केंद्र सरकारकडून २७ मे रोजी आधार कार्डबाबत एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले होते. तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स कोणालाही देऊ नका, त्याचा गैरवापर होऊ शकतो, असे या प्रसिद्धीपत्रकात म्हटले होते. मात्र आता सरकारकडून याचे खंडन करण्यात आले आहे. सरकारने यासंदर्भात नवीन प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.
“फोटोशॉप केलेल्या आधार कार्डच्या गैरवापराच्या संदर्भात ते प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आली होती. प्रसिद्धीपत्रकामध्ये, लोकांना त्यांच्या आधारच्या फोटोकॉपी कोणत्याही संस्थेला देऊ नका, कारण त्याचा गैरवापर होऊ शकतो असा सल्ला देण्यात आला आहे. वैकल्पिकरित्या, मास्क्ड आधार वापरले जाऊ शकते ज्यामध्ये आधार क्रमांकाचे फक्त शेवटचे ४ अंक दिसतात. तूर्तास, प्रसिद्धीपत्रकाचा चुकीचा अर्थ लावण्याची शक्यता लक्षात घेऊन, ते तात्काळ प्रभावाने मागे घेत आहोत,” असे नवीन प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
सरकारचे म्हणणे आहे की, याआधीच्या प्रसिद्धीपत्रकात ज्या गोष्टी सांगितल्या होत्या, त्यामुळे लोकांचा गैरसमज होत आहे. त्यामुळे ते प्रसिद्धीपत्रक मागे घेण्यात आले आहे आणि आजवर ज्या प्रकारे आधारचा वापर केला जात आहे, तसाच करण्यात येत राहील.
आधीच्या प्रसिद्धीपत्रकात काय म्हटले होते?
आधार कार्ड जारी करणाऱ्या युआयडीएआयने आधार कार्ड धारकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. जर तुम्ही आधार कार्डची झेरॉक्स कोणालाही दिलीत तर तुमच्या आधारचा गैरवापर होऊ शकतो. केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान विभागातंर्गत येणाऱ्या युआयडीएआयने यासंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केलं होतं. नागरिकांनी पूर्ण आधार नंबर असलेल्या आधार कार्डची प्रत कोणत्याही संस्थेला देऊ नये. कारण त्याचा गैरवापर होऊ शकतो. त्याऐवजी मास्क्ड आधारचा वापर करावा, असं सरकारनं म्हटलं होतं
मंत्रालयाने या आधी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले होते की ज्या संस्थांना युआयडीएआय कडून वापरकर्ता परवाना मिळाला आहे तेच व्यक्तीची ओळख पडताळण्यासाठी आधार कार्ड वापरू शकतात. परवाना नसलेल्या संस्थांना ही परवानगी नाही. निवेदनामध्ये असे म्हटले होते की, जर कोणत्याही खाजगी संस्थेने तुमचे आधार कार्ड पाहण्याची मागणी केली किंवा तुमच्या आधार कार्डची फोटोकॉपी मागितली, तर त्यांच्याकडे युआयडीएआयकडून वैध वापरकर्ता परवाना आहे की नाही ते तपासा.
मास्क्ड आधार काय आहे?
केंद्र सरकारने आधार कार्ड ऐवजी मास्क्ड आधार वापरण्यास सांगितलं आहे. आधार कार्डवर नागरिकाचा संपूर्ण आधार कार्ड दिलेला आहे. तर मास्क्ड आधार कार्डवर आधार नंबरचे शेवटचे चार अंकच दिसतात. मास्क्ड आधार नागरिक ऑनलाईन डाऊनलोड करता येतं.
युआयडीएआयनुसार “मास्क्ड आधारचा पर्याय तुम्हाला तुमच्या डाउनलोड केलेल्या ई-आधारमध्ये आधार क्रमांक लपवण्याची परवानगी देतो. मास्क्ड आधारमध्ये आधार क्रमांकाचे पहिले ८ अंक “xxxx-xxxx” असे लिहिलेले असतात तर आधार क्रमांकाचे फक्त शेवटचे ४ अंक दाखवले जातात.
मास्क्ड आधार कार्ड कसे डाउनलोड करायचे?
मास्क्ड आधार ही तुमच्या आधारची एक प्रत आहे, जी ऑनलाइन किंवा ऑफलाइन वापरली जाऊ शकते. तसेच ती भारतात कुठेही कधीही वापरली जाऊ शकते. युआयडीएआय वेबसाइटला भेट देऊन आणि myaadhaar पर्याय निवडावा. येथे तुम्हाला ‘Do you want a masked Aadhaar’ हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा आणि विनंती केलेली माहिती प्रविष्ट करा. त्यानंतर मास्क आधार कार्ड डाउनलोड करा.