अनिकेत साठे
भारतीय भूमीतून अपघाताने डागले गेलेले क्षेपणास्त्र थेट पाकिस्तानच्या हद्दीत १२४ किलोमीटर आतमध्ये कोसळल्याच्या घटनेबद्दल संरक्षण मंत्रालयाने खेद व्यक्त केला आहे. नियमित देखभालीवेळी तांत्रिक दोषामुळे हा प्रकार घडला. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या क्षेपणास्त्राने आपल्या हवाई हद्दीेचे उल्लंघन झाले, शिवाय विमान वाहतूक सुरक्षा निकषांचे पालन झाले नसल्याचा आक्षेप पाकिस्तानकडून घेतला जात आहे. शांतता काळात क्षेपणास्त्राचे भरकटणे, काही प्रश्न निर्माण करणारे नक्कीच आहे.
नेमके काय घडले ?
नऊ मार्च रोजी सायंकाळची ही घटना आहे. दैनंदिन देखभालीवेळी तांत्रिक बिघाडामुळे हे क्षेपणास्त्र उडाले. उड्डाणादरम्यान त्याने अकस्मात दिशा बदलून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केला. त्या देशातील खनेवाल जिल्ह्यातील मियान चुन्नू भागात ते कोसळले. संरक्षण मंत्रालयाने खेद व्यक्त करीत या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे स्पष्ट केले आहे. यात जीवितहानी झाली नसल्याने ही दिलासादायक बाब. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार भारतातील सिरसा येथून हे क्षेपणास्त्र डागले गेले. ध्वनीहून अधिक वेगाने (स्वनातीत) ते ४० हजार फूट उंचीवरून मार्गक्रमण करीत होते. प्रारंभी महाजन फायरिंग रेंजच्या दिशेने निघालेल्या क्षेपणास्त्राने ७० ते ८० किलोमीटऱच्या प्रवासानंतर उंची, वेग कायम राखत दिशा बदलली. वायव्येकडून ते पाकिस्तानी हवाई हद्दीत शिरले. अशा घटनेमुळे प्रवासी विमान अपघात, नागरिकांचे जीवन धोक्यात येऊ शकते, यावर बोट ठेवले जात आहे. क्रुझ प्रकारातील हे कोणते क्षेपणास्त्र होते, याचा मात्र दोन्ही देशांनी खुलासा केलेला नाही.
पाकिस्तानकडून आयुधासारखा वापर?
तांत्रिक दोषामुळे डागल्या गेलेल्या आणि भरकटलेल्या भारतीय क्षेपणास्त्राचा पाकिस्तान आयुधासारखा वापर करणार हे उघड होते. तसेच घडले. पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाने उडत्या हवाई घटकाने केवळ नागरी मालमत्तेचे नुकसानच नव्हे तर, जीवितहानी होण्याची शक्यता होती, याकडे लक्ष वेधत तीव्र निषेध नोंदविला. या घटनेत आपली हवाई हद्द, आंतरराष्ट्रीय नियम, विमान वाहतूक सुरक्षा निकषांचे उल्लंघन झाल्याची तक्रार केली. त्याचबरोबर याची माहिती अमेरिका, चीन, रशिया, फ्रान्स, ब्रिटनच्या राजदूतांना देण्यात येणार आहे. भारताने या घटनेची सखोल व पारदर्शक चौकशी करावी. त्यातून निष्पन्न होणाऱ्या बाबींची माहिती द्यावी, असा पाकिस्तानचा आग्रह आहे.
क्षेपणास्त्र चाचण्यांची नियमावली काय?
२००५ मध्ये झालेल्या करारानुसार प्रत्येक देशाला क्षेपणास्त्राची चाचणी करताना इतर देशांना तीन दिवस आधीच कल्पना देणे बंधनकारक आहे. तसेच संबंधित देशाला त्या देशातील वैमानिकांसह नौका चालकांना सावधगिरीची पूर्वसूचना प्रसिद्ध करावी लागते. क्षेपणास्त्र डागण्यासाठी निवडलेले स्थळ आंतरराष्ट्रीय सीमारेषा, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून ४० किलोमीटरच्या क्षेत्रात असणार नाही. तसेच जिथे क्षेपणास्त्राचा नियोजित परिणाम होईल, ते ठिकाण देखील आंतरराष्ट्रीय सीमारेषा, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून ७५ किलोमीटरमध्ये राहणार नाही, याची दक्षता घ्यावी लागते. चाचणीवेळी डागलेल्या क्षेपणास्त्राने आंतरराष्ट्रीय सीमारेषा आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडता कामा नये. त्याच्या नियोजित मार्गाने सीमेपासून ४० किलोमीटरचे अंतर राखणे अभिप्रेत आहे. पाकिस्तानच्या हद्दीत चुकून गेलेल्या क्षेपणास्त्राबाबत भारत-पाक लष्करातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या स्तरावर कुठलीही चर्चा झाली नाही. उभय देशात क्षेपणास्त्र चाचणीवेळी माहिती देवाण-घेवाणीचा करार आहे. पण अशा क्षेपणास्त्राबाबत माहिती दिली नसल्याकडे पाकिस्तान लक्ष वेधत आहे. पूर्व नियोजित चाचणी व तांत्रिक दोषाने हवेत उडणारे क्षेपणास्त्र यात फरक आहे.
भरकटण्याच्या शक्यता कोणत्या ?
लष्करी तज्ज्ञांच्या मते क्षेपणास्त्राने दिशा बदलण्याची काही मोजकीच कारणे असू शकतात. हे क्षेपणास्त्र उडाले. त्याने विशिष्ट दिशेने मार्गक्रमण केले. तो मार्ग सामान्य नव्हता. नंतर १०० किलोमीटर गेल्यावर त्याने वेगळ्या दिशेला वळण घेतले. क्रुझ क्षेपणास्त्राला डागण्यावेळी लक्ष्य निश्चित करावे लागते. त्यानुसार ते मार्गक्रमण करते. काही अशीही क्षेपणास्त्र आहेत, जी मार्गक्रमण करताना त्यांच्याशी समन्वय राखून ती अद्ययावत करता येतात. मात्र योग्य समन्वय नसल्यास क्षेपणास्त्र भरकटण्याची शक्यता असते. परंतु, या घटनेत तसे तज्ज्ञांना आढळले नाही. सायबर मार्गाने क्षेपणास्त्र मार्गात कुणी अडथळे आणल्याची साशंकता आहे. क्षेपणास्त्रात काही दोष निर्माण झाल्याचे लक्षात आल्यास ते मार्गक्रमणावेळी हवेत नष्ट करण्याची व्यवस्था असते. संपर्क खंडित झाल्यास ते नष्ट करता येत नाही. क्षेपणास्त्रातील लक्ष्याच्या माहितीत दोष उद्भवल्यास ते वेगळी दिशा घेऊ शकते. सायबर हस्तक्षेप कुणाच्या हिताचे नसल्याचा मुद्दा तज्ज्ञ अधोरेखित करतात. हवेत उडालेल्या क्षेपणास्त्रावर पाकिस्तानने सुरुवातीपासून अखेरपर्यंत बारकाईने नजर ठेवली. आपल्या हवाई हद्दीत प्रवेश करूनही या क्षेपणास्त्राला त्यांनी का रोखले नाही, हादेखील एक प्रश्न आहे.
याआधीही अशा घटना झाल्या आहेत काय?
तांत्रिक दोष, ‘शत्रू-मित्र’ ओळख न पटणे, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सराव न करणे आदी कारणांमुळे जगात क्षेपणास्त्र अनावधानाने डागली गेल्याची उदाहरणे आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानात शिरून बालाकोट कारवाई केल्यानंतर भारत-पाकिस्तानची लढाऊ विमाने परस्परांना शह देण्यासाठी सज्ज होती. तेव्हा बडगाव येथे भारतीय हवाई दलाचे एमआय- १७ हेलिकॉप्टर आपल्याच सुरक्षा दलांनी डागलेल्या क्षेपणास्त्राने पाडले गेले होते. यात हवाई दलाच्या सहा अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. लष्करी चौकशीत दोघांना दोषी ठरवले गेले. चीन-तैवानमधील संघर्ष सर्वश्रुत आहे. २०१६ मध्ये तैवान नौदलातील काहींनी क्षेपणास्त्र डागणाऱ्या यंत्रणेची चाचणी करताना तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले नाही. परिणामी, क्षेपणास्त्र चीनच्या दिशेने डागले गेले. याबद्दल तैवानने तीन जणांना दोषी ठरवले. डेन्मार्कच्या नौदलाकडून १९८२ मध्ये तांत्रिक दोषाने हार्पून क्षेपणास्त्र डागले गेले होते.