नुकताच झालेल्या इंग्लंड-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेत इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा २-१ ने पराभव केला. त्यामुळे २०२१-२३ च्या ICC जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहचण्याची शर्यत रंजक झाली आहे. ९ संघांपैकी ६ संघ अजूनही अंतिम सामना खेळण्याच्या शर्यतीत आहेत. यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे.
गेली जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकणारा न्यूझीलंड यावेळी अंतिम सामन्याच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. तर इंग्लंडकडून पराभव मिळाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली असून ऑस्ट्रेलिया ७० गुणांसह पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेचे ६० गुण आहेत. तसेच श्रीलंका ५३.३३ आणि भारत ५२.०८ गुणांसह अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या तर पाकिस्तान ५१.८५ आणि वेस्ट इंडिज ५० गुणांसह अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. दरम्यान, भारताला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहोचण्याची संधी आहे का? जाणून घेऊया.
हेही वाचा – विश्लेषण : १७ सप्टेंबर – ‘हैदराबाद मुक्ती दिन’ की ‘राष्ट्रीय एकात्मता दिवस’?
अंतिम सामन्यात पोहोचण्याची भारताला संधी?
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत भारत आणखी सहा कसोटी सामने खेळणार आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार तर बांगलादेश विरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका असणार आहे. जर भारताने हे सहाही सामने जिंकले तर भारताचे गुण ६८.०६ होतील आणि ऑस्ट्रेलिया हरल्यामुळे त्यांच्या गुणांमध्ये घसरण होईल. त्यामुळे अंतिम सामन्यात पोहोचण्याची भारताला संधी आहे.
ऑट्रेलिया या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. त्यांना जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत आणखी नऊ कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यापैकी ऑट्रेलिया भारताविरुद्ध चार, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन तर वेस्ट इंडीजविरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहेत. जर ऑट्रेलियाने नऊ पैकी सहा सामने जिंकले तर त्यांचे ६८.४२ गुण होतील. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे अंतिम सामन्याचे तिकीट निश्चित होणार आहे. मात्र, ऑस्ट्रेलिया भारताविरुद्धचे चार सामने हरला आणि उर्वरित पाच सामने जिंकला तर त्यांचे ६३.१६ गुण होतील आणि भारताला ऑस्ट्रेलिया पुढे जाण्याची संधी मिळेल.
हेही वाचा – विश्लेषण : फेडररपर्व संपणार… टेनिसविश्वात तो का ठरला सर्वोत्तम?
इतर संघांची काय स्थिती?
दक्षिण आप्रिकेसंदर्भात बोलायचं झाल्यास जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत त्यांना पाच कसोटी सामने खेळायचे आहेत. यापैकी तीन सामने ते ऑस्ट्रेलियाविरुद्ध तर दोन कसोटी सामने वेस्टइंडीजविरुद्ध खेळणार आहेत. दक्षिण आफ्रिकेने पाचही सामन्यात जर विजय मिळवला. तर त्यांचे ६६.६७ गुण होतील. तरीही त्यांना अंतिम सामन्यात पोहोचणे त्यांना शक्य नाही.
पाकिस्तानला जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत पाच सामने खेळायचे आहेत. यापैकी तीन इंग्लंडविरुद्ध तर दोन न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहेत. जर पाकिस्तानने हे सर्व सामने जिंकले तर त्यांचे गुण ६९.०५ होतील. मात्र, पाकिस्ताने पाच पैकी चार सामने जिंकलेत तर त्यांचे गुण ६१.९० होतील. त्यामुळे पाकिस्तानची अंतिम सामन्यात पोहोचण्याची शक्यता कमीच आहे.
श्रीलंका सध्या ५३.३३ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांना येत्या काळात त्यांना न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. हे दोन्ही सामने जर श्रीलंकेने जिंकले, तरी श्रीलंका ६१.११ गुणांपर्यंतच मजल मारू शकेल. त्यामुळे श्रीलंकेचीही अंतिम सामन्यात पोहचण्याची शक्यता कमीच आहे.
आताचा वेस्टइंडीजचा संघ मजबूत नसला, तरी त्यांना जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात खेळण्याची संधी आहे. वेस्टइंडीज सध्या ५० गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. त्यांना येत्या काळात ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी सामने खेळण्याचे आहेत. जर वेस्टइंडीजने हे चारही सामने जिंकले तर त्यांचे गुण ६५.३८ होतील. त्यामुळे त्यांनाही अंतिम सामन्यात खेळण्याची संधी आहे.
महत्त्वाचे म्हणजे इंग्लंड, न्यूझीलंड आणि बांगलादेश जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेतून बाहेर पडले असले तरी हे तीन संघ भारत, पाकिस्तान आणि श्रीलंकेसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. भारताला बागंलादेशला विरुद्ध दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. तर पाकिस्तानला इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्ध तर श्रीलंकेला न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामने खेळायचे आहेत.