रमाची प्रगती कशी झाली ?
भारताच्या अणु कार्यक्रमाला १९४४ मध्ये होमी जहांगीर भाभा यांच्या पुढाकाराने सुरुवात झाली. भाभा यांनी दुरदृष्टी दाखवत मुंबईत टाटा मुलभूत संशोधन संस्थेची( Tata Institute of Fundamental Research -TIFR ) स्थापना करत एक प्रकारे अणु कार्यक्रमाचा पाया रचला. जगामध्ये घडत असलेले बदल लक्षात घेत त्यावेळी भाभा यांनी पावले उचलत अणु ऊर्जेवर काम सुरु केले. स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी अणु कार्यक्रम हा शांततापूर्ण विकासासाठी राबवला जाणार असल्याचं जाहीर केलं.
होमी भाभा यांच्या नेतृत्वाखाली अणु ऊर्जा आयोगाची स्थापन करत विविध संस्थांची निर्मिती करण्यात आली, अणु ऊर्जा कार्यक्रमाची दिर्घकालीन आखणी करण्यात आली. भाभा अणु संशोधन केंद्रात त्यावेळी ४ ऑगस्ट १९५६ ला देशातील ( आणि आशियातील ) पहिली एक मेगावॅट क्षमतेची अणु भट्टी कार्यान्वित झाली.
पहिल्या अणु चाचणीची प्रक्रिया कशी सुरु झाली ?
१९५० नंतर जगात अमेरिका, रशिया अणु चाचण्यांचा सपाटा लावला होता. फ्रान्स आणि इंग्लंड देशांनीही अणु चाचण्या घेतल्या होत्या. १९६२ विरुद्ध चीन विरुद्धच्या परभवामुळे भारतानेही अणु चाचणी करावी या विचाराने जोर धरला. नेहरु, लालबहादुर शास्त्री यांचे अकाली निधन यामुळे ही मागणी मागे पडली. असं असलं तरी शेजारच्या चीनने १९६४ ला घेतलेल्या पहिल्या अणु चाचणीमुळे अण्वस्त्रक्षम होण्याचा विचार थंड पडला नव्हता. होमी भाभा यांच्या अपघाती मृत्यु नंतर विक्रम साराभाई आणि त्यानंतर राजा रामण्णा या शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखाली अणु कार्यक्रमाची प्रगती सुरु होती.
१९६७ ला इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यावर अण्वस्त्रक्षम होण्याच्या दृष्टीने निर्णायक पावले पडायला लागली. सप्टेंबर १९७२ मध्ये भाभा अणु संशोधन संस्थेला अणु चाचणी करता आवश्यक तयारी करण्याच्या सुचना करण्यात आल्या. भारताच्या लष्कराने याची आवश्यक तयारी पोखरण इथे पूर्ण केली. पंतप्रधान कार्यालयातील काही जण, अणु चाचणीत सहभागी झालेले ७० पेक्षा जास्त शास्त्रज्ञ – अभियंते यांनाच फक्त या चाचणीची माहिती होती.
चाचणीनंतरच्या घडामोडी
पोखरण इथल्या भारताच्या पहिल्या अणु चाचणीचा अर्थातच जगाला धक्का बसला. अमेरिकेने दबाव टाकत त्यांचे नियंत्रण असेल अशा देशांना अणु तंत्रज्ञान देता येईल अशा गटाची – Nuclear Suppliers Group ची स्थापना केली. अमेरिकेसह काही देशांनी अणु तंत्रज्ञानासह अनेक निर्बध भारतावर टाकले. पाकिस्तानचा जळफळाट झाला आणि मिळेल त्या मार्गाने अणु तंत्रज्ञान मिळवण्याचा प्रयत्न आणखी जोराने सुरु केले. असं असलं तरी पोखरणच्या पहिल्या अणु चाचणीमुळे भारताचा जगात दबदबा वाढला.