प्रशांत केणी
कर्णधारपद सोडल्यानंतर फलंदाज म्हणूनही विराट कोहली तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये धावांसाठी झगडताना आढळत आहे. कारकीर्दीतील अखेरचे शतक झळकावून पावणेतीन वर्षांचा काळ लोटला आहे. त्यामुळे कोहलीचे भारताच्या तिन्ही संघांमधील स्थान धोक्यात आल्याची स्पष्ट चिन्हे आहेत. नवे पर्याय उपलब्ध झाल्यामुळे ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठीसुद्धा कोहलीच्या निवडीबाबत शंका निर्माण झाली आहे. गतवर्षी संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातील भारताच्या कामगिरीची जबाबदारी घेत कोहलीने फलंदाजीकडे अधिक लक्ष केंद्रित करता यावे, म्हणून कर्णधारपद सोडले. परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मर्यादित षटकांच्या दोन्ही प्रकारांसाठी एकच कर्णधार असावा म्हणून एकदिवसीय कर्णधारपदसुद्धा त्याच्याकडून काढून रोहित शर्माकडे सोपवले. मग चालू वर्षाच्या पूर्वार्धात झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत १-२ अशी भारताने हार पत्करल्यामुळे कोहलीने कसोटीचे कर्णधारपदसुद्धा सोडले. पण तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधील कर्णधारपद सोडणाऱ्या कोहलीचा फलंदाजीचा सूरही हरवला आहे. या मुद्द्यांचा घेतलेला आढावा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कर्णधारपद सोडल्यानंतर कोहलीच्या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधील कामगिरीवर परिणाम झाला आहे का?

कर्णधारपद सोडल्यानंतर कोहलीच्या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधील कामगिरीत निश्चितच घसरण झाली आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकामधील खराब कामगिरीमुळे कोहलीने भारताचे कर्णधारपद सोडले. परंतु ‘बीसीसीआय’ने मर्यादित षटकांच्या दोन्ही क्रिकेटसाठी एकच कर्णधार असावा, या धोरणासाठी त्याचे एकदिवसीय क्रिकेटचे कर्णधारपदही काढून घेतले. ट्वेन्टी-२० क्रिकेटचे कर्णधारपद सोडल्यानंतर विंडीजविरुद्ध दोन आणि इंग्लंडविरुद्ध दोन अशा चार सामन्यांत त्याने प्रतिनिधित्व केले. यात २०.२५च्या धावसरासरीने त्याने एकूण ८१ धावा (१७, ५२, १, ११) काढल्या आहेत. परंतु त्याची ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील धावसरासरी ५०.१२ अशी आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन आणि विंडीजविरुद्ध तीन अशा एकूण सहा सामन्यांत कोहलीने २३.६६च्या सरासरीने फक्त १४२ धावा (५१,०, ६५, ८, १८, ०) केल्या आहेत. परंतु त्याची एकदिवसीय क्रिकेटमधील एकूण सरासरी ५८.०७ धावा अशी आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका गमावल्यानंतर कसोटी क्रिकेट कर्णधारपद सोडणारा कोहली नंंतर श्रीलंकेविरुद्ध दोन आणि इंग्लंडविरुद्ध एक असे एकूण तीन कसोटी सामने खेळला. या सामन्यांत एकूण ११२ (४५, २३, १३, ११, २०) धावा केल्या. त्याच्या कसोटी कारकीर्दीतील फलंदाजीची सरासरी ४९.५३ आहे. पण या तीन सामन्यांची सरासरी २२.४ धावांपर्यंत घसरली आहे.

‘आयपीएल’मधील कामगिरीसुद्धा घसरली का?

यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये कोहलीने राॅयल चॅलेंजर्स बंगळूरुचे कर्णधारपदही सांभाळले नव्हते. त्याने यंदा १६ सामन्यांत २२.७३च्या सरासरीने एकूण ३४१ धावा काढल्या. यात फक्त दोन अर्धशतकांचा समावेश होता. याआधीच्या चार हंगामांचा (२०१८-२०२१) आढावा घेतल्यास त्याने अनुक्रमे ५३० (सरासरी ४८.१८), ४६४ (सरासरी ३३.१४), ४६६ (सरासरी ४२.३६) आणि ४०५ (सरासरी २८.९२) धावा केल्या होत्या. या ‘आयपीएल’मध्ये तो तीनदा पहिल्या चेंडूवर बाद झाला.

कोहलीला शतकाचाही दुष्काळ भेडसावतो आहे?

सचिन तेंडुलकरचा १०० शतकांचा विक्रम हा भारतीय फलंदाज कोहली मोडेल, असे भाकीत काही वर्षांपूर्वी सुनील गावस्कर यांनी केले होते. नोव्हेंबर २०१९मध्ये कोहलीने बांगलादेशविरुद्ध एकंदर ७०वे शतक झळकावले होते. त्यावेळी त्याच्या खात्यावर २७ कसोटी आणि ४३ एकदिवसीय शतके होती. परंतु त्यानंतर तिन्ही प्रकारच्या क्रिकेटसह ‘आयपीएल’मध्येही कोहलीला शतक नोंदवता आलेले नाही. येत्या नोव्हेंबरमध्ये कोहलीच्या ‘शतकदुष्काळाला’ तीन वर्षे पूर्ण होतील.

कोहलीच्या खराब कामगिरीबाबत माजी क्रिकेटपटूंनी त्याला कोणते सल्ले दिले किंवा त्याच्यावर शरसंधान साधले?

‘‘जर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कसोटी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला कसोटी संघातून वगळता येत असेल तर ट्वेन्टी-२०मधील अग्रस्थानावरील फलंदाजालाही वगळले पाहिजे,’’ अशा शब्दांत माजी कर्णधार कपिल देव यांनी कोहलीच्या कामगिरीवर शरसंधान साधले आहे. ‘‘खराब काळ प्रत्येक क्रिकेटपटूच्या कारकीर्दीत येतो. परंतु विराट अनुभवतो आहे, तितका वाईट यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. यातून त्याने तांत्रिक किंवा मानसिकदृष्ट्या मार्ग काढावा,’’ असा सल्ला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने त्याला सल्ला दिला.

तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये कोहलीच्या स्थानासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत?

ट्वेंटी-२०२० क्रिकेट प्रकारात कोहलीच्या तिसऱ्या स्थानासाठी दीपक हुडाने भक्कम दावेदारी केली आहे. याशिवाय सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर आणि हार्दिक पंड्या हेसुद्धा पर्याय उपलब्ध आहेत. हुडाने मिळालेल्या संधीचा फायदा घेत श्रीलंका, आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या चार सामन्यांत २०५ धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोहलीच्या तिसऱ्या स्थानासाठी केएल राहुल, श्रेयस अय्यर तसेच कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या स्थानासाठी श्रेयस, हनुमा विहारी आणि ऋषभ पंत हे पर्याय उपलब्ध आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained has virat kohli usefulness end in all three forms of cricket print exp abn