इंडियन एक्सप्रेसला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार Google ने १६ फेब्रुवारीपासून ४५० कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे, तसा ई-मेल संबंधितांना पाठवल्याचीही माहिती आहे. Alphabet Inc या गुगलच्या मुख्य कंपनीने जगभरात कर्मचाऱ्यांच्या कपातीला सुरुवात करत असल्याची घोषणा केली, सुमारे सहा टक्के म्हणजेच १२ हजार कर्मचाऱ्यांना कमी केलं जाणार आहे. एका वृत्तानुसार ट्वीटरने आधीच भारतातील ९० टक्के कर्मचारी कपात केली असतांना आता बंगळूर व्यतिरिक्त मुंबई आणि दिल्लीतील कार्यालये बंद केली आहेत.
जगभरात सध्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांवर कर्मचारी कपात करण्याची वेळ आली आहे. करोना काळात ऑनलाईन पद्धतीने काम करण्याचे प्रमाण वाढेल याचा अंदाज घेत मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची भरती केली होती.
जगातील दिग्गज कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात
गेल्या काही महिन्यात नोकरी क्षेत्रात मोठे धक्के बसत आहेत, मोठ्या घडामोडी जगभर घडत आहेत. Alphabet ने तब्बल १२ हजार कर्मचाऱ्यांच्या कपातीला सुरुवात केली असतांना Microsoft ही पाच टक्के म्हणजेच दहा हजार कर्मचारी कपात करत असल्याचं सांगितलं आहे. आधी जाहीर केल्यापेक्षा आता तर Amazon तब्बल १८ हजार कर्मचारी कपात करत आहे, तर Salesforce कंपनीने आठ हजार कर्मचारी कपात करत आहे.
करोना काळात जगभरात मोठ्या प्रमाणात ऑनलाईन व्यवहाराचे प्रमाण वाढले. खरेदी व्यवहारांच्या प्रमाणत वाढ झालीच पण कार्यालयीन काम हे मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पद्धतीने होऊ लागले. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात ऑनलाईन कामकाजासाठी कर्मचाऱ्यांची भरती केली.
प्रशिक्षित मनुष्यबळाची मागणी वाढली आणि अशा उपलब्ध मनुष्यबळावर मोठा पैसा खर्च केला जाऊ लागला. विशेषतः याच काळात मोठ्या प्रमाणात जगभरात ऑनलाईन हे प्रमुख लक्ष्य ठेवत स्टार्टअप्सनेही याच क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली.
मात्र करोनाचा काळ ओसरला, दैनंदिन व्यवहार जगभरात सुरळीत सुरु झाले, जेवढी गुंतवणूक विविध कंपन्यांनी ऑनलाईन क्षेत्रात केली होती त्या तुलनेत अपेक्षीत परतावा मिळेनासा झाला, त्यातच रशियाने युक्रेनवर अतिक्रमण केले. त्यामुळे धोक्याची घंटा वाजू लागली, २०२३ मध्ये मंदी येणार असल्याचे संकेत द्यायला सुरुवात झाली.
देशातील स्टार्टअप्समध्ये गुतवणूकीचं प्रमाण घटलं
भारतातील विविध स्टार्टअप्सनेलाही मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. Swiggy नेही कर्मचारी कपात केली आहे. गेल्या आठ वर्षात ShareChat ने मोठी प्रगती केली असली तरी बाहेरील विविध घटकांच्या परिणाम हा किंमतीवर झाला असल्याचं ShareChat ने म्हंटलं आहे. Ola नेही दोन हजार पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.
GoMechanic’s चे संस्थापक Amit Bhasin यांच्या म्हणण्यानुसार येत्या काळात बदलत्या परिस्थतीमुळे स्टार्टअप्समध्ये ७० टक्क्यांपर्यंत कर्मचारी कपात होऊ शकते, खर्चावर मोठी बंधने येऊ शकतात. भांडवली खर्चाचे व्यवस्थापन आणि आर्थिक अहवाल यांचा योग्य ताळमेळ घालण्याची आवश्यकता आहे अशा आशयाचेही त्यांनी LinkedIn post मध्ये नमूद केले आहे.