गुजरातमध्ये बनावट आयपीएल स्पर्धा भरवून फसवणूक करण्यात आली आहे. या आयपीएल स्पर्धेत चक्क शेत मजूरांना खेळाडू म्हणून मैदानात उभं करण्यात आलं होतं. इतकंच नाही टी-२० वर सट्टा लावणाऱ्या रशियन सट्टेबाजांकडून पैसे घेण्यासाठी अधिकृत टेलिग्राम चॅनेलही सुरु करण्यात आलं होतं. या बनावट आयपीएल स्पर्धेच्या माध्यमातून लाखोंचा गंडा घालण्यात आला. याशिवाय समालोचनासाठी हर्षा भोगले यांच्या आवाजाचा वापर करण्यात आला. नेमकं हे प्रकरण काय आहे समजून घ्या…
खेळाडू म्हणून अभिनय करण्यासाठी मजुरांना मिळाले ४०० रुपये
गुजरातमधील मेहसाना जिल्ह्यातील मोलीपूर गावात ही बनावट आयपीएल स्पर्धा भरवण्यात आली होती. मजुरांना खेळाडू म्हणून अभिनय करण्यासाठी प्रत्येकी ४०० रुपये देण्यात आले होते. याशिवाय मैदानात उभ्या पंचांकडे खोटे वॉकी-टॉकी देण्यात आले होते. सूचना मिळेल त्यानुसार सर्वजण मैदानात वावरत होते.
आश्चर्याची बाब म्हणजे, हे सामने युट्यूबवर लाईव्ह दाखवले गेले. यासाठी पाच एचडी कॅमेरे मैदानात लावण्यात आले होते. रशियाच्या अनेक शहरांमधील सट्टेबाजांनी टेलिग्रामच्या माध्यमातून या सामन्यांवर पैसे लावले होते.
सामन्यादरम्यान साऊंड इफेक्ट्सचा वापर
२०२२ आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर तीन आठवड्यांनी ही बनावट स्पर्धा भरवण्यात आली होती. या स्पर्धेत गावातील २१ शेतमजूर आणि बेरोजगार तरुण सहभागी झाले होते. या सर्वांना चेन्नई सुपरकिंग्ज, मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सच्या जर्सी देण्यात आल्या होता. सामन्यांदरम्यान आयोजकांनी गर्दीच्या आवाजाचा वापर केला. तसंच समालोचक हर्षा भोगले यांची मिमिक्री करणाऱ्या कलाकाराचा वापर करण्यात आला.
ही स्पर्धा कोणी आयोजित केली होती?
पोलिसांना याप्रकरणी चौघांना अटक केली असून यामध्ये हवाला चॅनेलचा सहभाग होता का याचाही तपास केला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोएब नावाच्या व्यक्तीने ही स्पर्धा आयोजित केली होती. शोएबने आठ महिने रशियातील पबमध्ये काम केलं होतं. त्याने गुलाम मसीह नावाच्या शेतकऱ्याकडून भाड्याने शेतजमीन घेतली आणि तिथे हॅलोजन दिवे लावले. त्याने २१ शेतमजूरांना प्रत्येक सामन्याचे ४०० रुपये देण्याचं आश्वासन देत तयार केलं. यानंतर त्याने काही कॅमेरामन नेमले तसंच आयपीएल संघांसाठी टी-शर्ट विकत घेतले.
आसिफ मोहम्मद मुख्य सूत्रधार
चौकशीदरम्यान शोएब याने रशियात पबमध्ये आपली आसिफ मोहम्मदशी भेट झाल्याची माहिती दिली. त्यानेच ही कल्पना मांडल्याचं त्याने सांगितलं. “शोएब टेलिग्राम चॅनेलवरुन लाईव्ह सट्टेबाजी करत असे. यानंतर तो अम्पायरला चौकार किंवा षटकारसाठी सूचना द्यायचा. नंतर फलंदाज आणि गोलंदाजांना याची माहिती दिली जात असे. सूचना मिळाल्यानंतर गोलंदाज धीम्या गतीने चेंडू फेकत असे,” असं पोलिसांनी सांगितलं आहे.
आसिफने सट्टेबाजांसाठी घेतलं होतं ऑनलाइन वर्कशॉप
आसिफने रशियामध्ये सट्टेबाजांसाठी ऑनलाइन वर्कशॉप घेतलं होतं. रशियाच्या तीन शहरांमध्ये हे वर्कशॉप पार पडलं. आसिफने स्वत: काही रशियन पबमध्ये काम केलं होतं.
भारतात सट्टेबाजी कायदेशीर आहे का?
भारतीय कायदा खेळांवर सट्टे लावणाऱ्या कंपन्या किंवा साइट्सना देशात काम करण्यापासून परावृत्त करतात. दरम्यान, अनेक परदेशी सट्टेबाजीची ठिकाणं भारतीय चलनात सट्टेबाजीला परवानगी देतात. सट्टेबाजी करणारी कंपनी पॅरिमॅचच्या मते, भारतीय ऑनलाइन सट्टेबाजीचे बाजारमूल्य सध्या अंदाजे सहा हजार कोटीपर्यंत आहे.