अन्वय सावंत
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामने निर्धारित वेळेत पूर्ण व्हावेत, या हेतूने षटकांची गती राखण्यासाठी नव्या नियमांची तरतूद केली आहे. यापुढे षटकांची गती राखण्यात अपयशी ठरणाऱ्या संघांना उर्वरित डावात ३० यार्डाच्या वर्तुळाबाहेर क्षेत्ररक्षणासाठी पाचऐवजी केवळ चारच क्षेत्ररक्षक ठेवता येणार आहेत. ‘आयसीसी’ने उचललेल्या कठोर पावलामुळे ट्वेन्टी-२० सामन्यांची गती अधिक वाढण्याची शक्यता आहे.
‘आयसीसी’चा नवा नियम काय?
‘आयसीसी’च्या खेळाडू आणि साहाय्यकांच्या संहितेमधील कलम २.२२ अनुसार षटकांची गती कमी राखणारे संघ आणि कर्णधारांना आर्थिक दंड, तसेच वजा गुण या स्वरूपाची कारवाई केली जात होती. मात्र, आता यात मोठा बदल करण्यात आला आहे. ‘‘खेळाची स्थिती या अंतर्गत कलम १३.८मध्ये षटकांची गती योग्य राखण्याबाबत केलेल्या नव्या नियमानुसार क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने डावाच्या अखेरच्या षटकातील पहिला चेंडू नियोजित किंवा सुधारित वेळेत टाकायला हवा. अन्यथा, ३० यार्डाच्या वर्तुळाबाहेरील एक क्षेत्ररक्षक संघाला कमी करावा लागेल,’’ असे ‘आयसीसी’ने स्पष्ट केले आहे.
२० षटके पूर्ण करण्यासाठी संघांकडे किती वेळ?
आतापर्यंत प्रत्येक संघाला २० षटके पूर्ण करण्यासाठी ८५ मिनिटांचा निर्धारित वेळ दिला जात होता. ‘आयसीसी’च्या नव्या नियमानुसार, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आता २०वे षटक ८५व्या मिनिटाच्या आत सुरू करणे अनिवार्य असेल. दुखापत, ‘डीआरएस’, चेंडू हरवणे किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव वाया गेलेला वेळ भरपाई म्हणून दिला जातो.
वेळेवर कोणाचे लक्ष?
सामन्यातील तिसरे पंच हे वेळेवर लक्ष ठेऊन असतील. कोणत्याही कारणाने खेळ थांबल्यास वेळेचे पुनरावलोकन करण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असेल. क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी करणाऱ्या संघांना वेळ संपल्याची तेच सूचना देतील.
किती क्षेत्ररक्षक ३० यार्डाबाहेर ठेवण्याची परवानगी?
ट्वेन्टी-२० सामन्यातील पहिली सहा षटके ‘पॉवरप्ले’ची असतात. यात गोलंदाजी करणाऱ्या संघाला केवळ दोन क्षेत्ररक्षक ३० यार्डाच्या वर्तुळाबाहेर ठेवण्याची परवानगी असते. ‘पॉवरप्ले’नंतर संघांना पाच क्षेत्ररक्षक ३० यार्डाच्या वर्तुळाबाहेर ठेवता येतात. मात्र, आता नियोजित वेळेत २० षटके टाकण्यात एखादा संघ अपयशी ठरल्यास नियोजित वेळेनंतर या संघाला चारच क्षेत्ररक्षक ३० यार्डाच्या वर्तुळाबाहेर ठेवता येतील.
नवे नियम कधीपासून लागू?
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामने निर्धारित वेळेत पूर्ण व्हावेत यासाठी करण्यात आलेल्या ‘आयसीसी’च्या नव्या नियमांनुसार पहिला सामना वेस्ट इंडिज आणि आयर्लंड यांच्यात होणार आहे. हा सामना १६ जानेवारीला सबिना पार्क, जमैका येथे रंगेल. याचप्रमाणे १८ जानेवारीला दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील महिलांचा सामना या नियमानुसार होईल. भारताला या नियमानुसार पहिल्यांदा वेस्ट इंडिजविरुद्ध खेळावे लागू शकेल. या दोन संघांमध्ये तीन सामन्यांची ट्वेन्टी-२० मालिका होणार असून पहिला सामना १५ फेब्रुवारीला कटक येथे होईल.
याआधी हा नियम कुठे वापरला गेला आहे का?
मागील वर्षी इंग्लंडमधील स्थानिक ट्वेन्टी-२० सामन्यांत या नियमाचा अवलंब केला गेला. ‘आयसीसी’ने इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाच्या नियमाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाठोपाठ ‘आयपीएल’सारख्या मोठ्या ट्वेन्टी-२० स्पर्धांतही या नव्या नियमाचा वापर केला जाऊ शकेल. ‘आयपीएल’च्या मागील हंगामात संघांना २० षटके पूर्ण करण्यासाठी ८५ मिनिटे देण्यात आली होती. मात्र, ८५व्या मिनिटांपूर्वी अखेरच्या षटकाचा केवळ पहिला चेंडू टाकला जाणे गरजेचे होते. त्यानंतरचे पाच चेंडू टाकण्यासाठी वेळेची सक्ती नव्हती.