हिमनदी वितळल्यामुळे तयार झालेले तलाव फुटण्याचा धोका असून जगभरातील एक कोटी ५० लाख लोकांना याचा थेट फटका बसवण्याची भिती एका संशोधनातून नुकतीच व्यक्त करण्यात आली आहे. भारत, पाकिस्तान, पेरु आणि चीन या चार देशांना प्रामुख्याने हिमनदीमुळे तयार झालेले तलाव फुटण्याचा धोका जास्त असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
इंग्लंडमधील Newcastle University आणि Northumbria University, न्यूझीलंडची University of Canterbury मधील काही युवा संशोधकांनी अभ्यासाअंती वरील निष्कर्ष काढण्यात आला आहे.विविध उपग्रहांद्वारे मिळालेल्या छायाचित्रांचा अभ्यास करत हे संशोधन प्रामुख्याने करण्यात आले आहे.
जागतिक तापमान वाढीमुळे बर्फ वितळण्याचे प्रमाण वाढत असून हिमनदी वितळल्याने तलावांची निर्मिती होते. यामधील पाणी वाढले किंवा तलावाच्या आजुबाजूचा भाग वितळला किंवा भूस्खलन झाले तर तलाव फुटत पाण्याचा मोठा लोंढा हा उताराच्या दिशेने जात मोठं नुकसान करण्याची शक्यता आहे.जगातील काही भागातील लोकसंख्येला अशा संभाव्य घटनांमुळे धोका निर्माण झाला असल्याचं अभ्यासात म्हंटलं आहे.
हिमनदीपासून तलाव कसे निर्माण होतात आणि फुटतात?
हिमनदी वितळते तेव्हा पाणी प्रवाही स्वरुपात वाहून जाते, मात्र काही वेळा हे पाणी अति उंचीवरच जमीनीच्या उंचसखलापणा लक्षात घेता साचून रहाते, त्याचे तलावात रुपांतर होते. अशा तलावात वाहून येणाऱ्या बर्फाची,पाण्याची भर पडत असते, कधी भूस्खलनामुळे होणाऱ्या दगडधोंड्याची भर पडते.तेव्हा असा तलाव भरल्यावर त्यातून पाणी बाहेर येत ते वाहण्याची शक्यता जास्त असते. तलावाच्या सीमारेषेवरचा कमकूवत भागातून पाण्याचा प्रवाह बाहेर पडण्याची शक्यता असते. या सर्व कारणांमुळे हिमनदीच्या प्रवाहाच्या ठिकाणी तलाव निर्माण होत ते फुटण्याची शक्यता निर्माण होत असते.
तेव्हा अशा तलावातील पाण्याचा लोंढा वेगाने खाली येत मोठे नुकसान करण्याची शक्यता अभ्यासात वर्तवली आहे.
२०१३ ला केदारनाथ इथे झालेला विध्वंस हा अशाच घटनेमुळे झाला होता, हिमनदीपासून तयार झालेला तलाव फुटल्याने पाण्याचा लोंढा येत, प्रवाहाबरोबर वेगाने दगडधोंडे वाहून येत मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं.
हिमनदी तलावापासून येणारा पूर टाळू शकतो का?
अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार यावर एकच असा उपाय आहे तो म्हणजे तापमान वाढ रोखून धरणे. हे जरी केलं तरीही अनेक तलाव हे हिमनदीच्या वाटेत तयार झालेले आहेत जे फुटण्याचा धोका यापुढच्या काळात कायम असेल.
जगात कोणत्या भागात नुकसान होण्याची शक्यता आहे?
आशियातील बर्फाच्छादीत पर्वतरांगांमध्ये तलाव फुटण्याची शक्यता जास्त असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे. हिमालयाच्या पश्चिमेला असलेल्या हिंदूकुश पर्वत रांगेतील खैबर पख्तूनख्वला याचा सर्वात धोका मोठा आहे. पेरु देशालाही अशाच घटनांपासून मोठा धोका आहे. भारतातही हिमनगद्यांच्या खाली असलेल्या भागातील लोकसंख्येला अशा नैसर्गिक घटनेपासून धोका आहे.
हिमनदीपासून असे तलाव जे निर्माण झाले आहेत त्यापासून ५० किलोमीटरच्या परिसरात उतारावर जगभरात दीड कोटी लोकसंख्या वसलेली आहे, त्यांना तलाव फुटत नुकसान होण्याच्या घटनेचा मोठा धोका आहे. विशेष म्हणजे बहुसंख्य लोकसंख्या तर १० किलोमीटर अंतरावरच वसलेली आहे.