करोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा पुढचा टप्पा म्हणून लहान मुलांसाठी तीन नव्या लशींच्या आपत्कालीन वापराला केंद्रीय औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली आहे. त्यात भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन, बायोलॉजिकल इच्या कोर्बिव्हॅक्स आणि झायडसच्या झायकोव्ह-डी या तीन लशींचा समावेश आहे. काल केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री मनसुख मंडाविया यांनी ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली.
कोव्हॅक्सिन लशीचा वापर सहा ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी, तर कोर्बिव्हॅक्स लशीचा वापर पाच ते १२ वर्ष वयोगटातील मुलांसाठी करण्यास केंद्रीय औषध महानियंत्रक कार्यालयाने परवानगी दिली आहे. याचबरोबर झायडस कंपनीतर्फे तयार करण्यात आलेल्या झायकोव्ह डी लशीचा वापर १२ वर्षांवरील मुलांसाठी करणे सुरक्षित असल्याचे चाचण्यांमधून स्पष्ट झाले आहे.
देशभरातील शाळा पुन्हा एकदा प्रत्यक्ष सुरू झालेल्या असताना, काही मुलांमध्ये करोनाची लक्षणं दिसून येत असल्याचे समोर आल्यानंतर सावधगिरीच्या दृष्टीने काल(मंगळवार) केंद्रीय औषध महानियंत्रकांनी (DCGI) पाच वर्षांवरील मुलांच्या सुरक्षेसाठी करोना प्रतिबंधात्मक अशा वरील तीन लशींच्या आपत्कालीन वापरला परवानगी दिली. यातील बायोलॉजिकल इच्या कोर्बिव्हॅक्स या लशीचा वापर पाच ते १२ वर्ष वयोगटातील मुलांसाठी करता येणार आहे.
युनायटेड स्टेट्स आणि युनायटेड किंगडमने फाइझर/बायोटेकच्या mRNA लसीने पाच वर्षांच्या मुलांचे लसीकरण करण्यास परवानगी दिली आहे. तर, कोर्बिव्हॅक्स सध्या १२ ते १४ वयोगटातील अशा किशोरवयीन मुलांचे लसीकरण करण्यासाठी वापरली जात आहे, ही लस एका वेगळ्या तंत्रज्ञानाच्या आधारावर तयार केली गेली आहे.
तसेच काल भारताच्या ड्रग्ज कंट्रोलर जनरल (DCGI) यांनी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन सहा ते १२ वयोगटातील मुलांसाठी आपत्कालीन वापरला अधिकृतता (EUA) मंजूर केली. याचबरोबर १२ वर्षांवरील मुलांसाठी झायडस कंपनीतर्फे तयार करण्यात आलेल्या झायकोव्ह डी लशीच्या दोन डोससाठी परवानगी दिली गेली आहे.
Corbevax कसे कार्य करते? –
हैदराबादच्या बायोलॉजिकल ई लिमिटेड’ची निर्मिती असलेली ‘कोर्बिव्हॅक्स’ ही लस संपूर्ण भारतीय बनावटीची असून भारतात तयार झालेली करोना प्रतिबंधात्मक तिसरी लस ठरलेली आहे. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये कंपनीला ५ ते १८ वयोगटातील मुलांवर या लसीची चाचणी घेण्याची परवानगी मिळाली होती. कंपनीचा दावा आहे की ही लस या वयोगटातील फेज 2 आणि फेज 3 च्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.
कोर्बिव्हॅक्स ही “रीकॉम्बीनंट प्रोटीन सब-युनिट” लस आहे, ज्याचा अर्थ ती SARS-CoV-2 च्या विशिष्ट भागापासून बनलेली आहे, म्हणजेच विषाणूच्या पृष्ठभागावरील स्पाइक प्रोटीन. स्पाइक प्रोटीन हे विषाणूला पेशींमध्ये प्रवेश करण्यास अनुमती देते ज्यामुळे ते प्रतिकृती बनवू शकते. जेव्हा फक्त स्पाइक प्रोटीन शरीरात टोचले जाते तेव्हा ते विषाणू इतके हानिकारक नसते, कारण उर्वरित विषाणू नसतात. इंजेक्ट केलेल्या स्पाइक प्रोटीनच्या विरूद्ध शरीराने रोगप्रतिकारक शक्ती विकसित करणे अपेक्षित आहे म्हणजे जर प्रत्यक्ष विषाणूने संसर्ग करण्याचा प्रयत्न केल्यास, शरीराची प्रतिकारशक्ती तयार असते. त्यामुळे विषाणू पीडित व्यक्ती गंभीर आजारी बनण्याची शक्यता नसते.
हे तंत्रज्ञान तसे नवीन नाही. हिपॅटायटीस बी लस तयार करण्यासाठी हे अनेक दशकांपासून वापरले जात आहे. तथापि, या तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्यांपैकी Corbevax ही पहिली कोविड-19 आहे.
ही लस कशी दिली जाईल? –
Covaccine आणि Corbivax या दोन्ही इंट्रामस्क्युलर आहेत, म्हणजेच दंडावर इंजेक्शनद्वारे शरीरात या लशी दिल्या जातील. दोन्ही लसींच्या दोन डोसमध्ये २८ दिवसांचे अंतर आहे.