जगभरात करोना व्हायरसनं थैमान घातलं असताना शास्त्रज्ञ या विषाणूवर लस शोधण्यात व रोगावर उपचार शोधण्यात व्यस्त आहेत. सध्या कुणालाही खात्रीशीर लस शोधण्यात यश आले नसून संपूर्ण जग यशाच्या प्रतीक्षेत आहे.
लवकरात लवकर कधी मिळेल लस?
करोनवरची लस मिळायला काही महिने लागतील अशी चिन्हे आहेत. इंडियन एक्स्प्रेसला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ सौम्य स्वामिनाथन यांनी सांगितलं की जर सगळं अपेक्षेप्रमाणे घडलं तर कदाचित येत्या १२ ते १८ महिन्यांमध्ये आपल्याकडे करोनावरील लस उपलब्ध असेल. अर्थात तसं झालं तरी किती प्रमाणात ही लस उपलब्ध होईल हा प्रश्नच आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध होण्यासाठी १८ ते २४ महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
नवीन लस तयार करणे ही अत्यंत क्लिष्ट प्रक्रिया असते. नवीन लस प्राण्यांवर यशस्वी झाली की क्लिनिकल चाचण्या घेण्यात येतात. सुरक्षा व परिणामकारकतेच्या तीन टप्प्यांमधून ही प्रक्रिया जाते. तर चौथ्या टप्प्यांमध्ये सर्व माहितीचे पृथक्करण करण्यात येते. जगभरात सार्स व मेर्स यावर काम सुरू असून करोनाही या कुटुंबातीलच व्हायरस आहे. त्यामुळे सध्या करण्यात आलेल्या लस विकासामध्ये नुतनीकरण करण्यात येत असून अगदीच पहिल्यापासून सुरूवात करण्याची गरज नाही. अर्थात तरीही परिणामांची पहिली खात्रीलायक माहिती उपलब्ध होण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो व यश मिळेलच याची हमीही नाहीये. उपचारांच्या पातळीवर विचार केला तर अँटी एचआयव्ही ड्रग्जचा वापर करण्यासंदर्भात काही बातम्या आल्या आहेत. याचा वापर किती प्रभावी आहे व नक्की परिणाम काय होतोय हे बघण्यासाठी थोडा वेळ लागेल असं तज्ज्ञ डॉक्टरांचं म्हणणं आहे.
औषधासाठी कसला विचार करण्यात येतोय?
जागतिक आरोग्य संघटनेने सॉलिडॅरिटी या क्लिनिकल ट्रायलची घोषणा केली आहे. एचआयव्हीवरील लोपिनाविर व रिटोनाविर या ड्रग्जच्या संयोगातून बनवलेल्या रेमेडिसिविर या औषधाची चाचणी करण्यात येत आहे. तसेच मलेरिया प्रतिबंधक क्लोरोक्विनचाही समावेश आहे. आत्तापर्यंत अर्जेटिना, बहारिन, कॅनडा, फ्रान्स, इराण, नॉर्वे, द. अफ्रिका, स्पेन, स्वित्झर्लंड व थायलंड या देशांनी सह्या केल्या आहेत.
नवीन शक्यता
अर्थात शून्यापासून सुरूवाती करून नवीन औषध शोधण्याचे प्रयत्नही सुरूच आहेत. कॅलिफोर्नियातील क्वांटिटेटिव्ह बायोसायन्स इन्स्टिट्युटमध्ये संशोधक पेशीच्या आतील प्रोटीन शोधण्याचा प्रयत्न करत आहेत ज्याचा वापर करोनाचा विषाणू पुनर्निमितीसाठी करतो. करोनाची आगेकूच थोपवण्यासाठी यापैकी कुठले प्रोटिन्स कामाला येतील का यावर ते संशोधन करत आहेत.
लसीचं काम किती पुढे गेलंय?
अमेरिका – सिएटलमध्ये क्लिनिकल ट्रायल किंवा प्रयोगशाळेतील चाचण्या सुरू आहेत. १८ ते ५५ वयोगटातील ४५ सुदृढ स्वयंसेवकांवर या चाचण्या घेण्यात येतील, ज्या साधारणपणे सहा आठवडे चालतील. संशोधनात्मक लस या आठवड्यात पहिल्या सहभागी स्वयंसेवकाला देण्यात येत आहे.
चीन – पीपल्स लिबरेशन आर्मीच्या संशोधकांना लसीच्या चाचणीसाठी संमती मिळालेली आहे. मार्च ते डिसेंबर या कालावधीत १०८ लोकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. हाँगकाँगमधल्या कॅनसिनो बायोलॉजिज या संस्थेसह हा उपक्रम राबवण्यात येत आहे. पीपल्स डेलीममध्ये आलेल्या लेखानुसार विषाणूला शरीर नैसर्गिकपणे काय प्रतिसाद देतं ते बघणं, विषाणूतून हानीकारक भाग वगळून त्याचा अभ्यास करणं व हानीकारक नसलेल्या लसींचा प्रयोग करणं असे विविध उपाय चीन हाती घेणार आहे.
भारताचा अनुभव काय आहे?
गेल्या आठवड्यात जयपूरमधल्या डॉक्टरांनी लोपिनाविर व रिटोनाविरचं संयुक्त औषध ७० व ६९ वयाच्या इटालियन जोडप्याला वेंटिलेटरवर ठेवल्यावर दिलं. दोघांनाही निगेटिव्ह निकाल आल्यानंतर डिसचार्ज देण्यात आला. परंतु तो व्यक्ती शुक्रवारी मरण पावला. यावर आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की सदर ७० वर्षांची व्यक्ती चेन स्मोकर होती व करोनासाठी त्यांची चाचणी निगेटिव्ह आली होती. दुसऱ्या रूग्णालयात अन्य आजारांवर उपचार घेताना ह्रदय बंद पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांची केस करोनाची म्हणता येणार नाही असं आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.