देशाच्या राजकारणात बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) प्रमुख लालूप्रसाद यादव यांची वेगळी ओळख आहे. बिहारचं राजकारण लालूप्रसाद यांचा उल्लेख केल्याशिवाय अपूर्ण आहे. लालूप्रसाद यादव नेहमीच आपलं राजकारण, बेधडक स्वभाव तसंच बोलण्याच्या विशिष्ट शैलीमुळे चर्चेचा विषय राहिले. पण लालूप्रसाद यादव यांना ‘लालू’ हे नाव कसं पडलं तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या यामागील रंजक गोष्ट
लालूप्रसाद यादव मुख्यमंत्री होण्याआधी शिपायांच्या क्वार्टरमध्ये राहत होते ही गोष्ट अनेकांना माहित नाही. लालूप्रसाद यादव एका शेतकरी कुटुंबातून होते. त्यांचा भाऊ शिपायाची नोकरी करत होता. लालूप्रसाद यादव आपल्या भावासोबत शिपायांच्या क्वार्टरमध्ये वास्तव्यास होते. मुख्यमंत्री झाल्यानंतरही जवळपास चार महिने ते तिथेच राहायला होते.
आणीबाणीमुळे मुलीचं नाव ठेवलं ‘मिसा’
लालूप्रसाद यादव यांची मुलगी मिसादेखील राजकारणात आहे. त्या राज्यसभेच्या सदस्य आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, लालूप्रसाद यादव यांनी मुलीचं नाव दिवंगत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या वेळी लागू करण्यात आलेल्या Maintenance of Internal Security Act (MISA) वरुन ठेवलं होतं. मिसा यांचा जन्म झाला तेव्हा आणीबाणी लागू होती. अनेक मोठ्या नेत्यांसहित लालूप्रसाद यादव यांनाही अंतर्गत सुरक्षा कायद्यांतर्गत अटक कऱण्यात आली होती. त्यामुळे मुलीचा जन्म झाल्यानंतर लालूप्रसाद यादव यांनी मुलीचं नाव मिसा ठेवलं.
कोणाचाही चेहरा विसरत नाहीत –
लालूप्रसाद यादव एकदा पाहिलेला चेहरा विसरत नाहीत असं म्हटलं जोतं. आरजेडी नेते शिवानंत तिवारी यांनी यासंबंधीचा एक किस्सा सांगितला होता. ते एकदा लालूप्रसाद यादव यांच्यासोबत एका कार्यक्रमाला निघाले होते. तिथे पोहोचताच लोकांनी गर्दी केली. यावेळी एक महिला हातात बाळाला घेऊन लालूप्रसाद यादव यांच्याकडे पाहत होती. यावेळी अचानक लालूप्रसाद यांनी तिला आवाज दिला आणि सुखमनी कशी आहेस? तुझी बहिण कशी आहे? अशी विचारणा केली. महिलेशी बोलल्यानंतर लालूप्रसाद यादव यांनी तिला ५०० रुपये दिले आणि मुलासाठी मिठाई घेण्यास सांगितलं.
‘लालू’ हे नाव कसं पडलं ?
लालूप्रसाद यादव यांना लालू हे नाव कसं पडलं हे फार कमी लोकांना माहिती आहे. एकदा त्यांची बहिण गंगोत्री देवी यांनी यामागची गोष्ट सांगितली होती. गंगोत्री देवींनी सांगितलं होतं की, “लालू आम्हा सर्व भावंडांमध्ये धाकटे होते. लहानपणापासून ते गोरे आणि तब्येतीने होते. यामुळे आमचे वडील कुंदन राय यांनी त्यांचं नाव ‘लालू’ ठेवलं”.