भारतात चित्रपट, राजकारण आणि क्रिकेट या तीन गोष्टींना प्रचंड महत्त्व आहे. यापैकी क्रिकेट हा सर्व भारतीयांचा धर्मच आहे, आणि याच धर्मातला एक जबरदस्त लोकप्रिय असा एक सण सध्या सुरू आहे तो म्हणजे ‘आयपीएल‘. एकेकाळी क्रोमासारख्या बड्या शोरुमच्या बाहेर वेड्यासारखी गर्दी करून क्रिकेट पाहणाऱ्या क्रिकेटप्रेमींचा जत्था हा आता आपआपल्या घरी ६ इंचाच्या मोबाईल समोर मान तुकवून या आयपीएल सामन्यांचा ‘फूल एचडी’मध्ये आनंद लुटत आहे. हे सगळं घडवून आणलं ते उद्योगविश्वातील दिग्गज मुकेश अंबानी आणि त्यांच्या जिओ या कंपनीने. सध्या जिओच्या माध्यमातून संपूर्ण आयपीएल विनामूल्य दाखवण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०२३ ते २०२७ पर्यंतचे ‘आयपीएल’ प्रसारणाचे हक्क बीसीसीआयने काही टप्प्यात विभागले. टेलिव्हिजनचे हक्क हे स्टार या चॅनलला मिळाले तर डिजीटल हक्क हे व्हायकॉम १८ या कंपनीला मिळाले. हे हक्क मिळवण्यासाठी व्हायाकॉम १८ ने २३ हजार ७५८ कोटी खर्च केले. पण देशातील सर्वांना हा एवढा मोठा खेळ फुकटात दाखवणं नेमकं कसं काय परवडतं? जिओला त्याचा नेमका काय आणि कसा फायदा होणार आहे ते आपण जाणून घेऊया!

आणखी वाचा : विश्लेषण : आधी बुमरा, श्रेयस आणि आता विल्यम्सन! कोणत्या ‘आयपीएल’ संघांना जायबंदी खेळाडूंची चिंता?

१. स्वतःचं ब्रँडिंग :

‘जिओ सिनेमा’ हे अॅप २०१६ साली लॉंच झालं पण इतर ओटीटी प्लॅटफॉर्मच्या शर्यतीत ते कुठेतरी मागे पडलं, हीच अवस्था व्हायाकॉम १८ च्या ‘वूट’ची झाली, अखेर २०२२ मध्ये हे दोन्ही ब्रॅण्डस् एकत्र आले आणि ‘जिओ’ हा एकच ब्रॅण्ड पुढे सुरू ठेवला. यंदाचा फीफा वर्ल्डकप आणि WPL जिओने मोफत दाखवलं, पण त्या दोन्हीमुळे जिओला म्हणावा तसा फायदा झालेला नाही. परंतु ‘आयपीएल’च्या बाबतीत मात्र आपल्याला उलट चित्र पाहायला मिळतंय. मोफत आयपीएल पाहायला मिळणार म्हणून पहिल्याच मॅचच्या दिवशी ‘जिओ सिनेमा’ हे ॲप तब्बल २.५ कोटी प्रेक्षकांनी डाउनलोड केलं. अशाच पद्धतीने एवढ्या लोकांपर्यंत जिओ हा ब्रॅण्ड पोहोचवायचं काम ‘आयपीएल’च्या माध्यमातून झालं.

२. डेटा :

सध्याच्या स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या काळात तुमच्या डेटाला किती महत्त्व आहे हे वेगळं सांगायची अजिबात गरज नाही. यंदाच्या ‘आयपीएल’चा पहिला सामना तब्बल ५० कोटी प्रेक्षकांनी पाहिला असा दावा व्हायाकॉम १८ ने केला. याच युजर्सनी आपल्या स्मार्टफोनमध्ये जिओ सिनेमा हे ॲप डाउनलोड केल्यावर वेगवेगळ्या गोष्टींसाठी परवानगी दिली आणि हा सगळा ऑनलाइन युजर्सचा डेटा आपोपाओपच जिओकडे आला. आता या डेटाच्या माध्यमातून ते प्रत्येक युजरचे वय, त्याच्या इंटरनेटवरच्या आवडी निवडी ही माहिती अगदी सहज गोळा करू शकतात, आणि पुढे हा डेटा विकूही शकतात. शिवाय अॅनालेटिक्सच्या माध्यमातून विश्लेषण केलेल्या डेटाची किंमतही अधिक असते. सध्या कोणत्याही कंपनीकडे असलेला तुमचा डेटा हा चलनाइतकाच मौल्यवान असतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर संकलित होणाऱ्या डेटा फायदाही जिओला होणार आहे.

३. जाहिरातबाजी :

जिओने पहिल्याच सामन्याच्या दिवशी ५० कोटी प्रेक्षकांचा टप्पा पार केल्याने जाहिरातदारांचा जिओवर चांगलाच विश्वास बसला आहे. याबरोबर जिओकडे त्यांच्या युजर्सचा डेटाबेस असल्याने ऑनलाइन येणाऱ्या जाहिरातींवर किती जणांनी क्लिक केलं, तर किती लोकांनी जाहिरातीच्या वेबसाईटला भेट दिली असा सगळा डेटा ते या जाहिरातदारांना विकू शकतात. हे सगळं पाहता यंदा केवळ ‘आयपीएल’च्या जीवावरच जाहिरतातून येणाऱ्या कमाईच्या बाबतीत जिओ स्टारच्या चॅनललाही मागे टाकेल असा अंदाज मीडिया रिपोर्टमधून वर्तवला जात आहे.

४. जिओचा ‘फ्री सर्व्हिस’चा मास्टरप्लान :

२०१६ मध्ये जिओने फुकट ‘४ जी डेटा’ पुरवायला सुरुवात केली, इंटरनेट स्वस्त झाल्याने स्मार्टफोन युजर्सचं प्रमाण वाढलं आणि पर्यायी फुकट मिळतंय म्हणून दुकानाबाहेर रांगा लाऊन ‘जिओ’चं सीम कार्ड घेण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी केली. २०१६ मध्ये सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत जिओने लोकांना फुकट ४ जी डेटाची एवढी सवय लावली. मग जिओचे थोडे स्वस्त प्लान बाजारात आले आणि म्हणता म्हणता फुकट ४ जी नेट वापरणारी जनता आज ३ महिन्याला ८०० रुपये भरून जिओचं इंटरनेट वपारू लागली आहे.

आणखी वाचा : IPL 2023: आरसीबी नाही, एबी डिव्हिलियर्सच्या नजरेत ही टीम बनू शकते चॅम्पियन, नाव जाणून तुम्हालाही बसेल धक्का

ही फुकट ते पौष्टिक स्ट्रॅटजी जिओने ‘जिओ सिनेमा’च्या बाबतीतही वापरली. आधी फिफा वर्ल्डकप मग WPL आणि आता तर थेट ‘आयपीएल’ फुकटात दाखवून जिओने बाजी मारली हे नक्की. जर हॉटस्टारप्रमाणे वेगवेगळे प्लान ठेवून जिओने ‘आयपीएल’ दाखवली असती तर आज ५० कोटी लोकांनी पहिल्याच दिवशी ‘जिओ सिनेमा’वर गर्दी केली नसती. आता कदाचित पुढच्या ‘आयपीएल’मध्ये जिओ सिनेमा यासाठी काही क्षुल्लक पैसेही आकारेल, आणि त्यावेळी आज फुकट पाहणारे प्रेक्षक हसत हसत त्यासाठी पैसे भरायला तयार होतील. पुढच्या कित्येक वर्षांनी मिळणाऱ्या नफ्याचा विचार करूनच ‘जिओ’ने ‘आयपीएल’ फुकटात दाखवायचा निर्णय घेतला आहे हे आपल्याला यावरून स्पष्ट होतं.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained how jio is getting more benefits after streaming ipl 2023 for free on jio cinema avn
Show comments