प्रशांत केणी
टोक्यो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने शनिवारी अमेरिकेत युजीन येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद ॲथलेटिक्स स्पर्धेत ऐतिहासिक रौप्यपदक कमावले. नीरजने चौथ्या प्रयत्नात ८८.१३ मीटर अंतरावर भालाफेक करीत आपले रौप्यपदक आणि जागतिक ॲथलेटिक्सच्या इतिहासातील भारताचे दुसरे पदक निश्चित केले. या निमित्ताने नीरजच्या यशाचे ऐतिहासिक महत्त्व, अंतिम फेरीतील अडचणी, अँडरसन पीटर्सचे कडवे आव्हान आणि ९० मीटर अंतराचे लक्ष्य या मुद्द्यांचा घेतलेला वेध –

नीरजच्या जागतिक पदकाचे भारताच्या दृष्टीने काय ऐतिहासिक महत्त्व आहे?

जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताकडून माफक अपेक्षा केल्या जायच्या. २००३च्या पॅरिस जागतिक स्पर्धेत लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्जने कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर तब्बल १९ वर्षांनी नीरजने भारताचा पदकांचा दुष्काळ संपवला. हे भारताचे जागतिक ॲथलेटिक्समधील दुसरे पदक ठरले. याचप्रमाणे जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत पदक जिंकणारा नीरज हा भारताचा पहिला पुरुष ॲथलीट ठरला आहे.

maharashtra vidhan sabha election 2024 sudhir mungantiwar vs santosh singh Rawat Ballarpur Assembly constituency
लक्षवेधी लढत : मुनगंटीवार यांच्यासमोर कडवे आव्हान
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
wall-painted calendar in the Roman Republic
भूगोलाचा इतिहास : एका खेळियाने…
Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
cop 29 climate change conference in baku capital of azerbaijan
विश्लेषण : ‘कॉप २९’ची एवढी चर्चा का?
Marathi Rangbhoomi Divas , Marathi Theatre Day, 5th November
विश्लेषण : रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला का असतो? यंदा अद्याप साजरा का झाला नाही?
History of Geographyn History of the Earth Geological timescale
भूगोलाचा इतिहास: खडकातील पाऊलखुणा!

अंतिम फेरीत नीरजला कोणत्या अडचणी आल्या?

दुपारच्या सत्रात ॲथलेटिक्सची अंतिम फेरी चालू असताना युजीनमधील ऑरेगॉन विद्यापीठाच्या हेवर्ड क्रीडा संकुलात उलट्या दिशेने जोरदार वारे वाहात होते. याशिवाय नीरजच्या मांडीचा स्नायूसुद्धा दुखावला होता. परिणामी नीरजचा पहिला प्रयत्न सदोष झाला, तर दुसऱ्या (८२.३९ मीटर) आणि तिसऱ्या प्रयत्नात (८६.३७ मीटर) समाधानकारक अंतर गाठता आले नाही. परंतु चौथ्या प्रयत्नात दिमाखदार पुनरागमन करीत नीरजने ८८.१३ मीटर अंतरावर भाला फेकला. त्यामुळे नीरजला दुसऱ्या क्रमांकावर मुसंडी मारता आली. पण त्यानंतरचा पाचवा आणि सहावा प्रयत्नसुद्धा सदोष ठरला.

सुवर्णपदक विजेत्या अँडरसन पीटर्सने नीरजवर कशा प्रकारे कुरघोडी केली?

जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेआधी यंदाच्या हंगामात झालेल्या तीन स्पर्धांपैकी नीरजने ग्रेनाडाच्या २४ वर्षीय अँडरसन पीटर्सला दोनदा मागे टाकले आहे; परंतु स्टॉकहोम येथे ३० जूनला झालेल्या डायमंड लीग स्पर्धेत पीटर्सने नीरजवर मात केली होती. ८९.९४ मीटर ही नीरजच्या खात्यावर सर्वोत्तम कामगिरी आहे. परंतु जगातील सर्वोत्तम भालाफेकपटू म्हणून गणल्या जाणाऱ्या पीटर्सने कारकीर्दीत तीनदा ९० मीटरचा टप्पा ओलांडला आहे. यापैकी ९३.०७ मीटर ही सर्वाेत्तम कामगिरी त्याने मे महिन्यात दोहा येथे झालेल्या वर्षातील पहिल्या डायमंड लीग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकताना नोंदवली होती. यंदाच्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेच्या पात्रता फेरीत ८९.९१ मीटर अंतरावर भाला फेकत पीटर्सने एकंदर अग्रस्थान पटकावले, तर ८८.३९ मीटर अंतर गाठणाऱ्या नीरजला दुसरा क्रमांक मिळाला होता. अंतिम फेरीत नीरजने ८८.१३ ही सर्वाेत्तम कामगिरी नोंदवली. परंतु पीटर्सने सहा प्रयत्नांपैकी तीनदा ९० मीटर अंतराचा टप्पा ओलांडला. त्याने पहिल्या प्रयत्नात ९०.२१ मीटर, दुसऱ्या प्रयत्नात ९०.४६ मीटर आणि सहाव्या प्रयत्नात ९०.५४ मीटर (सर्वोत्तम) अशी कामगिरी नोंदवली. नीरजसह कोणत्याही खेळाडूला त्याच्या तीन सर्वोत्तम कामगिरीपर्यंत पोहोचता आले नाही. पीटर्स हा जागतिक स्पर्धेत सलग दोन सुवर्णपदक जिंकणारा दुसरा भालाफेकपटू ठरला आहे. याआधी, चेक प्रजासत्ताकच्या यान झेलेनीने १९९३ आणि १९९५मध्ये हा पराक्रम दाखवला आहे.

९० मीटर अंतरावर भाला फेकण्याचे लक्ष्य…

नीरजने ८७.५८ मीटर अंतरावर भाला फेकत टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. त्या स्पर्धेत पीटर्सला (८०.४२ मीटर) अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले होते. त्यामुळे अंतिम फेरीत नीरजचा मार्ग सोपा झाला. परंतु जागतिक स्पर्धा ही ऑलिम्पिक स्पर्धेपेक्षा अवघड असते, हे नीरजनेही मान्य केले आहे. ऑलिम्पिकनंतर यंदाच्या हंगामाला सामोरे जाताना ९० मीटर अंतराचा टप्पा गाठण्याचे लक्ष्य असल्याचे नीरजने सांगितले होते. तुर्कू, फिनलंड येथे १४ जूनला झालेल्या पोव्हो नूर्मी क्रीडा स्पर्धेत नीरजने ८९.३० मीटर अंतरावर भाला फेकत राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. परंतु त्याला रौप्यपदक मिळाले. मग क्यर्टाने, फिनलंड येथे झालेल्या क्युर्टाने क्रीडा स्पर्धेत नीरजने ८६.६९ मीटरसह सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंर स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये नीरजने ८९.९४ मीटर अंतरासह नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला. पण त्यावेळीही त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

झोपेबाबत नीरजचे काय धोरण आहे?

पुरेशी झोप हेच नीरजचे दैनंदिन धोरण आहे. नीरज दररोज आठ ते १० तास झोप घेतो. सरावानंतर बर्फाचे स्नान (आइस बाथ) घेणे तो उत्तम मानतो. परंतु शरीरक्रिया योग्य चालण्यासाठी आणि दुखापतीतून सावरण्यासाठी उत्तम झोप आवश्यक असल्याचे नीरज मानतो.

नीरज कसा उदयास आला?

नीरजचा जन्म हरयाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यातील खांदरा गावी झाला. शालेय जीवनात त्याच्या वडिलांनी त्याला जिम्नॅस्टिक्स शिकायला लावले होते. मग पानिपतच्या शिवाजी स्टेडियममध्ये सराव करताना त्याला भालाफेकीची आवड निर्माण झाली. मग २०१०मध्ये भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या केंद्रात नीरज जयवीर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेऊ लागला. कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरीच्या बळावर २०१३मध्ये त्याची पहिल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. २०१४च्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक कमावले. त्यानंतर नीरजने २०१६च्या कनिष्ठ जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले होते. २०१७च्या आशियाई ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतही त्याने जेतेपद मिळवले होते. याशिवाय २०१८च्या राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमधील सुवर्णपदकेही त्याच्या खात्यावर जमा आहेत. मग २०२१मध्ये नीरजने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला ॲथलेटिक्समधील पहिले सुवर्णपदक जिंकून दिले होते. याचप्रमाणे नेमबाज अभिनव बिंद्रानंतरचे हे दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक ठरले होते. बिंद्राने २००८च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारताला यश मिळवून दिले होते.