अन्वय सावंत
भारतीय पुरुष क्रिकेट संघाने गेल्या चार-पाच वर्षांमध्ये मायदेशासह परदेशात सातत्याने कसोटी मालिका जिंकण्याची दमदार कामगिरी केली आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियात दोनदा, तर वेस्ट इंडिजमध्ये एकदा कसोटी मालिका विजय साजरा केला. तसेच त्यांनी दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामने जिंकले. परंतु परदेशातील गेल्या पाचपैकी चार कसोटी सामन्यांमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला आहे. विशेषत: या कसोटी सामन्यांच्या तिसऱ्या डावात फलंदाजी आणि चौथ्या डावात गोलंदाजी या मोक्याच्या काळात निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे भारतीय संघासाठी हा चिंतेचा विषय असल्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने अलीकडेच मान्यही केले.
परदेशातील गेल्या काही सामन्यांत काय घडले?
भारतीय संघाने गेल्या वर्षी जूनमध्ये न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना खेळला होता. इंग्लंडमधील साऊदम्पटन येथे झालेल्या या सामन्यात भारताचा पहिला डाव २१७ धावांत आटोपल्यानंतर न्यूझीलंडने २४९ धावांची मजल मारली. त्यानंतर भारताचा दुसरा डाव अवघ्या १७० धावांत संपुष्टात आला आणि न्यूझीलंडला विजयासाठी १३९ धावांचे आव्हान मिळाले. भारतीय फलंदाजांपाठोपाठ गोलंदाजांनीही निराशा केल्याने न्यूझीलंडने आठ गडी राखून हा सामना जिंकत पहिले कसोटी विश्वविजेते म्हणून मिरवण्याचा मान पटकावला. त्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत तीन कसोटी सामने खेळला. यापैकी पहिला सामना जिंकण्यात भारताला यश आले. त्यानंतरच्या दोन सामन्यांत मात्र भारतीय संघ पराभूत झाला. दोन्ही सामन्यांत भारताला प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. मग दोन्ही कसोटींच्या तिसऱ्या डावात भारतीय संघ अनुक्रमे २६६ आणि १९८ धावांत गारद झाला. त्यामुळे आफ्रिकेला विजयासाठी २५०हून कमी धावांचे आव्हान मिळाले आणि ते त्यांनी सहज पूर्ण करत मालिका २-१ अशा फरकाने जिंकली.
इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत भारताने कशी कामगिरी केली?
बर्मिंगहॅम येथे झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या प्रलंबित पाचव्या कसोटी सामन्यातही भारताला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. आघाडीच्या फळीतील फलंदाज अपयशी ठरल्यानंतर ऋषभ पंत (१४६) आणि रवींद्र जडेजा (१०४) यांच्या उत्कृष्ट खेळींमुळे भारताने पहिल्या डावात ४१६ धावांची मजल मारली. त्यानंतर मोहम्मद सिराज (४/६६) आणि कर्णधार जसप्रित बुमरा (३/६८) यांच्या प्रभावी माऱ्यामुळे भारताने इंग्लंडला २८४ धावांत रोखत पहिल्या डावात १३२ धावांची भक्कम आघाडी मिळवली. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघ ३ बाद १५३ असा सुस्थितीत होता. चेतेश्वर पुजारा (६६) आणि पंत (५७) यांनी अर्धशतके साकारली होती. मात्र, हे दोघेही चुकीचा फटका मारून बाद झाले आणि भारताचा डाव गडगडला. भारताने अखेरचे सात बळी ९२ धावांतच गमावले. त्यामुळे भारताचा दुसरा डाव २४५ धावांत आटोपला. इंग्लंडला विजयासाठी ३७८ धावांचे अवघड आव्हान मिळाले होते. मात्र, बुमराचा अपवाद वगळता भारतीय गोलंदाजांनी स्वैर मारा केला. याचा फायदा घेत जो रूट (नाबाद १४२) आणि जॉनी बेअरस्टो (नाबाद ११४) यांनी अप्रतिम शतके करत इंग्लंडला सात गडी राखून विजय मिळवून दिला.
भारताकडून वारंवार काय चुका घडत आहेत?
फलंदाजी हे कायमच भारतीय संघाचे बलस्थान मानले जाते. मात्र, गेल्या दीड-दोन वर्षांत भारतीय फलंदाजीचा स्तर खालावला आहे. पंतचा अपवाद वगळता भारतीय फलंदाज सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहेत. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्यासारख्या अनुभवी फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता न आल्याने संघातील स्थान गमवावे लागले. मग कौंटी क्रिकेटमधील चमकदार कामगिरीमुळे पुजाराचे पुनरागमनही झाले. मात्र, भारताला त्याच्याकडून मोठ्या खेळींची गरज आहे. माजी कर्णधार विराट कोहली नोव्हेंबर २०१९पासून एकही शतक करू शकलेला नाही. तसेच कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल हे प्रमुख फलंदाज दुखापतींशी सतत झगडत असतात. परदेशातील सामन्यांत भारतीय संघ फिरकीपटूच्या स्थानासाठी रविचंद्रन अश्विनऐवजी जडेजाला प्राधान्य देतो. जडेजा फलंदाजीत महत्त्वाचे योगदान देत असला, तरी गोलंदाजीत प्रभाव पाडण्यात अपयशी ठरतो. दक्षिण आफ्रिका आणि आता इंग्लंडमध्ये चौथ्या डावात त्याला बळी मिळवता आले नाहीत. वेगवान गोलंदाजीत बुमराला विषेशत: कसोटीच्या चौथ्या डावात इतरांची साथ लाभत नाही. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघांतील फलंंदाजांवरील दडपण आपोआप कमी होते आणि ते मोठ्या आव्हानाचा पाठलागही यशस्वीरीत्या करतात.
इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर द्रविड काय म्हणाला?
कसोटी सामन्यांच्या तिसऱ्या डावातील भारतीय फलंदाजांचे अपयश हा चिंतेचा विषय असून त्यांच्या कामगिरीचे पुनरावलोकन गरजेचे आहे, असे मत प्रशिक्षक द्रविडने व्यक्त केले. ‘‘आम्हाला या कामगिरीचे पुनरावलोकन करावे लागणार आहे. प्रत्येक सामन्यात तुम्हाला काहीतरी शिकायला मिळते. या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या डावात आमच्या फलंदाजांना मोठ्या खेळी करण्यात का अपयश आले आणि चौथ्या डावात आम्ही १० गडी का बाद करू शकलो नाही, याबाबत आम्ही विचार करणे गरजेचे आहे,’’ असे द्रविड म्हणाला.