कोविडच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेदरम्यान, ताप आणि वेदना कमी करणारे औषध डोलो-६५० (Dolo 650 mg), हे देशभरात पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. डोलो-६५० या लोकप्रिय औषधाची निर्मिती करणाऱ्या मायक्रो लॅब्स लिमिटेड, बंगळुरूच्या कार्यालयावर प्राप्तिकर विभागाने बुधवारी छापा टाकला. प्राप्तिकर विभागाच्या २० अधिकाऱ्यांनी बंगळुरूच्या रेसकोर्स रोडवर असलेल्या फार्मास्युटिकल कंपनीच्या आवारात छापा टाकला होता. आयकर अधिकाऱ्यांनी सांगितले की, या कंपनीच्या परिसरात झडती दरम्यान आर्थिक कागदपत्रांची छाननी करण्यात येत आहे. या फार्मा कंपनीवर करचुकवेगिरीचा आरोप आहे.
बुधवारी प्राप्तिकर विभागाच्या २०० अधिकाऱ्यांनी देशातील ४० ठिकाणी कंपनीच्या आवारात छापे टाकले आहेत. ज्या ठिकाणी छापे टाकण्यात आले त्यात बंगळुरूशिवाय नवी दिल्ली, सिक्कीम, पंजाब, तामिळनाडू आणि गोवा येथील कार्यालयांचा समावेश आहे. मायक्रो लॅबचे सीएमडी दिलीप सुराणा आणि संचालक आनंद सुराणा यांच्या घरावरही छापे टाकण्यात आले आहेत.
छाप्यादरम्यान, प्राप्तिकर विभागाच्या अधिकार्यांनी बेंगळुरूच्या माधवनगर येथील रेसकोर्स रोड येथे असलेल्या डोलो-६५० टॅबलेट निर्मिती कंपनी मायक्रो लॅब्स लिमिटेडच्या कार्यालयातून अनेक महत्त्वाची कागदपत्रे तपासली आहेत.
डोलो-६५० म्हणजे काय?
डोलो-६५० टॅब्लेट हे वेदना कमी करण्यासाठी आणि ताप कमी करण्यासाठी वापरले जाणारे औषध आहे. डोकेदुखी, अंगदुखी, दातदुखी आणि सर्दी यांसारख्या इतर समस्यांवर उपचार करण्यासाठी याचा वापर केला जातो. वेदना आणि ताप कारणीभूत असलेल्या काही रसायनांचे प्रकाशन रोखून ते कार्य करते.
‘डोलो ६५०’ नक्की कसं काम करते?
डोलो-६५० टॅब्लेट एकट्याने किंवा दुसर्या औषधाच्यासोबत दिले जाऊ शकते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते नियमितपणे घेता येते. सामान्यतः याचे सेवन अन्नासोबत करणे चांगले असते, अन्यथा त्यामुळे पोटाचा त्रासही होऊ शकतो. याचे जास्त प्रमाणात सेवन करू नये असा सल्लाही डॉक्टरांकडून दिला जातो.
डोलो-६५० लोकप्रिय कशी झाली?
कोविड-१९ची सामान्य लक्षणे, ताप आणि वेदना कमी करण्यासाठी डॉक्टर आणि मेडिकल दुकानांद्वारे डोलो-६५० लिहून दिले जात होते. क्रोसिन, डोलो, कॅल्पोल ही फार्मा कंपन्यांनी दिलेली वेगवेगळी ब्रँड नावे आहेत जी त्यांच्या कॉपीराइट अंतर्गत समान टॅब्लेट विकतात.
४०० कोटींचा महसूल
२०२० मध्ये कोविड १९ चा उद्रेक झाल्यापासून कंपनीने ३५० कोटी डोलो-६५० टॅब्लेट विकल्या आहेत. यामुळे कंपनीला एका वर्षात ४०० कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.
इंडियन फार्मासिस्ट असोसिएशनचे सरचिटणीस भूपेंद्र कुमार यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, “क्रोसिन आणि डोलो हे पॅरासिटामॉलचे निर्धारित ब्रँड आहेत. कोविडच्या दुसऱ्या लाटेत खूप लोकांना ताप येत असल्याने अनेक डॉक्टर डोलो-६५० टॅब्लेट लिहून देत होते.”
दुसऱ्या लाटेदरम्यान डोलो-६५० टॅब्लेटची सुरुवात एक पसंतीची प्रिस्क्रिप्शन म्हणून झाली असली तरी, अहवालानुसार अनेकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्याचा वापर सुरू ठेवला आहे. “एखाद्या डॉक्टरने एक प्रिस्क्रिप्शन लिहिल्यास ते व्हॉट्सअॅपवर शेअर केले जाते आणि १० लोक ते वापरतात. अशाप्रकारे ताप, वेदनांसाठी लोक डोलोचा वापर करू लागले,” असे कुमार म्हणाले.
मायक्रो लॅबविषयी
कंपनीच्या वेबसाइटनुसार, मायक्रो लॅब्स फार्मास्युटिकल उत्पादनामध्ये आणि विपणनामध्ये गुंतलेली आहे आणि देशभरात १७ उत्पादन युनिट्स आहेत. Dolo-650, Amlong, Lubrex, Diapride, Vildapride, Olmat, Avas, Tripride, Bactoclav, Tenepride-M आणि Arbitel ही त्यांची प्रमुख फार्मा उत्पादने आहेत. दिलीप आणि आनंद सुराणा हे दोघे भाऊ त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेली कंपनी चालवतात. फोर्ब्सच्या मते त्यांची किंमत २.२४ अब्ज डॉलर आहे.