रशिया-युक्रेन युद्धात रशियाच्या फौजेची जरी आगेकुच सुरु असली तरी युक्रेनच्या फौजाही रशियाचा जोरदार प्रतिकार करत आहे. युक्रेनच्या आकाशात रशियाने पुर्णपणे वर्चस्व मिळवल्याचं जाहीर केलं आहे, म्हणजेच युक्रेनच्या हवाई दलाला पुर्णपणे नेस्तनाबुत केलं आहे. असलं असलं तरी युक्रेनचा जमिनीवरील प्रतिकार मोडून काढण्यात रशियाला यश आलेलं नाही. उलट युक्रेनच्या प्रतिकारामुळे आक्रमक रशियाला आता बचावात्मक धोरण स्विकारावं लागलं आहे. थोडक्यात युद्ध सुरु झाल्यानंतर पाच दिवसांनंतरही युक्रेनचा पराभव रशिया करु शकलेला नाही. या परिस्थितीची कल्पना आधीच आल्याने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी संरक्षण दलाला अण्वस्त्र सज्जतेचे आदेश दिल्याने जग हादरले आहे. म्हणजेच अणु बॉम्ब टाकण्यासाठी यंत्रणेला सज्ज रहाण्याचे आदेश दिले आहेत.
रशियाकडचा अणु बॉम्बचा साठा
अमेरिकेने १६ जुलै १९४५ ला जगातली पहिली अणु बॉम्बची चाचणी घेतली आणि खऱ्या अर्थाने जगात अण्वस्त्र स्पर्धेला सुरुवात झाली. तेव्हाचा सोव्हिएत रशिया आणि अमेरिका यांच्यामधले शीतयुद्ध १९९१ पर्यंत जोरात सुरु राहिले. असं असलं तरी मधल्या काळात थोडा शहाणपणा दाखवत दोन्ही देशांनी अण्वस्त्र-अणु बॉम्बची संख्या कमी केली. १९९१ ला सोव्हिएत रशियाची शकले झाली, रशिया आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला. मात्र त्यानंतर आता रशिया पुन्हा उभारी घेत आहे. हे सर्व सांगायचं कारण परिस्थिती जरी बदलत असली तरी आजही रशियाकडे तब्बल सहा हजारपेक्षा जास्त अण्वस्त्र असावीत असा एक अंदाज आहे. अर्थात कोणताही देश स्वतःकडे किती अणु बॉम्ब आहेत हे जाहीर करत नाही. त्यामुळे खरा नेमका आकडा कधीच कळणार नाही.
रशियाकडे विविध क्षमतेचे अणु बॉम्ब आहेत. म्हणजे हिरोशिमा -नागासाकी वर टाकलेल्या अणु बॉम्बच्या संहारक शक्तीपेक्षा हजारपट शक्तीशाली अणुबॉम्ब रशियाकडे आहेत. गेल्या अनेक वर्षातले संशोधन आणि विविध प्रयोगांच्या माध्यमातून एखाद्या मोठ्या बॅगेत सहज राहील अशा आकाराचे, किरणोत्साराचे उत्सर्जन जास्त पण उष्णतेमुळे विध्वंस कमी होईल अशा प्रकारचे अणु बॉम्बही विकसित करण्यात आले आहेत. तेव्हा असेही अणु बॉम्ब रशियाकडे असावेत असा अंदाज आहे.
अणु बॉम्बच्या हल्ल्यासाठी रशियाची त्रिस्तरीय सज्जता
नुसते अणु बॉम्ब असून काही उपयोग नसतो तर हे अणु बॉम्ब तेही अचुकपणे टाकण्यासाठी किंवा असा अणु बॉम्ब हल्ला जर स्वतःच्या देशावर झाला तर अणु बॉम्बनेच प्रतिहल्ला करण्यासाठी जी आवश्यक त्रिस्तरीय सज्जता असते ती रशियाची केव्हाच पुर्ण झाली आहे. रशियाकडे त्रिस्तरीय सज्जता आहे म्हणजे काय ? तर रशियाकडे १०० किलोमीटरपासून ते अगदी १० हजार किलोमीटरपेक्षा कितीतरी जास्त अंतरावर अचूक मारा करण्याची क्षमता असलेली विविध क्षेपणास्त्रे आहेत. ही क्षेपणास्त्रे एकाच वेळी विविध क्षमेतेचे अणु बॉम्ब वाहून नेऊ शकतात. गरज पडल्यास शत्रू प्रदेशातल्या भागात घुसत अणु बॉम्ब टाकणारी खास लढाऊ विमाने तसंच Tu-160 सारखी बॉम्बफेकी विमाने रशियाकडे आहेत. एवढंच नाही तर शत्रु हल्लाच्या पहिल्याच तडाख्यात जमिनीवरील प्रहार क्षमता नष्ट झाली तर पाण्याखालून क्षेपणास्त्र डागत हल्ला करु शकणाऱ्या विविध अणु पाणबुड्या रशियाकडे आहेत.
अमेरिकेसारख्या देशाच्या युद्ध सज्जतेला अत्यंत अद्यावत आणि अचुक अशा जीपीएस यंत्रणेची जोड आहे. तेव्हा रशियाकडे अमेरिकेच्या जीपीएस यंत्रणेच्या तोडीस तोड अशी उपग्रहांची GLONASS ही यंत्रणा आहे. तसंच संरक्षण दलासाठी अत्यंत आवश्यक अशा तगड्या रडार यंत्रणांचे जाळे रशियाकडे आहे. थोडक्यात रशिया फक्त त्यांच्या भू-भागावरुन नाही तर जगाच्या कोणत्याही भागातून अणु बॉम्ब हल्ला करु शकतो. रशियाच्या अध्यक्षांनी याच सर्व यंत्रणांना सज्जतेचे आदेश दिल्यानेच भितीचे वातावरण पसरले आहे.
अणु बॉम्ब हल्ल्याचे परिणाम जगावर
युक्रेन हा देश रशियाच्या सीमेला लागून असल्याने रशियाला सहज हल्ला करणे शक्य झाले. त्यामुळे अणुबॉम्ब सारखे विध्वंसक शस्त्र वापरणे हे तांत्रिकदृष्ट्या रशियासाठी अवघड नाही. असं असलं तरी अशा अणु बॉम्बच्या हल्ल्याचा फटका युक्रेनला लागुन असलेल्या रशियापासून अनेक देशांना बसू शकतो. मग तो किरणोत्साराच्या स्वरुपात असेल, आर्थिक असेल किंवा मग लष्करी स्वरुपातला असेल. कारण समजा असा हल्ला झालाच तर अमेरिका काही स्वस्त बसणार नाही, असं युद्ध झालंच तर काय होईल याची कल्पना करणे देखील अवघड आहे, या हाणामारीत जगाच्या पटलावर मोठी उलथापालथ होऊ शकते. चेर्नोबिलमधील एका अणु भट्टीतील अपघातामुळे किरणोत्सार हा युरोपभर पसरला होतो हे वास्तव विसरता कामा नये.
सुरुवातीला युद्धाची भिती जरी दाखवली असली तरी रशियाने युद्ध हे प्रत्यक्षात सुरु देखील केलं आहे. त्यात अण्वस्त्र सज्जतेचे आदेश दिले गेल्याने आता रशिया काय पावलं उचलणार याकडे सर्वाचे लक्ष लागलेले आहे. म्हणूनच करोनातून सावरणारे जग आता सध्याच्या बदललेल्या परिस्थितीमुळे तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभं आहे असं म्हंटलं तर ते अजिबात चुकीचे नाही.