उद्योगपती गौतम अदानी आज ६० वर्षांचे झाले आहेत. ते आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करतात, एवढच नाही तर ते सामान्य जीवनातही ते ग्लॅमरपासून दूर राहतात. पण व्यावसायिक आघाडीवर त्यांना तोड नाही. गेल्या दोन दशकात त्यांनी आपल्या व्यवसायाचा झेंडा देशात आणि जगभरात फडकवला आहे.
गौतम अदानी नेहमीच राजकारणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणतात, “मला राजकारण आवडत नाही. माझा कोणत्याही राजकीय पक्षाकडे कल नाही. माझे सर्व राजकीय पक्षात मित्र आहेत. पण मी त्याच्याशी राजकारणावर कधीच बोलत नाही. आम्ही फक्त विकासाशी संबंधित विषयांवर चर्चा करतो.”
गौतम अदानी स्पष्टपणे सांगतात की, “मला असे नेते आवडत नाहीत ज्यांच्याकडे दूरदृष्टी नाही आणि ज्यांना फक्त पैसा कमवायचा आहे. मला दूरदृष्टी असलेले नेते आवडतात.”
संकटात घाबरले नाही –
गौतम अदानी अनेक संकटातून बाहेर आले आहेत. नव्वदच्या दशकात गौतम अदानी यांचे अपहरण झाले होते. खंडणीसाठी त्यांचे अपहरण करण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आता त्यांची सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक असते. १९९७ मध्ये त्यांच्या अपहरणाच्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला होता. स्थानिक माफियांच्या गुंडांनी अपहरण केले होते. नंतर त्यांची सुटका करण्यात आली, ही सुटका कशी झाली आणि अपहरण का करण्यात आले याबाबत फारशी माहिती समोर आलेली नाही. त्याचप्रमाणे २६ नोव्हेंबर २००८ च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी ते ताज हॉटेलमध्ये होते आणि तिथून सुखरुप बाहेर पडणाऱ्या शेवटच्या लोकांपैकी एक होते. ताज हॉटेलमध्ये ते जेवणासाठी गेले होते.
गौतम अदानी जीवनातील चढ-उतारांमुळे फारसे खचले नाहीत. त्यांचे म्हणणे आहे की, “मी पैसा येताना-जाताना पाहिला आहे. पैसा आला की फार आनंदी किंवा पैसा गेल्यावर दु:खी व्हायला नको. जे हातात नाही त्याची कोणीही चिंता करू नये, असे माझे मत आहे. नियती स्वतः ठरवेल.”