करोनाची चाचणी म्हटल्यावर सर्वात आधी वाटणारी भीती म्हणजे नाकात किंवा घशात चाचणीसाठी स्वॅब कलेक्ट करण्याच्या उद्देशाने घातली जाणारी इयरबडसारखी काडी. अनेकांना करोना चाचणीची याचमुळे भीती वाटते. मात्र आता वैज्ञानिकांनी करोना चाचणीसाठी नाक किंवा घशामधून स्वॅब कलेक्ट करण्याऐवजी स्मार्टफोनवरुन स्वॅब कलेक्ट करुन रुग्णाला करोनाची बाधा झालीय की नाही हे शोधण्याचं तंत्र शोधून काढलं आहे. सध्या वापरल्या जाणाऱ्या पीसीआर चाचण्यापेक्षा फोन स्क्रीन टेस्ट (ज्याला पीओएसटी असं म्हटलं जातं) ही शरीराशी थेट संबंध नसलेली, कमी खर्चीच आणि पीसीआर चाचणी इतकीच अचूक असल्याचा दावा वैज्ञानिकांनी केल्याचं ईलाइफ जर्नलमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
नक्की वाचा >> समजून घ्या : लस घेतल्यानंतर नक्की किती दिवसांनी करोना संसर्गाचा धोका कमी होतो
स्मार्टफोनच का?
जेव्हा एखादी व्यक्ती बोलते, खोकते किंवा शिंकते तेव्हा तिच्या तोंडातून लहान लहान थेंब (ज्याला इंग्रजीत ड्रॉपलेट्स म्हणतात) आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरतात, वस्तूंवरही पडतात. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला करोना विषाणू अर्थात सार्क-कोव्ही-२ विषाणू असणारं इंजेक्शन दिलं तर त्या व्यक्तीच्या तोंडातून बाहेर येणाऱ्या थेंबांमध्ये करोना विषाणू असतील. यापूर्वी करण्यात आलेल्या संशोधनामध्ये करोना पसरवणारी सार्क-कोव्ही-२ हा विषाणू वेगवेगळ्या पृष्ठभागांवर आढळून येतो, यामध्ये स्मार्टफोनचाही समावेश आहे.
नक्की वाचा >> Explained: संसर्गाची लाट म्हणजे काय? ती कशी येते? तिसरी लाट टाळता येणं शक्य आहे का?
“स्मार्टफोन ही प्रत्येक व्यक्तीची खासगी गोष्ट असते. स्मार्टफोन अनेकदा व्यक्तींच्या शरीराजवळ खास करुन तोंडाजवळ नेले जातात, त्यामुळेच स्मार्टफोनच्या पृष्ठभागावर मोठ्याप्रमाणात ड्रॉपलेट्स असतात. त्यामुळेच आम्ही करोनाचा संसर्ग झालेली व्यक्ती स्मार्टफोन वापरताना एरोसोल्स (अति सूक्ष्म द्रव्याचे कण), थुंकीचे लहान लहान थेंब आणि नाकावाटे पाहेर पडणारे छोटे ड्रॉपलेट्स स्मार्टफोनच्या पृष्ठभागावर उत्सर्जित करत असल्याचं मानलं. यामधून सार्क-कोव्ही-२ विषाणू रुग्णाच्या स्मार्टफोनच्या पृष्ठभागावर येतो. याच स्मार्टफोनवरील नमुने घेऊन आरटी- पीसीआर चाचण्यांच्या माध्यमातून संसर्गाचा माग घेता येईल,” असं संशोधकांनी म्हटलं आहे. या अभ्यासाचं नेतृत्व डॉ. रॉड्रीगो यंग यांनी केलं आहे. ते युनिर्व्हर्सिटी कॉलेज लंडनमधील प्राध्यापक आहे. यासंदर्भातील अभ्यास ‘डायगनोस बायटेक’मध्ये करण्यात आला असून ही चिलीमधील स्टार्टअप कंपनी डॉ. यंग यांच्या नेतृत्वाखाली काम करते.
नक्की वाचा >> समजून घ्या : करोनानंतर लहान मुलांना होणारा MIS-C आजार आणि त्याच्या सात लक्षणांबद्दल
कशी करतात चाचणी?
फोन स्क्रीन टेस्टमध्ये (पीओएसटी) ज्याप्रमाणे नाकामधून स्वॅब कलेक्ट करतात त्याचप्रमाणे कापूस लावलेल्या काडीच्या आधारे फोनच्या स्क्रीनवरुन नमुने गोळा केले जातील. फक्त फोनवरुन नमुने गोळा करताना या काडीवर थोड्याप्रमाणात मिठाचं पाणी शिंपडलं जाईल. “हे सॅम्पल पीसीआर चाचण्यांसाठी वापरले जाऊ शकतात,” असं डॉ. यंग यांचं म्हणणं आहे. ५४० जणांवर पीओएसटी आणि पीसीआर अशा दोन्ही चाचण्या करण्यात आल्या. दोन वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये या चाचण्या करण्यात आल्या. एका चाचणीतील संशोधनाचा दुसऱ्यावर परिमाण होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आलेली.
नक्की वाचा >> Explained : लसींच्या दोन डोसमधील अंतर वाढलं तर काय होतं?; त्याचे दुष्परिणाम होतात का?
अचूकता किती?
पीओएसटी चाचणीमध्ये करोना विषाणू आढळून येण्याचं प्रमाणे हे ८१.३ टक्के ते १०० टक्के इतकं दिसून आलं. संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या फोनवर हे विषाणू शोधण्यात पीओएसटी चाचणी यशस्वी ठरली. ५४० व्यक्तींपैकी ५१ जणांच्या नाकातील आणि घशामधील स्वॅब सॅम्पलमध्ये करोना विषाणू आढळून आलं. तर इतर १५ जणांच्या चाचणीमध्ये सीटी व्हॅल्यी कमी आल्याने आणि त्यानंतर पीओएसटी चाचणीत ते पॉझिटीव्ह आढळून आले. यावरुन करोना पॉझिटिव्ह व्यक्तींचा माग घेण्यासाठी आणि त्यांना करोनाचा संसर्ग झाला आहे की नाही हे शोधण्यासाठी पीओएसटी चाचणी फायद्याचं असल्याचा दावा हा अहवाल लिहिणाऱ्या शास्त्रज्ञांनी केलाय. तसेच २९ अन्य सॅम्पलमध्ये सीटी व्हॅल्यू ही मध्यम स्तरावरील (३० हून कमी) आढळून आली असता तिथे पीओएसटी चाचणी ८९.७ टक्के अचूक आली.
पीओएसटी चाचणी करोना निगेटिव्ह रुग्ण शोधून काढण्याची टक्केवारी ही ९८.८ टक्के इतकी दिसून आली. यापैकी सहा जणांची चाचणी पीओएसटीमध्ये सकारात्मक तर क्लिनिकल स्वॅब चाचणीमध्ये नकारात्मक दिसून आली. या चाचण्या फॉल्स पॉझिटिव्ह ठरल्या. तर या चाचणीमध्ये सहभागी झालेल्या दोघांना करोनाची लक्षण दिसत असतानाही चाचणी नकारात्मक असल्याने त्या चाचण्या फॉल्स निगेटीव्ह गृहित ठरण्यात आल्या.
नक्की वाचा >> Positivity Rate म्हणजे काय? तो इतका का महत्वाचा असतो?
हे संशोधन महत्वाचं का आहे?
मोठ्या प्रमाणामध्ये करोना चाचण्या करण्यासाठी पीओएसटी पद्धत उत्तम असल्याचा दावा संशोधकांनी केलाय. सध्याच्या पद्धतीने करण्यात येणाऱ्या चाचण्यामध्ये थेट शरीरामध्ये बाहेरील वस्तूंचा संपर्क होतो, त्या महागड्या असतात आणि नमुने गोळा करुन चाचणी करणं गुंतागुंतीची प्रक्रिया असल्याचं हे संशधक सांगतात.
“महत्वाची गोष्ट ही आहे की संसर्ग झालेल्यांपैकी अनेकजण हे लक्षणं न दिसणारे रुग्ण असतात. त्यामुळे त्यांच्या नकळत विषाणूचा फैलाव होतो,” असं डॉ. यंग यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना सांगितलं. “वेळोवेळी आपण सर्व लोकांच्या ज्यामध्ये लक्षणं नसणाऱ्यांच्याही चाचण्या करत राहिल्यास आपल्याला या साथीवर वेगाने नियंत्रण मिळवता येईल,” असा विश्वासही डॉ. यंग यांनी व्यक्त केला.
नक्की वाचा >> समजून घ्या : Long Covid म्हणजे काय आणि त्यावर कशी मात करता येते?
सध्या डॉ. यंग यांच्या नेतृत्वाखाली चिलीमधील स्टार्टअप कंपनी ‘डायगनोस बायटेक’ पीओएसटी चाचण्या कशा कराव्यात यासंदर्भातील संशोधन सुरु आहे. युसीएलच्या वेबसाईटनुसार या तंत्रज्ञानाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या माध्यमातून चाचण्या करुन थेट एसएमएसवरुन त्यांचा निकाल कळवल्यास प्रत्यक्ष संपर्कात न येता चाचण्या करुन करोनाबाधितांचा शोध घेता येईल.