– प्रशांत केणी

महेंद्रसिंह धोनीच्या परीसस्पर्शाने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये सर्वांत लोकप्रिय आणि यशस्वी संघ अशी ख्याती मुंबई इंडियन्सच्याही आधी चेन्नई सुपर किंग्जनी मिळवली. चार विजेतेपदे (२०१०, २०११, २०१८, २०२१), नऊ वेळा अंतिम फेरी, ११ वेळा बाद फेरी आणि विजयाची सर्वोत्तम अशी ६४.८३ टक्केवारी ही या संघाची वैशिष्ट्ये. परंतु यंदाच्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स, लखनऊ सुपर जायंट्स, पंजाब किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबाद अशा चार संघांकडून पराभवामुळे हा संघ गुण तालिकेत अखेरच्या (१०व्या) स्थानावर फेकला गेला आहे. शेन वॉटसन, सुरेश रैना, हरभजन सिंग, इम्रान ताहीर, धोनी, केदार जाधव, मुरली विजय, अंबाती रायुडू यांच्यासारख्या अनुभवी आणि वयस्क खेळाडूंमुळे या संघाला ‘डॅड्स आर्मी’ म्हटले जायचे. पण गेल्या दोन वर्षांत यापैकी अनेक खेळाडू संघाबाहेर गेल्याने हा संघ संक्रमण अवस्थेतून जात आहे. गतवर्षी जेतेपद पटकावल्यानंतर यंदाच्या चार पराभवांमुळे जडेजाचे नेतृत्व, लिलावात खेळाडूंची निवड करताना जेतेपदाच्या शिलेदारांकडे दुर्लक्ष, धोनीची अस्ताला चाललेली कारकीर्द, फलंदाजी, गोलंदाजी अशी अनेक कारणे समोर आली. याच कारणांचा घेतलेला वेध –

जडेजावर कर्णधारपदाचे दडपण जाणवते आहे का? –

चेन्नईने ‘आयपीएल’ सुरू होण्याच्या दोन दिवस आधी कर्णधारपदाची घोषणा केली असली तरी धोनीने मला दोन महिने आधीच नेतृत्वासाठी सज्ज राहण्याची सूचना केली होती, असे सांगत जडेजाने कर्णधारपदाचे दडपण जाणवत नसल्याचे म्हटले आहे. परंतु नेतृत्व, फलंदाजी आणि गोलंदाजी या तिन्ही विभागांत अपयशी ठरल्यामुळे कर्णधारपदाचे दडपण जडेजाने घेतल्याचे स्पष्ट आहे. धोनीचे पाठबळसुद्धा जडेजाला ‘नेतृत्वयश’ मिळवून देऊ शकलेले नाही. गतवर्षी चेन्नईच्या यशात २२७ धावा आणि १३ बळी अशी अष्टपैलू भूमिका बजावणाऱ्या जडेजाच्या खात्यावर आतापर्यंत चार सामन्यांत फक्त ६६ धावा आणि एक बळी जमा आहे. सामन्याला कलाटणी देणारा त्याचा खेळ अद्याप ‘आयपीएल‘मध्ये झळकलेला नाही.

धोनीने ‘आयपीएल’मधून निवृत्ती पत्करावी का? –

‘आयपीएल’च्या व्यासपीठावर यशोगाथा बनलेल्या चेन्नईच्या यशातील धोनीचा सिंहाचा वाटा कुणीच नाकारू शकणार नाही; पण चाळिशीकडे झुकलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करलेल्या धोनीची जादू आता संपत चालली आहे. कोणत्याही कठीण प्रसंगात सामन्याचा निकाल पालटण्याची क्षमता, त्यासाठी मैदानावर हुकूमत गाजवणारी फलंदाजी, बुद्धिबळाच्या चालींप्रमाणे मैदानावर आखलेली रणनीती, ही त्याची बलस्थाने ‘आयपीएल’मध्ये दिवसेंदिवस बोथट झाल्याची पाहायला मिळतात. चार सामन्यांत ९२ धावा (अनुक्रमे : ५०, १६, २३, ३) ही त्याची कामगिरी संघाच्या यशाला प्रेरणादायी मुळीच नाही. धोनीशिवाय चेन्नई या कल्पनेपलीकडील विचारधारेकडे वास्तववादी दृष्टिकोनातून संघ व्यवस्थापनाने पाहण्याची आवश्यकता आहे. हैदराबादविरुद्ध धोनी ६ चेंडूंत ३ धावा काढून बाद झाल्यानंतर समाजमाध्यमांवर त्याला लक्ष्य केले जात आहे. चेन्नईचा संघ १० खेळाडूंनिशी खेळत होता, अशी ‘टि्वपण्णी’सुद्धा धाेनीवर केली गेली. गतवर्षी चेन्नईच्या जेतेपदात धोनीच्या फलंदाजीचे योगदान १६ सामन्यांत ११४ धावा असे त्राेटक होते. त्यामुळेच पुढील हंगामात तो संघाच्या प्रेरकाच्या भूमिकेत दिसल्यास वावगे ठरणार नाही.

सलामीवीर ऋतुराज गायकवाड धावांसाठी झगडत असल्याने चेन्नईच्या फलंदाजीला मर्यादा आल्या आहेत का? –

गतवर्षी चेन्नई सुपर किंग्जच्या विजेतेपदात महाराष्ट्राच्या ऋतुराजचा सिंहाचा वाटा होता. त्याने १६ सामन्यांत ६३५ धावा काढून फलंदाजांमध्ये अग्रस्थान मिळवले हाेते. त्यामुळे चेन्नईच्या कर्णधारपदाच्या उमेदवारांमध्ये ऋतुराजचे नावही घेतले जात होते. मात्र गतवर्षी फटकेबाजी करणारा हाच ऋतुराज यंदा धावांसाठी झगडताना आढळत आहे. चार सामन्यांत त्याच्या खात्यावर फक्त १९ धावा जमा आहेत. १, १, १, १६ धावा त्याने केल्या आहेत. हे चेन्नईच्या अपयशामागील एक महत्त्वाचे कारण आहे.

फलंदाजीतील अपयश चेन्नईच्या चिंतेचे कारण आहे का? –

चेन्नईच्या संघाला प्रामुख्याने फलंदाजीची चिंता भेडसावते आहे. कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात चेन्नईला ४ बाद १३१ धावाच करता आल्या. त्यानंतर पंजाब किंग्जविरुद्ध १८ षटकांत १२८ धावांत त्यांचा डाव संपुष्टात आला, तर सनरायजर्स हैदराबादसारख्या दुबळ्या संघाविरुद्ध त्यांनी ७ बाद १५४ अशी धावसंख्या उभारली. रॉबिन उथप्पा आणि महेंद्रसिंह धोनी यांनी एकेक सामन्यांत अर्धशतके झळकावली. पण उथप्पा, धोनी, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो हे अनुभवी शिलेदार संघाला विजयापर्यंत नेण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे चेन्नईच्या फलंदाजीची भिस्त शिवम दुबे आणि मोईन अली यांच्यावर आहे.

संघाच्या गोलंदाजीच्या फळीत कोणत्या उणिवा आहेत? –

वेगवान गोलंदाज दीपक चहर आणि ॲडम मिल्ने यांच्या दुखापतीमुळे चेन्नईच्या गोलंदाजीवर गंभीर परिणाम झाला आहे. गतवर्षी चहरने चेन्नईच्या यशात सर्वाधिक १४ बळींचे योगदान दिले होते. चहर अद्याप दुखापतीतून सावरलेला नाही. तर मिल्नेला कोलकाताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात दुखापत झाली होती. अष्टपैलू ड्वेन ब्राव्होने चेन्नईकडून सर्वाधिक सहा बळी मिळवले आहेत. परंतु ब्राव्हो (४ सामन्यांत ११६ धावा), मुकेश चौधरी (४ सामन्यांत १२१ धावा, २ बळी) आणि रवींद्र जडेजा (४ सामन्यांत १०१ धावा, १ बळी) हे महागडे ठरले आहेत. हाणामारीच्या षटकांत टिच्चून गोलंदाजी करणाऱ्या ख्रिस जॉर्डनने अपेक्षांची पूर्तता केलेली नाही. त्याने दोन सामन्यांत ५७ धावा देत २ बळी घेतले आहेत. तुषार देशपांडे गतवर्षीच्या कामगिरीची पुनरावृत्ती करू शकलेला नाही.

गतवर्षीच्या विजेत्या चेन्नईने महालिलावात आणि त्याआधी खेळाडू कायम ठेवण्याच्या प्रक्रियेत संघरचना साधताना कोणत्या चुका केल्या?

सॅम करनने (गतवर्षी ९ सामन्यांत ९ बळी) दुखापतीमुळे यंदाच्या ‘आयपीएल’ लिलावाआधीच खेळणार नसल्याचे स्पष्ट केले. चहर (गतवर्षी १५ सामन्यांत १४ बळी) दुखापतीतून अद्याप सावरलेला नाही. पण या दोन खेळाडूंशिवाय संघरचना साधताना केलेल्या असंख्य चुका चेन्नईसाठी धोकादायक ठरल्या. गतहंगामात १६ सामन्यांत ६३३ धावा काढणाऱ्या फॅफ ड्यूप्लेसिसला ते संघात घेऊ शकले नाहीत. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने त्याला संघात स्थान दिले. ड्यूप्लेसिस हा कर्णधारपदासाठी उत्तम पर्याय ठरू शकला असता. चेन्नईच्या यशात सर्वाधिक एकूण २१ बळी घेणाऱ्या वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरनेही महत्त्वाची भूमिका बजावली होती. परंतु ठाकूर यंदा दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने गतहंगामात ९ सामन्यांत ११ बळी मिळवले. पण हेझलवूडही यंदा बंगळूरुकडून खेळत आहेत.