भक्ती बिसुरे
डुकराच्या हृदयाचे प्रत्यारोपण एका मानवाच्या शरीरात यशस्वी झाल्याची अमेरिकेतील घटना ताजी असतानाच, प्राण्याच्या मृत्यूनंतर सुमारे तासाभरानंतर त्याच्या अवयवांचे पुनरुज्जीवन करण्यात यश आल्याची माहिती अमेरिकन शास्त्रज्ञांनी दिली आहे. सुमारे १०० डुकरांवरील प्रयोगाअंती शास्त्रज्ञांनी याबाबत खुलासा केला असून, यामुळे वैद्यकीय जगात आमूलाग्र बदल होण्याच्या शक्यता विज्ञान वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहेत. प्राण्यांच्या अवयवांचा मानवी आरोग्यासाठी होणारा उपयोग, अवयव दात्यांच्या अवयवांचे जतन आणि पुनर्प्रत्यारोपण अशा अनेक बाबतीत या संशोधनाचे दूरगामी परिणाम दिसण्याची शक्यता असल्यानेच ‘नेचर’सह विज्ञान वर्तुळातील अनेक नियतकालिकांनी या संशोधनाची दखल घेतली आहे.
संशोधन काय?
अमेरिकेतील येल विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी डुकराचे अवयव त्याच्या मृत्यूनंतर अर्धवट पुनरुज्जीवित करण्यात यश आल्याचा दावा केला आहे. या नवीन संशोधनामुळे प्रत्यारोपणासाठी अधिक अवयव उपलब्ध होण्याची शक्यता आहे. हे अवयव माणसांवर प्रत्यारोपित करण्याचे तंत्र यशस्वी झाले असता डॉक्टरांना माणसांचा जीव वाचवण्यास अधिक वेळ मिळू शकेल, तसेच जीवन आणि मृत्यू यादरम्यान काय घडते याबाबत गृहितकांवर अभ्यास करणे शक्य होणार असल्याचा आशावाद वैद्यक शास्त्रातील संशोधक व्यक्त करत आहेत. हृदयाची धडधड थांबल्यानंतर शरीराला प्राणवायू आणि आवश्यक पोषक घटकांची गरज निर्माण होते. अवयव फुगतात, रक्तवाहिन्या आणि शरीराच्या बांधणीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे, अशा पेशींचा ऱ्हास (मृत्यू) होण्यास सुरुवात होते. हा मृत्यू वेगवान आणि कायमस्वरूपी असतो असे सहसा मानले जाते. मात्र, येल विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी पेशींचे कार्य पुन्हा सुरू (रिस्टोअर) करणे शक्य असल्याचे दाखवून दिले आहे. ऑर्गन एक्स या तंत्रज्ञानाचा वापर करून संपूर्ण शरीरात कृत्रिम रक्त खेळवून प्राणवायू अवयवांपर्यंत पोहोचवण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. या रक्ताची गुठळी होत नसल्याने डुकराच्या रक्तवाहिन्यांचा ऱ्हास होण्यापासून रोखणे शक्य होते. पेशींचा मृत्यू रोखण्यात अडथळा निर्माण करणारे १३ रासायनिक संयुगांचे ‘कॉकटेल’ हे उपकरण वापरण्यात येते. धडधडणाऱ्या हृदयाचा आभास निर्माण करण्यासाठी ऑर्गन एक्सकडून एका विशिष्ट पंपाचा वापरही केला जातो.
प्रयोग काय आहे?
‘नेचर’ या नियतकालिकामध्ये संशोधनातील सहभागी शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहिती प्रमाणे १०० डुकरांवर हा प्रयोग करण्यात आला. या संशोधनासाठी त्यांना सर्व प्रकारच्या नैतिकतेच्या मान्यता देण्यात आल्या होत्या. प्रयोगासाठी शास्त्रज्ञांनी प्राण्यांना तीव्र भूल दिली आणि त्यांचे हृदयकार्य थांबवले. त्यानंतर एका तासाने त्यांना ऑर्गन एक्स उपकरणाला जोडण्यात आले. सहा तासांसाठी रासायनिक संयुगांचे ‘कॉकटेल’ देण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेत भुलीचा अंमल कायम राखण्यात आला. सहा तास उलटल्यानंतर प्राण्यांच्या हृदय, यकृत आणि मूत्रपिंडाचे विच्छेदन केले असता काही प्रमाणात हे अवयव पुनरुज्जीवित झाल्याचे दिसून आले. हृदयाच्या काही पेशीही पुन्हा काही प्रमाणात आकुंचन पावल्याचे दिसले. असे असले तरी ही क्षमता स्वाभाविकच मृत्यूपूर्व अवस्थेएवढी नव्हती. शास्त्रज्ञ डॉ. झ्वोनिमिर वर्सेलजा सांगतात, ‘पेशींचा मृत्यू रोखणे शक्य असल्याचे दाखवून देण्यात आम्हाला यश आले आहे. प्राण्यांची मान आणि डोके उत्स्फूर्तपणे हलत असल्याचे या संशोधनादरम्यान एका टप्प्यावर दिसून आले. तो या संशोधनातील अत्यंत धक्कादायक क्षण होता.’ प्राण्याची चेतना किंवा मेंदूचे कार्य किंवा जागरूकता दर्शवणारे कोणतेही लक्षण या दरम्यान दिसून आले नाही, मात्र, पेशींची दुरुस्ती करणे, त्यांचे पुनरुज्जीवन शक्य असल्याचे या संशोधनातून स्पष्टझाल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.
संशोधनाची संभाव्य उपयुक्तता काय?
डुकराच्या हृदयाचे यशस्वी प्रत्यारोपण एका मानवाच्या शरीरात करण्यात आल्याची अमेरिकेतील घटना अद्याप ताजी आहे. ज्या रुग्णावर या हृदयाचे प्रत्यारोपण करण्यात आले होते त्याचा दोन महिन्यांनंतर मृत्यू झाल्याचेही वैद्यकीय वर्तुळाला ज्ञात आहे. मात्र, वैद्यक क्षेत्रातील एक क्रांतिकारी घटना म्हणून त्या प्रत्यारोपणाचे महत्त्व वादातीत होते. सध्या समोर आलेल्या संशोधनामुळे भविष्यात प्राण्यांच्या अवयवांचे प्रत्यारोपण मानवावर करता येण्याच्या शक्यतेत मोठी वाढ झाली आहे. प्रत्यारोपणासाठी वापरण्याचे अवयव दीर्घ काळ चांगल्या अवस्थेत ठेवण्यासाठीदेखील या संशोधनातील तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. आणखी काही वर्षांनी मृत्यूनंतर तसेच अवयव दान करण्याची अंत:प्रेरणा असलेल्या व्यक्तींसाठी हे तंत्रज्ञान वरदान ठरण्याची शक्यता आहे. बुडून किंवा हृदयविकाराच्या झटक्याने म्हणजेच प्राणवायूच्या कमतरतेमुळे मृत्यू ओढवलेल्या व्यक्तींना जिवंत करण्यासाठी या संशोधनावर आधारित भविष्यातील अद्ययावत संशोधन उपयुक्त ठरेल, असा आशावादही यानिमित्ताने वर्तवण्यात येत आहे. डॉ. सॅम पर्निया म्हणतात, मृत प्राण्याचे अवयव आणि शरीर पुनरुज्जीवित करणे हा खरोखर एक चमत्कार आहे. विज्ञानाचा मानवी आयुष्यावर सर्वात मोठा आणि क्रांतिकारी परिणाम या संशोधनातून साधला जाण्याची शक्यता आहे. अवयवदात्यांचे काढलेले अवयव जतन करण्यासाठीही हे तंत्र मोठे योगदान देण्याची शक्यता स्पष्ट आहे. त्यामुळेच संपूर्ण वैद्यकीय विश्वाला नवे आयाम या संशोधनातून मिळण्याची शक्यताही आता दृष्टिक्षेपात आल्याचे डॉ. पर्निया सांगतात.