दत्ता जाधव
भारताचा गहू तुर्कस्तानने का नाकारला याबाबतचे गूढ अद्याप कायम आहे. भारताच्या गव्हात रुबेला विषाणू आहे, म्हणून प्रथम तुर्की आणि नंतर इजिप्तने गव्हू नाकारला, अशी चर्चा असली तरीही अधिकृतपणे दोन्ही देशांनी आजपर्यंत त्याबाबत जाहीर मत प्रदर्शित केलेले नाही. महात्मा फुले कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनीही कोणत्याही प्रकारचा विषाणू गव्हात असणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे गहू नाकारण्यामागील गूढ वाढले आहे.

तुर्कस्तानला गहू कुणी, कसा पाठविला?

भारतात उत्पादित झालेला ५५ हजार टन गहू आयटीसी या भारतीय कंपनीने ईटीजी कमोडिटीजला विकला होता. त्या कंपनीने गव्हाचा दर्जा तपासण्यासाठी एसजीसी स्वित्र्झलडच्या कंपनीची निवड केली होती. त्या कंपनीने संपूर्ण तपासणीनंतरच गव्हाची निर्यात तुर्कस्तानला केली होती. हा मध्य प्रदेशातील दर्जेदार गहू होता आणि त्यातील प्रोटिनचे प्रमाण १४ टक्क्यांपेक्षा जास्त होते, असा दावा आयटीसी कंपनीच्या अधिकाऱ्याने केला आहे. या गव्हाचे पैसेही भारताला मिळाल्याचे आयटीसी म्हटले आहे. गहू भरलेले जहाज आता इस्रायलच्या किनाऱ्यावर पोहोचले असून, गहू उतरवून घेण्याचे काम सुरू आहे. मुळात या गव्हात रुबेला विषाणू असता तर तो गहू इस्रायलने का घेतला असता, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

रुबेला विषाणूची अफवा कुणी उठवली?

भारताचा गहू तुर्कस्तानला जाणार होता. पण तुर्कस्तानने त्यात रुबेला विषाणू आहे म्हणून तो नाकारला. त्यानंतर इजिप्तनेही तो नाकारला, अशी चर्चा जागतिक बाजारात सुरू आहे. पण तुर्कस्तान किंवा इजिप्तने अधिकृतरीत्या असे कुठेही म्हटलेले नाही किंवा भारत सरकारकडे तशी तक्रारही केलेली नाही. त्यामुळे भारताच्या गव्हात रुबेला विषाणू असल्याची अफवा कुणी उठवली आणि का उठवली, याबाबतचे गूढ अद्याप कायम आहे.

गव्हात रुबेला विषाणू अशक्य?

भारतीय गव्हात रुबेला विषाणू असल्याची अफवा सध्या चर्चेत असून, ती शक्यता तज्ज्ञांनी फेटाळली आहे. याचे कारण हा विषाणू प्राण्यांमधील असल्याने तो वनस्पतींमध्ये जाणे शक्यच नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. देशात गव्हाची काढणी मार्चअखेरपासून सुरू होते. निर्यात केलेला गहू मध्य प्रदेशातील होता. देशात मध्य प्रदेशातील गहू सर्वात दर्जेदार मानला जातो. काढणीच्या वेळी मध्य प्रदेशात सरासरी तापमान ३५ अंश सेल्सिअसहून अधिक होते. काढणीनंतर गहू वाळविला जातो. या सर्व प्रक्रियेत गव्हामध्ये असा विषाणू राहूच शकत नाही, अशी माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रमोद रसाळ यांनी दिली.

तुर्कस्तान संशयाच्या भोवऱ्यात का?

युक्रेनच्या ओडेसा बंदरातून रशिया-युक्रेनचा गव्हू जागतिक बाजारात पाठविण्यासाठी जागतिक पातळीवर चर्चा सुरू झाली आहे. जागतिक अन्नटंचाईची स्थिती लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्राने त्यासाठी पुढाकार घेतला असून, अमेरिकेनेही पाठिंबा दिला आहे. या दोन्ही देशांतील गव्हाची जागतिक पातळीवरील खरेदी-विक्री तुर्कस्तानच्या मध्यस्थीने होणार आहे. तरीही हा गहू जागतिक बाजारात येण्यासाठी अजून काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो. जागतिक बाजारात गव्हाचा तुटवडा असताना आणि जगातील अन्य देश भारताकडे गव्हाची मागणी करीत असताना भारताचा गहू का नाकारला गेला, याचे गूढ अद्याप कायम आहे. युक्रेन-रशियाच्या गव्हाच्या जागतिक व्यापारातून आर्थिक स्वार्थासाठी आणि भारत एक प्रबळ गहू निर्यातदार देश म्हणून जागतिक बाजारपेठेत स्पर्धक म्हणून उतरू नये, यासाठी तुर्कस्तानने हा डाव खेळल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र त्यास ठोस काही पुरावा नाही.

भारताकडे गव्हासाठी याचना?

भारताने गव्हाच्या मुक्त निर्यातीवर बंधने आणताच जागतिक बाजारात गव्हाच्या किमतीत वाढ झाली होती. युक्रेन-रशियाच्या युद्धामुळे अगोदरच निर्माण झालेल्या अन्नटंचाईत भारताच्या निर्णयाने भरच पडली होती. अन्नटंचाई वाढल्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या अन्न संघटनेनेही भारताने निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी केली होती. अशा अडचणीच्या परिस्थितीत इंडोनेशिया, बांगलादेश, ओमान, येमेन आणि संयुक्त अरब अमिरातीने भारताने आपल्याला गहू निर्यात करावा, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू केला आहे. विशेषकरून पामतेल निर्यातबंदी करून भारताची कोंडी करणारा इंडोनेशियाही गहू निर्यातीसाठी याचना करताना दिसत आहे.

गहू, साखर निर्यातबंदीचा निर्णय राजकीय?

केंद्र सरकारने गहू आणि साखरेच्या मुक्त निर्यातीवर बंधने आणली आहेत. त्यामुळे मुक्त निर्यात बंद झाली असली तरी सरकार ते सरकार, अशी मागणी आणि चर्चा झाल्यास निर्यात शक्य असल्याचे केंद्राने म्हटले आहे. त्यामुळे निर्यात पूर्णपणे बंद नाही. फक्त जागतिक पातळीवर असलेल्या टंचाईचा परराष्ट्र धोरणात फायदा उठविण्यासाठीच हा निर्णय घेतला असल्याची शक्यता आहे. जगातील कोणत्याही देशाने भारत सरकारबरोबर चर्चा केल्यास निर्यात सुरू होईल, एवढाच याचा अर्थ.

गहू निर्यातदार म्हणून ठोस धोरण का नाही?

भारताचा जागतिक गहू निर्यातीतील वाटा अत्यंत अल्प आहे. भारताकडून गहू फक्त अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, आफ्रिकी आणि अरबी देशांना निर्यात केला जातो. पंजाबपासून तमिळनाडूपर्यंत गव्हाचे उत्पादन होत असले तरीही त्याच्या निर्यातीबाबत कोणतीच ठोस योजना दिसत नाही. देशातून नियमित गहू निर्यात झाल्यास शेतकऱ्यांना गहू हमीभावाने खरेदी करण्यासाठी आंदोलन करावे लागणार नाही. सरकारला आपली गोदामे भरून गहू कुजवून घालविण्याचीही गरज उरणार नाही आणि परदेशी चलनही मिळेल. मात्र, त्यासाठी हवी ठोस भूमिका आणि धोरण.dattatray.jadhav@expressindia.com