अनिश पाटील
सायबर फसवणूक करणाऱ्या टोळ्या दरवेळी नवनवीन कार्यपद्धतीचा वापर करून नागरिकांची फसवणूक करतात. फसवणुकीसाठी नेहमीच नागरिकांच्या मनातील लोभ अथवा भीतीचा वापर करण्यात येतो. सध्या थकीत वीजदेयकांच्या माध्यमातून ग्राहकांना लक्ष्य करण्यात येत आहे. वीज देयक थकल्याचा संदेश पाठवून सामान्य नागरिकांची फसवणूक केली जात आहे. वीज देयक थकल्यामुळे वीज कापली जाईल या भीतीपोटी अनेकजण या फसवणुकीला बळी पडत आहेत. गेल्या काही दिवसांत फसवणुकीच्या या प्रकारामध्ये वाढ झाली आहे. हे भामटे नेमक्या कोणत्या पद्धतीने फसवणूक करतात? आपण त्यापासून कसे वाचू शकतो? हे जाणून घेणे महत्त्वाचे…
कोणत्या प्रकारचे फसवणुकीचे संदेश येतात?
वीज कंपन्यांच्या नावाने वीज ग्राहकांना संदेश येतात. त्यात तुम्ही गेले दोन महिने वीज देयक किंवा वीज बिल न भरल्यामुळे तुमच्या घराचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे, असे नमूद केलेले असते. संदेशात संपर्क म्हणून एका व्यक्तीचा दूरध्वनी क्रमांक दिला जातो. ही व्यक्ती नंतर स्वतःला वीज कंपनीचा अधिकारी असल्याचे सांगून फसवणूक करते.
यात नेमके काय घडते?
मुंबईतील विक्रोळी परिसरातील महिलेला मोबाइलवर एक संदेश आला. या संदेशात थकीत वीज बिल भरावे लागणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. काही वेळाने त्यांना दूरध्वनी आला. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने आपण खासगी विद्युतपुरवठा कंपनीतील कर्मचारी असल्याचे सांगून वीज बिलाची माहिती अद्ययावत करण्यासाठी ११ रुपये भरावे लागतील, असे सांगितले. त्यासाठी गुगल प्लेस्टोरवर जाऊन ‘एनी डेस्क’ नावाचे ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्याची सूचना त्याने तक्रारदारांना केली. त्यानंतर ‘एनी डेस्क’ डाऊनलोड करून तक्रारदार महिलेने त्यांच्या डेबिट कार्डद्वारे ११ रुपये ऑनलाइल भरले. त्यानंतर तक्रारदार महिलेला त्यांच्या बँक खात्यातून रक्कम काढल्याचे चार संदेश प्राप्त झाले. त्याद्वारे अनुक्रमे ५९ हजार, ५९ हजार ५००, ६० हजार व ६० हजार रुपयांचे व्यवहार त्यांच्या बँक खात्याद्वारे करण्यात आले. तक्रारदार महिलेने तात्काळ बँकेशी दूरध्वनीवरून संपर्क साधून कार्ड बंद करण्यास सांगितले. पण त्यापूर्वी या महिलेच्या बँक खात्यातून दोन लाख ३८ हजार रुपये हस्तांतरित करण्यात आले होते. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पार्क साईट पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
कशी केली जाते फसवणूक?
वीज पुरवठा खंडित होत असल्याचे समजल्यानंतर सामान्य नागरिक तात्काळ संदेशात दिलेल्या क्रमांकावर दूरध्वनी करतात. फसवणूक करणारे, यंत्रणेत ही माहिती अद्ययावत झाली नसल्यामुळे असा प्रकार घडल्याचे सांगतात. ती माहिती अद्ययावत करण्यासाठी ‘एनी डेस्क’, ‘टीम व्ह्युवर’सारखे ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगतात. त्याच्या माध्यमातून मोबाइलवर नियंत्रण मिळवले जाते. या ॲप्लिकेशनमुळे आरोपीला मोबाइलमधील सर्व व्यवहार दिसतात. त्यामुळे आरोपी दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या बँकेतून पाच अथवा १० रुपये वीज कंपनी देयक खात्यावर पाठवण्यास सांगतो. तो व्यवहार एनी डेस्कमुळे त्याला पाहता येतो. त्यामुळे आरोपीला बँक खात्याचा पासवर्डही मिळतो. अशा प्रकारे बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवली जाते. विशेष म्हणजे मोबाइलवर येणारा ओटीपीचा संदेशही आरोपीला दिसत असल्यामुळे त्यामार्फत बँक खात्यातून रक्कम काढली जाते.
गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे…
वीज देयकाच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. संपूर्ण राज्यात दर आठवड्याला किमान शंभर तक्रारी पोलिसांना प्राप्त होत आहेत. एकट्या मुंबईत मे महिन्यापर्यंत ६३२ क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले होते. त्यातील बहुसंख्य गुन्हे हे वीज बिल देयक फसवणुकीचे आहेत. या प्रकरणातील बहुसंख्य टोळ्या परराज्यातून फसवणूक करत आहेत. त्यामुळे सायबर पोलीसही काही प्रकरणांमध्ये समांतर तपास करत आहेत.
काय काळजी घ्यावी?
या क्षेत्रातील अनेक विश्लेषकांच्या मते पुढील काही पथ्ये पाळल्यास अशा प्रकारे फसवणूक टाळता येऊ शकेल. ही पथ्ये अशी – ऑनलाइन वीज देयक भरताना विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कोणत्याही व्यक्तीच्या सांगण्यावरून बँक व्यवहार करणे टाळावे. याशिवाय वीज बिलाची, बँक खात्याची माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नये. तसेच अनोळखी क्रमाकांवरून पाठवण्यात आलेल्या लिंक, अथवा देण्यात आलेल्या माहितीवरुन कोणतेही ॲप्लिकेशन डाऊनलोड करू नये. फसवणूक झाल्यास तात्काळ बँकेशी संपर्क साधून डेबिट अथवा क्रेडिट कार्डवरील व्यवहार बंद करावेत. फसवणुकीला बळी पडल्यास तात्काळ पोलिसांकडे तक्रार करावी. वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्या एनी डेस्कसारखे कोणतेही ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास ग्राहकांना सांगत नाहीत, हे नीट लक्षात ठेवावे.