अन्वय सावंत
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने २००७मध्ये पहिल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावले. त्यानंतर मुंबईमध्ये भारतीय खेळाडूंचे ज्या थाटामाटात स्वागत झाले, ते आजही प्रत्येक क्रिकेटरसिकाच्या स्मरणात आहे. भारतीय संघाने आपल्या कामगिरीत सातत्य राखताना २०११मध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३मध्ये चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या जेतेपदावर मोहोर उमटवली. परंतु त्यानंतरच्या नऊ वर्षांत ‘आयसीसी’च्या जागतिक स्पर्धांमध्ये भारताला जेतेपदाने हुलकावणी दिली आहे. आता ऑस्ट्रेलियात रविवारपासून (१६ ऑक्टोबर) सुरू होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात जेतेपदाचा हा दुष्काळ संपवण्याची भारतीय संघाला संधी मिळणार आहे. मात्र, या संधीचे सोने करण्यासाठी भारतीय संघ कितपत सज्ज आहे, याचा घेतलेला आढावा.
भारतीय संघाने अलीकडच्या काळात कशी कामगिरी केली आहे?
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने अलीकडच्या काळात सातत्याने यश संपादन केले आहे. भारतीय संघाने सर्वाधिक सलग ट्वेन्टी-२० सामने जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. भारताने नोव्हेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत सलग १२ ट्वेन्टी-२० सामने जिंकले. तसेच भारताने या वर्षात २३ ट्वेन्टी-२० सामने जिंकण्याची विक्रमी कामगिरी केली आहे. भारताने इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या संघांविरुद्ध ट्वेन्टी-२० मालिका विजय साजरे केले. परंतु अमिराती येथे झालेल्या आशिया चषक ट्वेन्टी-२० स्पर्धेत भारताला उपान्त्य फेरीही गाठता आली नाही. या स्पर्धेच्या ‘अव्वल चार’ फेरीत पाकिस्तान आणि श्रीलंकेकडून भारताला पराभव पत्करावा लागला. आता पाकिस्तानविरुद्धच भारताला ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या मोहिमेचा प्रारंभ करायचा आहे.
हेही वाचा – विश्लेषण : इंडोनेशियातील फुटबॉल सामने वारंवार हिंसक का ठरतात?
फलंदाजांची समाधानकारक कामगिरी?
फलंदाजी हे कायमच भारताचे बलस्थान मानले जाते. कर्णधार रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि दिनेश कार्तिक या भारताच्या अव्वल सहा फलंदाजांना रोखणे हे प्रतिस्पर्धी संघांतील गोलंदाजांपुढील मोठे आव्हान असणार आहे. राहुलच्या धावगतीबाबत (स्ट्राईक रेट) गेल्या काही काळात बरीच चर्चा सुरू होती. मात्र, त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांत १४६.६६च्या धावगतीने धावा केल्या. त्यानंतर त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोनही सामन्यांत अर्धशतके झळकावली. त्याचा सलामीचा साथीदार रोहितने मोठी खेळी केलेली नसली, तरी तो आक्रमक शैलीत फलंदाजी करून गोलंदाजांवर दडपण आणतो आहे. कोहलीची गेल्या काही सामन्यांतील कामगिरी हा भारतासाठी सर्वात मोठा दिलासा आहे. आशिया चषकात कोहलीने अफगाणिस्तानविरुद्ध नाबाद १२२ धावांची खेळी करताना अडीच वर्षांपासूनचा शतकाचा दुष्काळ संपवला. या स्पर्धेच्या पाच सामन्यांत त्याने शतकासह दोन अर्धशतकेही साकारली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध निर्णायक सामन्यात त्याने ६३ धावांची खेळी केली. कोहलीला मुंबईकर सूर्यकुमारने तोलामोलाची साथ दिली आहे. सूर्यकुमार सध्या भारताचा सर्वात लयीत असणारा फलंदाज आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळून गेल्या सहा सामन्यांत अनुक्रमे ४६, ०, ६९, नाबाद ५०, ६१, ८ धावा अशी सूर्यकुमारची कामगिरी आहे. त्याने या दोन्ही मालिकांमध्ये १८५ हूनही अधिकच्या धावगतीने धावा केल्या. तसेच कार्तिक आणि हार्दिक विजयवीराची भूमिका चोख बजावत आहेत.
पण वेगवान गोलंदाजांच्या कामगिरीची का चिंता?
भारतासाठी गोलंदाजी हा चिंतेचा विषय ठरतो आहे. प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला पाठीच्या दुखापीमुळे ट्वेन्टी-२० विश्वचषकाला मुकावे लागणार आहे. त्याच्या जागी अनुभवी मोहम्मद शमीची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. परंतु शमीने गेल्या वर्षीच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर एकही आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामना खेळलेला नाही. त्यातच करोनाची बाधा झाल्यामुळे त्याला नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेविरुद्धच्या मालिकांना मुकावे लागले होते. त्यामुळे त्याच्या तंदुरुस्तीबाबत प्रश्नचिन्ह आहे. या स्पर्धेसाठी शमीसह भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग या वेगवान गोलंदाजांचा भारतीय संघात समावेश आहे. मात्र, भुवनेश्वर आणि हर्षल गेल्या काही सामन्यांत महागडे ठरले असून त्यांना फारसे बळीही मिळवता आलेले नाहीत. अर्शदीपने नव्या चेंडूने गोलंदाजी करताना प्रभावित केले असले, तरी अखेरच्या षटकांत त्याने धावा खर्ची केल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच हार्दिकच्या रूपात वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू भारताकडे उपलब्ध आहे. मात्र, त्यालाही कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. तसेच त्याच्यावर गोलंदाजीचा अतिरिक्त ताण आल्यास त्याला दुखापतीचाही धोका आहे.
फिरकीपटूंवर दडपण का?
यजुवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल असे फिरकी गोलंदाजांचे दर्जेदार पर्याय भारताकडे उपलब्ध आहेत. मात्र, लेग-स्पिनर चहलला गेल्या काही सामन्यांत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. आशिया चषकापासून चहलने सात सामन्यांत केवळ सहा गडी बाद केले आहेत. यापैकी तीन सामन्यांत त्याने १० हून अधिकच्या धावगतीने धावा दिल्या आहेत. त्यामुळे आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी चहलच्या जागी ऑफ-स्पिनर अश्विनला संधी देण्यात आली. मात्र, तीनही सामन्यांत अश्विनची बळींची पाटी कोरीच राहिली. त्यामुळे ट्वेन्टी-२० विश्वचषकाला सुरुवात होण्यापूर्वी या दोघांवर दडपण आहे. डावखुऱ्या अक्षरने गोलंदाजीत प्रभावित केले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने तीन सामन्यांत आठ गडी बाद करत मालिकावीराचा पुरस्कार पटकावला. मात्र, अष्टपैलू रवींद्र जडेजाला दुखापत झाल्यामुळे अक्षरला विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. त्यामुळे अक्षरकडून फलंदाजीतही योगदानाची भारताला अपेक्षा आहे.
ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, यजुर्वेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
भारताचे साखळी सामने –
विरुद्ध पाकिस्तान (२३ ऑक्टोबर)
विरुद्ध प्राथमिक फेरीतून आलेला संघ (२७ ऑक्टोबर)
विरुद्ध दक्षिण आफ्रिका (३० ऑक्टोबर)
विरुद्ध बांगलादेश (२ नोव्हेंबर)
विरुद्ध प्राथमिक फेरीतून आलेला संघ (६ नोव्हेंबर)