ऋषिकेश बामणे
अपेक्षेप्रमाणे भारतीय संघाने युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या (१९ वर्षांखालील) विजेतेपदावर नाव कोरले. संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहणाऱ्या भारताने अंतिम फेरीत इंग्लंडवर चार गडी आणि १४ चेंडू राखून सरशी साधून विक्रमी पाचव्यांदा जगज्जेतेपद ठरण्याचा मान मिळवला. त्यांच्या या यशामुळे भारताला भविष्यातील तारे गवसले आहेत. भारताच्या जेतेपदापर्यंतच्या वाटचालीचा आणि खेळाडूंपुढील आगामी आव्हानांचा घेतलेला हा थोडक्यात आढावा.
भारताच्या विजयाचे शिल्पकार कोण?
इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात पाच बळी आणि ३५ धावा अशी दुहेरी चमक दाखवणारा राज बावा भारताच्या विजयाचा नायक ठरला. भारताकडून विश्वचषकाच्या अंतिम लढतीत पाच बळी मिळवणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला. विश्वचषकातील सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या (१६२*) राजच्याच नावावर आहे. याव्यतिरिक्त डावखुरा वेगवान गोलंदाज रवी कुमारने अंतिम फेरीत चार बळी मिळवले. फलंदाजीत उपकर्णधार शेख रशीद आणि निशांत सिंधूू यांनी अर्धशतकी खेळी साकारून प्रगल्भतेचे दर्शन घडवले. त्याशिवाय यश धूलच्या कल्पक नेतृत्वालाही विजयाचे श्रेय द्यावेच लागेल. प्रशिक्षक हृषिकेश कानिटकर आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (एनसीए) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी केलेले मार्गदर्शन संघाला यशस्वी ठरल्याचे कामगिरीद्वारे सिद्ध झाले.
महाराष्ट्राच्या खेळाडूंचे योगदान…
भारताच्या जेतेपदापर्यंतच्या वाटचालीत महाराष्ट्राच्या चार खेळाडूंनी मोलाची भूमिका बजावली. मुंबईकर सलामीवीर अंक्रिश रघुवंशी, अष्टपैलू कौशल तांबे, वेगवान गोलंदाज राजवर्धन हंगर्गेकर आणि फिरकीपटू विकी ओस्तवाल या चौकडीने वेळोवेळी संघासाठी योगदान दिले. रघुवंशीने भारताकडून स्पर्धेत सर्वाधिक २७८ धावा केल्या. तर विकीने भारतासाठी सर्वाधिक १२ बळी मिळवले. याव्यतिरिक्त, कौशल आणि राजवर्धन यांनी संघासाठी उपयुक्त अष्टपैलू खेळ केला.
भारताची जेतेपदापर्यंत वाटचाल कशी झाली?
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयी सलामी नोंदवत भारताने विश्वचषकाच्या अभियानाचा दिमाखात प्रारंभ केला. त्यानंतर कर्णधार धूलसह सहा जणांना करोनाची लागण झाल्याने भारताची अंतिम ११ खेळाडू खेळवताना तारेवरची कसरत करावी लागली, तरीही निशांत सिंधूच्या नेतृत्वाखाली भारताने आयर्लंड, युगांडा या संघांचा सहज धुव्वा उडवला. मग उपांत्यपूर्व फेरीत गतविजेत्या बांगलादेशला धूळ चारून भारताने २०२०च्या अंतिम फेरीतील पराभवाचा वचपा काढला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य लढतीत भारत प्रमुख खेळाडूंसह पूर्ण तयारीने मैदानात उतरला. धूलने शतकी नजराणा पेश केल्यामुळे भारताने ऑस्ट्रेलियावर वर्चस्व गाजवून सलग चौथ्यांदा आणि विक्रमी आठव्यांदा अंतिम फेरीतील स्थान पक्के केले.
भविष्यातील आव्हाने काय आहेत?
युवा खेळाडूंनी मिळवलेले यश कौतुकास्पद असले तरी त्यांना त्वरित भारताच्या मुख्य संघात स्थान लाभणे कठीण आहे. दर दोन वर्षांनी होणाऱ्या युवा विश्वचषकामुळे भारताला असंख्य प्रतिभावान क्रिकेटपटूंचा मिळत आहेत. परंतु यांपैकी बहुतांश जण स्थानिक स्पर्धा तसेच मुख्य भारतीय संघात आल्यावर कामगिरी उंचावण्यात अपयशी ठरतात. तर काहींना आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वत:चे कौशल्या दाखवण्याची संधीच मिळत नाही. त्यामुळे विजयाची हवा डोक्यात न जाऊ देता खेळाडूंनी पुढील २-३ वर्षे सातत्यपूर्ण खेळ करून निवड समितीचे लक्ष वेधणे गरजेचे आहे.