अन्वय सावंत

भारतीय पुरुष फुटबाॅल संघाने काही दिवसांपूर्वी सलग दुसऱ्यांदा आणि एकूण पाचव्यांदा प्रतिष्ठेच्या आशिया चषक स्पर्धेसाठी पात्र ठरण्याची किमया साधली आहे. घरच्या मैदानावर (कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियम) पात्रता फेरीचे सामने असल्याने भारतीय संघाकडून दर्जेदार कामगिरीची अपेक्षा होती. मात्र, त्यांनी अपेक्षेपेक्षाही अधिक दमदार कामगिरी करताना आश्वासक भविष्याचे संकेत दिले आहेत. परंतु, भारतीय संघ आता आशिया चषकासाठी पात्र ठरला असला, तरी अखिल भारतीय फुटबॉल महासंघासमोर (एआयएफएफ) काही प्रश्न उभे ठाकले आहेत. हे प्रश्न कोणते आणि त्यांचा भारतीय संघाच्या वाटचालीवर कसा परिणाम होऊ शकतो, याचा घेतलेला आढावा. 

भारतीय संघ आशिया चषकासाठी कसा पात्र ठरला?

सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आशिया चषक पात्रता स्पर्धेत सलग तीन विजयांची नोंद केली. १९६४च्या आशिया चषकातील उपविजेत्या भारताने पात्रता स्पर्धेत सर्वप्रथम कंबोडियाचा २-० असा पराभव केला. त्यानंतर त्यांनी अफगाणिस्तानवर २-१ अशी मात केली आणि अखेरच्या लढतीत हाँगकाँगला ४-० अशी धूळ चारली. पात्रता स्पर्धेदरम्यान चाहत्यांनी साॅल्ट लेक स्टेडियममध्ये उपस्थित राहून भारतीय संघाला पाठिंबा दर्शवला. त्यामुळे भारतीय संघ २०१९ नंतर सलग दुसऱ्यांदा आशिया चषकासाठी पात्र ठरल्यावर छेत्रीने चाहत्यांचे आभार मानले.

भारताच्या यशस्वी कामगिरीचे श्रेय कोणाला?

भारतीय फुटबॉल संघ सलग दुसऱ्यांदा आशिया चषकासाठी पात्र ठरण्याचे श्रेय प्रामुख्याने कर्णधार छेत्री आणि प्रशिक्षक इगोर स्टिमॅच यांना जाते. स्टिमॅच यांनी गेल्या काही वर्षांत लिस्टन कोलाको, उदांता सिंह, अनिरुद्ध थापा, ब्रँडन फर्नांडेस यांसारख्या युवा खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. त्यांचा हा विश्वास आता सार्थ ठरत आहे. मात्र, या युवा खेळाडूंसमवेत मैदानावर छेत्रीसारखा अनुभवी खेळाडू असण्याचा फायदा झाला. ३७ वर्षीय आघाडीपटू छेत्री अनेकदा भारतीय संघाचा तारणहार ठरला असून त्याने पात्रता स्पर्धेतही तीन सामन्यांमध्ये चार गोल झळकावले. तसेच भारताचा गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधूनेही मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावला.

अखिल भारतीय फुटबॉल महासंघापुढे आता कोणते प्रश्न आहेत?

भारतीय संघ पुन्हा आशिया चषकासाठी पात्र ठरला असला, तरी ‘एआयएफएफ’पुढे आता काही प्रश्न आहेत. यापैकी सर्वांत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे प्रशिक्षक स्टिमॅच यांचे भवितव्य. क्रोएशियन प्रशिक्षक स्टिमॅच २०१९ सालापासून भारतीय संघाला मार्गदर्शन करत आहेत. मात्र, त्यांचा करार सप्टेंबरमध्ये संपुष्टात येणार आहे. त्यापूर्वीच जुलैमध्ये भारतीय संघ सरावासाठी युरोपात जाणार आहे. त्यामुळे त्यांना करारवाढ द्यायची की नाही, याबाबतचा निर्णय ‘एआयएफएफ’ला लवकर घ्यावा लागणार आहे. त्यातच स्टिमॅच यांनी पात्रता स्पर्धेदरम्यान भारतीय फुटबॉलच्या वाटचालीवर नाराजी व्यक्त केली. भारतीय संघाने प्रगतीपथावर राहावे अशी इच्छा असल्यास मला खेळाडूंसोबत अधिक वेळ मिळणे गरजेचे आहे, असे रोखठोक विधान स्टिमॅच यांनी केले. ‘‘मी प्रशिक्षकपदी कायम राहावे असे वाटत असल्यास माझ्या काही मागण्या पूर्ण कराव्या लागतील. मी सांगेन तेव्हाच स्थानिक फुटबॉल लीग सुरू होतील आणि भारतीय संघाच्या खेळाडूंना अधिकाधिक सामने खेळण्याची त्यांचे क्लब संधी देतील,’’ असेही स्टिमॅच म्हणाले. त्यांच्या या मागण्या ‘एआयएफएफ’कडून पूर्ण केल्या जाणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरले. तसेच ‘एआयएफएफ’ला स्वत:चा कारभारही सुसूत्रित करावा लागणार आहे. कार्यकाळ संपल्यानंतरही पद न सोडणाऱ्या प्रफुल पटेल यांच्या अध्यक्षतेखालील ‘एआयएफएफ’ची कार्यकारिणी सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी बरखास्त केली आणि प्रशासकीय समिती नेमली. मात्र, ‘फिफा’च्या नियमांनुसार आणि राष्ट्रीय क्रीडा संहितेनुसार पुन्हा ‘एआयएफएफ’ची कार्यकारिणी निवडली जाईल. परंतु, ही प्रक्रिया पूर्ण होण्याकरिता सप्टेंबरपर्यंतचा अवधी लागू शकेल. त्याच महिन्यात स्टिमॅच यांचा करार संपुष्टात येणार असल्याने ‘एआयएफएफ’ला लवकर हालचाली कराव्या लागू शकतील.

छेत्रीला पर्याय कोण?

आशिया चषक फुटबॉल स्पर्धा जानेवारी २०२४मध्ये होण्याची शक्यता असून त्यावेळी भारताचा कर्णधार सुनील छेत्रीचे वय ३८ वर्षे असेल. छेत्री आता कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर असला, तरी भारताला अजूनही त्याच्यासाठी पर्याय सापडू शकलेला नाही. पात्रता फेरीतही छेत्रीचे तीन सामन्यांतील चार गोल निर्णायक ठरले. मात्र, भारतीय संघ आणखी किती काळ छेत्रीवर अवलंबून राहणार, हा प्रश्न असून याचे उत्तर लवकरच शोधणे गरजेचे आहे.

Story img Loader