एचआयव्ही (HIV) म्हणजेच ह्यूमन इम्यूनो डेफिशिएन्सी व्हायरस. याच व्हायरसमुळे एड्सचा फैलाव होतो. या आजारावर आतापर्यंत कोणताही ठोस उपचार उपलब्ध झालेला नाही. औषधं आणि पूर्वकाळजी घेत याचा प्रसार रोखला जाऊ शकतो. पण इस्त्रायलमधील काही संशोधकांना एचआयव्हीवरील उपचारासंबंधी प्राथमिक यश मिळालं आहे. तेल अवीव विद्यापीठातील संशोधकांनी एक नवीन लस तयार केली आहे. ही लस एड्सच्या विषाणूंचा खात्मा करु शकते असा दावा केला जात आहे. ब रक्तगटाच्या पांढऱ्या पेशींपासून ही लस विकसित करण्यात आली आहे. ही लस एचआयव्हीविरोधात प्रतिकारशक्ती तयार करण्यात यशस्वी ठरली आहे.

संशोधकांचा अभ्यास ‘नेचर’ जर्नलमध्ये छापून आला आहे. यामध्ये या लसीमुळे निर्माण झालेली प्रतिकारशक्ती सुरक्षित आणि परिमाणकारक असल्याचं सांगितलं आहे. ही प्रतिकारशक्ती फक्त संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजार ज्याप्रमाणे कॅन्सरसारख्या आजारांवरही परिणामकारक आहे.

लस कशी काम करते?

ही एक नवी प्रचारपद्धती असल्याचा संशोधकांचा दावा आहे. तसंच फक्त एका इंजेक्शनने विषाणूंचा खात्मा होईल असाही दावा केला जात आहे. बी-सेल्स या एक प्रकारच्या पांढऱ्या पेशी असतात ज्या शरिरात विषाणूंविरोधात प्रतिकारशक्ती निर्माण करतात. या पेशी अस्थिमज्जामध्ये (बोनमॅरो) तयार होतात. परिपक्व झाल्यानंतर या पेशी रक्तात पोहोचतात. यानंतर त्या शरिरातील वेगवेगळ्या भागात पोहोचतात.

संशोधकांनी याच बी-सेल्सच्या जनुकांमध्ये बदल करत विषाणूंशी संपर्क साधला आहे. ज्यामुळे विषाणूंचा प्रभाव कमी होत गेला. संशोधनात सांगितलं आहे की, विषाणूंमध्ये होणाऱ्या बदलासोबत बी-सेल्समधील क्षमतेतही बदल होत आहेत.

संशोधकांच्या टीममध्ये सहभागी डॉक्टर बार्जेल यांनी नेचर जर्नलमध्ये सांगितलं आहे की, “संशोधन केलं असता चांगले परिणाम समोर आले आहेत. शरीरातील प्रतिकारशक्ती वाढली असून एचआयव्हीचे विषाणू निष्क्रीय करण्यास सक्षम ठरत आहे”.

एचआयव्हीमुळे ३.६३ कोटी लोकांचा मृत्यू

एचआयव्ही संपूर्ण जगासाठी एक मोठी समस्या आहे. एचआयव्हीसाठी अनके गोष्टी कारणीभूत आहेत. एड्सचा फैलाव होण्यासाठी सर्वात मोठं कारण असुरक्षित लैंगिक संबंध मानलं जातं. याशिवाय एचआयव्हीची लागण झालेल्या व्यक्तीच्या रक्ताशी संपर्क आल्यानंतरही संसर्ग होऊ शकतो. गर्भवती असताना किंवा गर्भधारणेवेळी मातेला एड्स असल्यास बाळालाही त्याची लागण होऊ शकते.

बंगळुरुमधील अपोलो रुग्णालयाचे डॉक्टर विनय यांनी लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत उच्च रक्तदाब किंवा मधुमेह यांसारख्या आजारांप्रमाणे यावर नियंत्रण ठेवलं जाऊ शकतं असं सांगितलं.

“जेव्हा एचआयव्ही प्रतिकारशक्तीच्या पेशी कमी करतो आणि प्रतिकारशक्ती कमी होऊ लागते, तेव्हा शरीरात सीडी ४ ची (संसर्गाशी लढा देणाऱ्या पांढऱ्या रक्तपेशी) संख्या कमी होऊ लागते. सीडी ४ ची संख्या ५०० पेक्षा जास्त असली पाहिजे. जेव्हा ही संख्या २०० पेक्षा कमी होते तेव्हा एचआयव्ही संसर्गाला आपण एड्स म्हणतो. संसर्ग कोणत्याही लक्षणाविनाही होऊ शकतो,” अशी माहिती डॉक्टर विनय यांनी दिली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, एचआयव्हीमुळे आतापर्यंत ३ कोटी ६३ लोकांचा मृत्यू झाला आहे. २०२० च्या अखेरपर्यंत जगभरातील ३ कोटी ७७ लाख लोकांना एचआयव्हीची लागण झाली होती. फक्त २०२० मध्ये ६ लाख ८० हजार लोकांचा एचआयव्हीमुळे मृत्यू झाला आणि १५ लाख लोकांना संसर्ग झाला होता.