सुवर्ण मंदिरात हार्मोनियम वाजवण्यावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. सुवर्ण मंदिरात यापुढे हार्मोनियम वाजवले जाणार नाही, असा आदेश अकाल तख्तचे जथेदार ग्यानी हरप्रीत सिंह यांनी दिला आहे. यासाठी त्यांनी शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीला तीन वर्षांची मुदत दिली आहे. कीर्तनाच्या वेळी पारंपारिक वाद्ये वाजवली जावीत म्हणून सुवर्णमंदिरातून हार्मोनियम काढून टाकण्यात यावे, असे हरप्रीत सिंग यांनी म्हटले आहे.
हार्मोनिअमचा इतिहास
१७०० च्या दशकात युरोपमध्ये जन्मलेल्या, हार्मोनियमध्ये आज आपल्याला माहीत असलेले वाद्य बनण्यासाठी अनेक बदल झाले आहेत. कोपनहेगन विद्यापीठातील फिजियोलॉजीचे प्राध्यापक ख्रिश्चन गॉटलीब क्रॅटझेनस्टाईन यांनी याचा पहिला नमुना तयार केला असल्याचे मानले जाते. त्यानंतर बदल झाले आणि १८४२ मध्ये अलेक्झांडर डेबेन नावाच्या फ्रेंच संशोधकाने हार्मोनियच्या डिझाइनचे पेटंट घेतले आणि त्याला ‘हार्मोनियम’ म्हटले. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात पाश्चात्य व्यापारी किंवा मिशनऱ्यांनी ते भारतात आणले होते. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, भारतात हाताने वाजवले जाणारे हार्मोनियम १८७५ मध्ये कोलकाता येथील द्वारकानाथ घोष यांनी बनवले होते.
हार्मोनियम का नको?
हार्मोनियम शीख परंपरेचा भाग नाही असे अकाल तख्तचे मत आहे. हे ब्रिटीशांनी आणले होते आणि ते भारतीय संगीतावर लादले गेले आहे. अकाल तख्त म्हणते की सुवर्ण मंदिरात कीर्तन आणि गुरबानी गायली जाते तेव्हा हार्मोनियमऐवजी पारंपारिक वाद्ये वाजवली जावीत.
द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, “हार्मोनियम इंग्रजांनी लादला होता. आम्ही अकाल तख्तच्या जथेदारांची भेट घेतली आणि तंतुवाद्यांचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी केली. ते या दिशेने पावले उचलत आहेत हे चांगले आहे,” असे बलवंत सिंह नामधारी म्हणतात.
सुवर्ण मंदिरात दररोज १५ रागी जथ्ते किंवा भजन गायकांचा समूह ३१ रागांपैकी एक राग २० तास गातो. दिवस आणि ऋतू लक्षात घेऊन रागांची निवड केली जाते. शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समिती (SGPC) अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यापैकी फक्त पाच गटांना रबाब आणि सारंडा यांसारखी तंतुवाद्ये कशी वाजवायची हे माहीत आहे. शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समिती संचलित महाविद्यालयांमधील गुरुमत संगीताच्या २० हून अधिक विभागांपैकी बहुतेकांनी अलीकडेच तार वाद्ये शिकवण्यास सुरुवात केली आहे.
मात्र, अकाल तख्तच्या या निर्णयाशी प्रत्येकजण सहमत नाही. द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, भारतीय शास्त्रीय संगीत आणि गुरुमत संगीतात पारंगत असलेल्या पंजाब विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. अलंकार सिंग म्हणतात की, तंतुवाद्यांना वाजवण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे, परंतु हार्मोनियम वाजवणे बंद करणे योग्य होणार नाही.
“१९०१ किंवा १९०२ मध्ये हरमंदिर साहिबमध्ये पहिल्यांदा हार्मोनियम वाजवण्यात आले होते असे म्हणतात. हार्मोनिअम आणि स्ट्रिंग दोन्ही वाद्ये वापरणारे कीर्तनी जथे आहेत आणि ते उत्तम सादरीकरण करतात,” असे अलंकार सिंग म्हणाले.
अकाल तख्त म्हणजे काय?
अकाल तख्त ही शीखांची सर्वोच्च धार्मिक संस्था आहे. अकाल तख्त साहिब म्हणजे शाश्वत सिंहासन. या तख्त गुरुद्वाराची स्थापना अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात झाली. हे अमृतसरच्या सुवर्ण मंदिर संकुलाचा एक भाग आहे. त्याची पायाभरणी शिखांचे सहावे गुरु श्री गुरु हरगोविंद साहिब यांनी १६०९ मध्ये केली होती. अकाल तख्त हे पाच तख्तांपैकी पहिले आणि सर्वात जुने आहे.