अनेक ठिकाणी यासाठी मोठ्या प्रमाणात प्रकल्प देखील उभे करण्यात आले आहेत. मात्र ही प्रक्रिया करण्यासाठी छोट्या प्रमाणातील उपकरणाचीही निर्मिती करण्यात येत आहे. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) मधील संशोधकांनी १० किलोपेक्षा कमी वजनाचे पोर्टेबल डिसेलिनेशन युनिट तयार केले आहे, जे समुद्राच्या पाण्याती वाळूचे कण आणि क्षार काढून टाकू शकते आणि पिण्याचे पाणी तयार करते.
कसे आहे हे उपकरण?
सूटकेसच्या आकाराच्या या डिव्हाइसला वापरण्यासाठी मोबाईल फोन चार्जरपेक्षा कमी शक्ती लागते. हे एका लहान, पोर्टेबल सौर पॅनेलद्वारे देखील चालवले जाऊ शकते, जे सुमारे ५० डॉलरमध्ये (३,८०० रुपये) ऑनलाइन खरेदी केले जाऊ शकते, असे एमआयटीने एका वृत्तात म्हटले आहे. हे उपकरण जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) गुणवत्तेच्या मानकांपेक्षा जास्त योग्य असलेले पिण्याचे पाणी आपोआप तयार करते. एक बटण दाबून हे उपकरण चालवता येते.
इतर पोर्टेबल डिसेलिनेशन उपकरणांमध्ये पाणी फिल्टरमधून जाणे आवश्यक असते. मात्र हे उपकरण पिण्याच्या पाण्यातील कण काढून टाकण्यासाठी विद्युत उर्जेचा वापर करते. यामध्ये फिल्टर बदलण्याची आवश्यकता दूर केल्याने दीर्घकालीन देखभाल करणे मोठ्या प्रमाणात कमी होते. हे उपकरण दुर्गम आणि मर्यादित संसाधनने असलेल्या भागात तैनात केले जाऊ शकते. नैसर्गिक आपत्तीतून पळून जाणाऱ्या निर्वासितांना किंवा दीर्घकालीन लष्करी कारवाया करणाऱ्या सैनिकांना मदत करण्यासाठीही याचा वापर केला जाऊ शकतो, असे एमआयटीच्या अहवालात म्हटले आहे. अमेरिकन केमिकल सोसायटी जर्नल एन्व्हायर्नमेंटल सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये संशोधकांनी या उपकरणाचे वर्णन केले आहे.
“आम्ही या प्रक्रियेमागील भौतिकशास्त्रावर वर्षानुवर्षे काम केले, परंतु त्या सर्व क्रियेला एका बॉक्समध्ये बसवणे, एक प्रणाली तयार करणे आणि त्याचे प्रात्यक्षिक करणे, हा माझ्यासाठी खरोखर अर्थपूर्ण आणि फायद्याचा अनुभव होता,” असे इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग आणि कॉम्प्युटर सायन्स आणि बायोलॉजिकल इंजिनीअरिंगचे प्राध्यापक जॉन्ग्यून हान यांनी म्हटले आहे.
हे उपकरण कसे काम करते?
हे उपकरण आयन कॉन्सट्रेशन नावाच्या तंत्रावर अवलंबून आहे, असे प्रकाशनात म्हटले आहे. पाणी फिल्टर करण्याऐवजी, इलेक्ट्रिक फिल्डमुळे क्षाराचे रेणू, विषाणू यासह सकारात्मक किंवा नकारात्मक चार्ज केलेले कण मागे वाहून जातात. हे कण पाण्याच्या दुसऱ्या प्रवाहात फेकले जातात जे शेवटी बाहेर सोडले जातात. उपकरण त्यातील घन पदार्थ काढून टाकते, स्वच्छ पाण्याच्या वाहिनीमधून जाऊ देते.