मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे जिल्ह्यातील देहूमधील संत तुकाराम शिला मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. पंढरपूरला दरवर्षी जाणाऱ्या ऐतिहासिक यात्रेची सुरुवात या शिलेपासून होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिला मंदिर

संत तुकारामांचा अभंगाचा गाथा इंद्रायणी नदीत बुडाल्यानंतर तुकाराम महाराज ज्या शिलेवर १३ दिवस अन्न पाण्याशिवाय बसून होते व गाथा १३ दिवसांनंतर चमत्कार व्हावा तशा पाण्यातून वर आल्या अशी आख्यायिका आहे. आनंदडोहाजवळून ही शिला किंवा दगड या ठिकाणी आणण्यात आला. ही शिला अत्यंत पवित्र असून वारकरी संप्रदायासाठी भक्तिभावाचे स्थान असल्याचे जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितिन महाराज मोरे सांगतात.

Photos : पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होणारे देहूतील शिळा मंदिर कसे आहे? पाहा…

देहू संस्थानच्या वास्तूत तुकाराम महाराजांची प्रतिमा असून २००८ मध्ये चांदीचा मुखवटा चोरीला गेला होता, जो काही दिवसांनी इंद्रायणी नदीच्या तीरावर मिळाला. त्यावेळी या ठिकाणी मंदिर बांधण्याचे व ही जागा अधिक सुरक्षित करण्याचे संस्थानने ठरवले. याच मंदिराचे उद्घाटन मंगळवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे.

वारकरी संप्रदाय

महाराष्ट्रभर पसरलेल्या वारकरी संप्रदायासाठी संत तुकाराम महाराज व त्यांचे कार्य वंदनीय आहे. जातिविरहित समाज, कर्मकांडांना विरोध हा तुकाराम महाराजांचा संदेश सामाजिक चळवळीला बळ देणारा ठरला. पंढरपूरच्या वारीचे श्रेयही संत तुकारामांना दिले जाते. पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या या वाऱ्यांमध्ये देहूमधून संत तुकारामांच्या तर आळंदीहून संत ज्ञानेश्वरांच्या पादुका वाजत गाजत नेल्या जातात. एकादशीच्या दिवशी वारी पंढरपूरला पोचते, ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठोबा रखुमाईची महापुजा केली जाते.

मोदींच्या भेटीचं महत्त्व

पंतप्रधान नरेंद्र मोदींची या मंदिराला असलेली ही पहिली भेट आहे. वारकरी संप्रदायाशी सगळेच राजकीय पक्ष जवळचे संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. वारकरी संप्रदायातील नेतेही विविध विषयांवर भूमिका घेतात, पण ते राजकारणाशी थेट जोडले जात नाहीत. याआधी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी २००९ मध्ये मंदिराला भेट दिली होती, आता मोदी हे या ठिकाणी भेट देणारे पहिले पंतप्रधान असतील. या वर्षी अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत हे ही विशेष. शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेसच्या मविआचे सरकार सत्तेत आल्यापासून पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे. २०१९ नंतर झालेल्या तीन पोटनिवडणुकांमध्ये भाजपा केवळ एका ठिकाणी विजयी झाली असून मविआ दोन जागी विजयी झाली आहे.

नवीन स्थापन झालेल्या देहू नगर पंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained importance of sant tukaram temple inaugurated by pm modi abn