जगात चौथ्या क्रमांकाचे रेल्वेचे जाळे हे भारतात आहे, साधारण ६७ हजार किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या रेल्वेमार्गाने संपुर्ण देश व्यापला आहे. देशात दररोज सुमारे ११ हजार रेल्वे गाड्यांमधून सरासरी दोन कोटी २५ लाखांपेक्षा नागरीक प्रवास करतात. सर्वात स्वस्त आणि वेगवान प्रवासी वाहतुकीचा पर्याय म्हणून रेल्वेकडे बघितले जाते. असं असलं तरी प्रवासी वाहतुकीपेक्षा रेल्वेला मालवाहतुकीमधून जास्त उत्पन्न मिळते. किंबहुना काहीशा सवलतीच्या आणि स्वस्तातल्या प्रवासी वाहतुकीमुळे रेल्वेचे खाली गेले उत्पन्न हे मालवाहतुकीमुळे भरुन निघते. जवळपास २ लाख ९० हजार मालगाडीच्या डब्यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात रेल्वेची मालवाहतुक ही भारतभर सुरु असते.
रेल्वे आणि मालवाहतुक
या मालवाहतुकीमध्ये विविध इंधनाबरोबर, विविध धातू यांची मालवाहतुक केली जात. यामध्ये मोठ्या प्रमाणावर भर हा कोळसा वाहतुकीवर असतो. देशातील ७० टक्क्यांपेक्षा जास्त वीज निर्मितीसाठी इंधन म्हणून कोळसा लागत असल्याने कोळसा वाहतुकीला रेल्वेमध्ये अनन्य साधारण महत्व आहे. स्वस्तात आणि वेगाने कोळसा हा खाणीपासून ते थेट वीज निर्मिती केंद्रापर्यंत देशात विविध भागात पोहचवला जातो. विशेषतः काही महिन्यांपूर्वी वीज केंद्रांवर कोळसा उपलब्धतेचे मोठे संकट आले असतांना विक्रमी अशा कमी वेळेत जलदगतीने कोळसा वाहतुक ही रेल्वेने करण्यात आली आणि आलेले संकट हे क्षमवण्यात यश आलं.
कोळसा वाहतुक करतांना विविध विक्रम दरवर्षी हे रचले जात आहेत. दरवर्षी चढत्या क्रमाने कोळसा वाहतुक ही रेल्वेनद्वारे केली जात असून यामधून विक्रमी असे उत्पन्न हे रेल्वेला मिळत आहे. स्वातंत्र्य दिनाचे आणि त्यातही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे निमित्त साधत असाच कोळसा वाहतुकीच्या बाबतीत आणि सर्वात जास्त लांबीची ट्रेन चालवण्याचा एक पराक्रम रेल्वेने नुकताच केला. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी १६ ऑगस्टला ट्वीट करत याची माहिती देशाला दिली.
देशातील सर्वात जास्त लांबीची ट्रेन
राज्यातील नागपूर, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडचा काही भाग मिळून दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचा पसारा पसरलेला आहे. छत्तीसगडमधल्या कोरबा नावाच्या स्टेशनपासून कोळशाने भरलेल्या मालगाडीने प्रवास सुरु केला. या मालगाडीचे नामकरण सुपर वासुकी – super vasuki असं करण्यात आलं होतं. सहा इंजिन असलेली, २९५ माल डब्यांच्या आणि तब्बल साडेतीन किलोमीटर लांबीच्या या मालगाडीने तब्बल २५ हजार ९६२ टन कोळशाची वाहतुक केली. कोरबा स्टेशनमधून दुपारी एक वाजून १० वाजता निघालेल्या देशातील सर्वात जास्त लांबीच्या रेल्वे गाडीने ११ तास २० मिनीटांच्या प्रवासात २६७ किलोमीटरचे अंतर पार केले आणि ही गाडी छत्तीसगडमधील राजनांदगाव रेल्वे स्थानकात पोहचली.
रेल्वेमंत्र्यांनी ट्वीट केला super vasukiचा व्हिडिओ
१६ ऑगस्टला सुपर वासुकी मालगाडीचा व्हिडीओ रेल्वेमंत्र्यांनी ट्वीट करत रेल्वेच्या एका अनोख्या पराक्रमाची माहिती जगाला दिली. अंदाजे ७० किलोमीटरच्या वेगाने धावलेल्या या मालगाडीला रेल्वे स्थानक पार करायला दीड मिनीटापेक्षा जास्त कालावधी लागला. यानिमित्ताने या भल्या मोठ्या मालगाडीची कल्पना येऊ शकेल.
सर्वसाधारपणे पुर्ण क्षमतेने कोळसा वाहतुक करणारी एक मालगाडी ९० डब्यांची असते, तिच्या प्रत्येक डब्यात साधारण १०० टन कोळसा असतो. तेव्हा एक मालगाडी ९ हजार टन कोळसा वाहतुक करते. super vasuki च्या निमित्ताने तीन पेक्षा जास्त मालगाडीचे काम हे एकाच दमात आणि तेही कमी वेळेत सुपर वासुकीने केले. ३००० मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता असलेल्या वीज केंद्राला दिवसभर पुरेल एवढा कोळसा या मालगाडीने एका दमात आणला आहे.
जगामध्ये सर्वात लांब मालगाडीची नोंद ही ऑस्ट्रेलियात करण्यात आली असून तिथे २००१ मध्ये लोह आणि कोळसा याची वाहतुक करण्यासाठी तब्बल ७किलोमीटर पेक्षा जास्त लांबीची ट्रेन वापरण्यात आली होती. या मालगाडीने २७५ किलोमीटर प्रवास करत सुमारे ९९ हजार टन मालाची वाहतुक केल्याची नोंद आहे.