कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते वादळ गुजरातकडे मार्गक्रमण करत आहे. या वादळाचे वर्गीकरण अतिरौद्र म्हणजेच व्हेरी सिव्हयर सायक्लॉनिक स्ट्रोम अर्थात व्हीएससीएस प्रकारात करण्यात आलं आहे. हे वादळ मंगळवारी गुजरात किनारपट्टीवर धडक देणार आहे. मागील काही वर्षांमध्ये अरबी समुद्रामध्ये वादळं निर्माण होण्याचं प्रमाण वाढल्याचं दिसत आहे.

रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तौक्ते वादळ हे पणजीच्या वायव्येला १९० किमीवर होते. मुंबईच्या दक्षिण-नैऋत्येला हे वादळ २७० किमी अंतरावर होतं. तर विरावलपासून दे ५१० किमीवर होतं. दिवपासून ४७० तर कराचीपासून ७०० किमी अंतरावर असतानाच या वादळाचा वेग वाढला आणि ते सोमवार रात्रीपर्यंत आणखीन तीव्र होणार असल्याचं सांगण्यात आलं.

नक्की वाचा >> “चक्रीवादळ गुजरातला पळविण्याचा मोदी-शहांचा डाव, संजय राऊत चक्रीवादळाला मुंबईतच अडवणार”

गुजरातला बसणार फटका…

मंगळवारी पहाटे तौक्ते वादळ गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील पोरबंदर आणि माहुवा किनाऱ्यांना धडकण्याआधी अती तीव्र स्वरुपाचे म्हणजेच व्हीएससीएस प्रकारचे वादळ असेल. हे वादळ जेव्हा गुजराच्या किनारपट्टीला धडकेल तेव्हा त्याचा वेग १५० ते १६० किमी प्रती तास इतका असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. वादळामुळे गुजरातमधील कच्छ, सौराष्ट्र, पोरबंदर, जुनागढ, भावनगर, अहमदाबाद, सुरत, वलसाड, अमरेली, आनंद आणि भरुच या १२ जिल्ह्यांबरोबरच दिवमध्येही मोठ्याप्रमाणात पाऊस पडेल असा अंदाज आहे.

तौक्ते वादळ वेगळं का आहे?

तौक्ते वादळ हे मागील चार वर्षांमध्ये अरबी समुद्रात निर्माण झालेलं चौथं वादळ आहे. मागील चार वर्षांपासून सलग अरबी समुद्रामध्ये वादळं निर्माण होत आहेत. खास करुन एप्रिल ते जून म्हणजेच प्री मान्सून कालावधीमध्ये ही वादळ तयार होत असल्याचं दिसून आलं आहे. २०१८ पासून या कालावधीमध्ये निर्माण झालेली वादळ ही सिव्हियर म्हणजेच धोकादायक किंवा त्याहून वरच्या प्रकारची अधिक घातक वादळ ठरली आहेत. तौक्ते वादळ जेव्हा गुजरातला धडकेल तेव्हा मागील चार वर्षांमध्ये निर्माण झालेल्या वादळांपैकी हे महाराष्ट्र किंवा गुजरातला धडकणारं तिसरं वादळ ठरेल. यापूर्वी २०१८ मध्ये मेकानू वादळ ओमानच्या किनारपट्टीवर धडकलं होतं, २०१९ साली वायू वादळ गुजरात किनारपट्टीला धडकलं होतं. मागील वर्षी म्हणजेच २०२० मध्ये ३ जून रोजी निसर्ग वादळ महाराष्ट्राच्या उत्तरेकडील किनारपट्टीला धडकलं होतं.

सर्वात कमी कालावधीमध्ये तीव्र होणारं वादळ

तौक्ते वादळ अगदी कमी काळामध्ये घातक स्वरुपाचं वादळ झालं. अरबी समुद्रामध्ये १४ तारखेला कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. १४ मे रोजी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतर अवघ्या ४८ तासांमध्ये म्हणजेच १६ मे रोजी या वादळाला व्हेरी सिव्हयर सायक्लॉनिक स्ट्रोम अर्थात व्हीएससीएस घोषित करण्यात आलं. तौक्तेशी तुलना केल्यास वायू वादळ ३६ तासांमध्ये व्हीएससीएस झालं होतं तर मेकानूला यासाठी चार आणि निसर्ग वादळाने पाच दिवसांचा अवधी घेतला होता. म्हणजेच तौक्ते वादळ हे सर्वात जलद गतीने घातक वादळ होण्याच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. तसेच २०२० आणि २०२१ मध्ये आलेल्या वादळांपैकी मान्सूच्या महिन्याआधीच आलेलं व्हीएससीएस प्रकारचं हे पहिलंच वादळ आहे.

वादळं कशी निर्माण होतात?

उष्णकटिबंधीय चक्रीवादळांना जीवंत राहण्यासाठी ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा त्यांना उष्ण पाण्यामधून आणि समुद्रावरील बाष्पातून मिळते. सध्या समुद्राच्या पाण्याच्या पातळीपासून ५० मीटर खोल अंतरावरील पाणी हे समुद्रामधील खोल भागातील पाण्याच्या तुलनेने जास्त उष्ण असते. त्यामुळे या दोन्ही गोष्टींपासून ऊर्जा मिळाल्याने तौक्ते वादळ अधिक तीव्र आणि घातक झालं आहे.

पाण्याची वाफ होण्याचं प्रमाण कमी झाल्याने जास्त उष्णता बाहेर येते आणि तितका कमी दाबाचा पट्टा अधिक परिणाम दाखवतो. चक्रीवादळ तयार करण्यासाठी कमी-दाबाच्या पट्ट्यामध्ये अनेक स्तरांवर बदल होत होत अखेर ते चक्रीवादळाचं रुप धारण करतं.

बदलणारा ट्रेण्ड

सामान्यपणे उष्णकटिबंधीय चक्रीवादळं हे उत्तरेकडील समुद्री भागांमध्ये म्हणजेच बंगालची खाडी आणि अरबी समुद्रामध्ये मान्सूनपूर्व काळामध्ये आणि मान्सूननंतर (ऑक्टोबर ते डिसेंबर) तयार होतात. मे-जून आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात निर्माण होणारी वादळं ही भारतीय किनारपट्टी भागाला खूप जास्त हानी पोहचवणारी असतात.

अरबी समुद्रात नक्की काय घडतंय?

मागील काही वर्षांमध्ये बंगालची खाडी आणि अरबी समुद्रामध्ये सरासरी पाच वादळं निर्माण झाली आहेत. त्यापैकी चार वादळं ही बंगालच्या खाडीमध्ये निर्माण झालीय. येथील वातावरण हे अरबी समुद्रापेक्षा अधिक उष्ण असतं. अरबी समुद्रामध्ये सामान्यपणे लक्षद्वीप परिसरामध्ये वादळं निर्माण होतात आणि नंतर ती भारताच्या पश्चिमेकडील किनारपट्टी भागाला आदळतात. मात्र मागील काही वर्षांमध्ये अरबी समुद्रावरील तापमानही आधीच्या तुलनेत अधिक उष्ण होऊ लागलं आहे. हे सारं जागतिक वातावरण बदलांमुळे म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंगमुळे घडत असून समुद्राचे तापमान असेच वाढत राहिल्यास वादळं निर्माण होण्याचं प्रमाण वाढत राहिलं असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळेच अमेरिकन आणि इतर युरोपीयन देशांप्रमाणे वादळं ही महाराष्ट्र, गुजरात, केरळ, गोवा कर्नाटकच्या किनरापट्टी भागांना तडाखा देत राहतील अस म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.

Story img Loader