शैलजा तिवले
राज्यभरात करोना संसर्गाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून त्यामागे ओमायक्रॉनचा उपप्रकार बी.ए.२ याचे अन्य उपप्रकार कारणीभूत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ओमायक्रॉनच्या उपप्रकारांमुळे करोनाची बाधा होण्याची पुन्हा शक्यता आहे का, चौथी लाट येईल का असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.
ओमायक्रॉनचे उत्परिवर्तन म्हणजे म्युटेशन झाले आहे का?
भारतात करोनाची तिसरी लाट दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या बी.१.१.५२९ या करोनाच्या उत्पपरिवर्तित रूपामुळे आली होती. याला ओमायक्रॉन असे नाव दिले गेले. भारतात तिसऱ्या लाटेमध्ये काळानुरुप टिकून राहण्यासाठी विषाणूच्या या उपप्रकराने स्वतःत बदल केले म्हणजेच म्युटेशन झाले. त्यातून आणखी काही उपप्रकार निर्माण झाले. यातून बी.ए.१.१, बी.ए.२ असे अनेक उपप्रकार आढळले. तिसरी लाट ओसरत असताना बी.ए.२ चे उपप्रकार सर्वांत जास्त आढळत होते. मे महिन्याच्या अखेरीस बी.ए.२ सह बी.ए.२.३८ या उपप्रकाराचे रुग्ण अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. ओमायक्रॉनचेचे बी.ए.४ आणि बी.ए. ५ हे उपप्रकारही नुकतेच राज्यात आढळले आहेत. त्यामुळे मागील पाच महिन्यांमध्ये ओमायक्रॉन या विषाणूचे म्युटेशन होऊन निर्माण झालेले अनेक उपप्रकार राज्यभरात दिसून येत असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी सांगितले.
सध्या राज्यात डेल्टा किंवा मूळ करोनाचा विषाणू अस्तित्वात आहे का?
करोना विषाणू हा तग धरून ठेवण्यासाठी म्युटेशन करत नवे रूप धारण करत आहे. तो जेव्हा नवे रूप धारण करतो, तेव्हा जनक विषाणू जवळपास नष्ट होते आणि नव्या रूपाचा प्रसार होत राहतो, असे या विषाणूच्या दोन वर्षांपेक्षा जास्त काळ असलेल्या वास्तव्यातून निर्दशनास आले आहे. त्यामुळे करोनाने डेल्टाचे रूप धारण केले तेव्हा मूळ करोनाचा विषाणू हळूहळू लोप पावला आणि डेल्टाचा प्रसार जास्तीत जास्त झाला. ओमायक्रॉनच्या बाबतही तेच घडले. ओमायक्रॉनची निर्मिती झाल्यानंतर डेल्टा संपुष्टात आला आहे. मागील काही महिन्यांत केलेल्या जनुकीय चाचण्यांमध्ये डेल्टा आढळलेला नाही. परदेशातून आलेल्या प्रवाशामध्ये क्वचित हा प्रकार आढळतो. पुढच्या ओमायक्रॉनच्या मूळ रूपाबाबतही अशीच स्थिती झाली आहे. ओमायक्रॉनचा बी.१.१.५२९ हा प्रकार नामशेष झाला असून राज्यातील रुग्णांमध्ये बी.ए.२ आणि बी.ए.२.१८ हे उपप्रकारच जास्त आढळत आहेत, असे डॉ. कार्यकर्ते यांनी स्पष्ट केले.
तिसऱ्या लाटेमध्ये ओमायक्रॉनची बाधा झालेल्यांना पुन्हा आता बाधा होणार का?
विषाणूची लागण होणे आणि त्यामुळे आजार होणे यात काही अंशी फरक आहे. ओमायक्रॉनच्या मूळ रूपापासून म्युटेशन होऊन आलेले उपप्रकार वेगळे असल्यामुळे ओमायक्रॉनची बाधा झालेल्या रुग्णाला आता पुन्हा लागण होण्याचा धोका निश्चितच आहे. विषाणू नवे रूप धारण करत असल्यामुळे त्याची पुनर्लागण होते. हा विषाणू दोन वर्षांहून अधिक काळ टिकला आहे. परंतु काळानुरूप त्याचे स्वरूप सौम्य होत असल्यामुळे आजाराचा धोकाही कमी झाला आहे, असे डॉ. कार्यकर्ते यांनी स्पष्ट केले.
मे पासून रुग्णसंख्येत वाढ होण्यामागे म्युटेशन हे कारण आहे का?
करोना विषाणू अंतर्जन्य (एन्डेमिक) स्थितीकडे वाटचाल करत असून संक्रमण वाढण्यामागे त्याच्या प्रकारांमध्ये झालेले बदल म्हणजेच म्युटेशन हे कारण आहेच. त्याचबरोबर वातावरण, समाजातील प्रतिकारशक्ती, नागरिकांचा वावर हे देखील घटक यामागे आहेत. आपल्याकडे मे महिन्यापासून बी.ए.२.३८ हा विषाणूचा उपप्रकार प्रामुख्याने आढळत आहे. त्याचबरोबर मे महिन्यात राज्यच नव्हे तर देशभरात वाढलेले पर्यटन, नागरिकांचा प्रवासही वाढला. तिसरी लाट ओसरून जवळपास तीन ते चार महिन्यांचा कालावधी झाला आहे. तसेच लसीकरणामुळे आलेली प्रतिकारशक्तीही काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे एकूणच समूह प्रतिकारशक्ती काही प्रमाणात क्षीण झाली आहे आणि दुसरीकडे विषाणूचे म्युटेशनही होत आहे, याचा एकत्रित परिणाम म्हणून पुन्हा रुग्णसंख्या वाढताना दिसत असल्याचे राज्याचे साथरोग सर्वेक्षण विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.
सध्याचा करोना प्रादुर्भाव कितपत गंभीर आहे?
करोनाचा प्रादुर्भाव मुंबई, ठाणे आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणात आहे. अन्य जिल्ह्यांमध्ये त्याचे प्रमाण अद्याप तरी तुलनेने कमी आहे. बी.ए.२..३८ या विषाणूचा प्रसार जास्त प्रमाणात असला तरी त्याची तीव्रता कमी आहे. रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे सध्याचे करोना संक्रमण हे तुलनेने सौम्य आहे. संसर्गाची लागण रोखणे शक्य नसले तरी त्याची तीव्रता कमी राहण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे असून नागरिकांनी लसीकरण पूर्ण करणे गरजेचे असल्याचे मत डॉ. कार्यकर्ते यांनी मांडले आहे. सध्या रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांमध्ये ६० वर्षांवरील नागरिकांचा समावेश आहे. त्यामुळे या नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अधिक खबरदारी घेणे महत्त्वाचे असल्याचे डॉ. आवटे यांनी सांगितले.
बी.ए.४ आणि बी.ए.५ या नव्या उपप्रकारांची तीव्रता अधिक आहे का?
राज्यात बी.ए.४ आणि बी.ए.५ हे विषाणूचे उपप्रकार जूनमध्येच आढळले आहेत. याचे प्रमाण अद्याप तरी तुरळक आहे. सध्या आढळलेल्या रुग्णांमध्ये याची तीव्रता फारशी आढळलेली नाही. जून महिन्यातील नमुन्यांच्या तपासणीमध्ये याबाबत अधिक माहिती मिळू शकेल. विषाणूचा प्रकार कोणताही असला तरी मुखपट्टीचा वापर आणि लसीकरण या दोन मार्गांनी संसर्ग प्रसार रोखणे शक्य असल्याचे डॉ. कार्यकर्ते यांनी सांगितले. लस घेतलेल्यांनाही बी.ए.४ आणि बी.ए.५ ची बाधा झाल्याचे आढळले आहे. याचा अर्थ हा विषाणू लशीलाही जुमानत नाही. लसीकरणामुळे विषाणूच्या प्रसारास प्रतिबंध नसला तरी या रुग्णांमध्ये आजाराची तीव्रता कमी असल्याचे प्राथमिकरित्या आढळले आहे. सध्या या रुग्णांची संख्या कमी असल्यामुळे ठोस माहिती समोर येऊ शकलेली नाही. परंतु या विषाणूचा प्रसार वेगाने होत असल्याचे निदर्शनास आले आहे, असे डॉ. आवटे यांनी सांगितले.
राज्यातील रुग्णसंख्या वाढ अशीच राहील का?
दिल्लीमध्ये रुग्णसंख्या वाढली आणि काही कालावधीनंतर पुन्हा कमी झाली. राज्यातही पावसाळ्यामुळे पुढील काही काळ रुग्णवाढ होत राहील. त्यानंतर पावसाळ्यात रुग्णसंख्या स्थिर राहून नंतर कमी होत जाईल. परंतु याची तीव्रता कमी असेल, असे डॉ. आवटे यांनी स्पष्ट केले.