भारतीयांच्या आयुर्मानात वाढ झाली आहे. सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीम (SRS) च्या नवीन अहवालात ही माहिती समोर आली आहे. यानुसार भारतीयांचे सरासरी वय आता ६९.७ वर्षे झाले आहे. मात्र, हे अद्यापही जागतिक सरासरीपेक्षा वयापेक्षा कमी आहे. जगातीक सरासरी वय ७२ वर्षे ६ महिने आहे.
एसआरएशचा संक्षिप्त जीवन सारणी २०१५-१९ चा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. ज्यामध्ये भारतीयांचे आयुर्मान ६९.७ वर्षे झाल्याचे समोर आले आहे. म्हणजेच आता प्रत्येक भारतीयाचे सरासरी वय ६९ वर्षे ७ महिने झाले आहे.
महिला आणि पुरुषांच्या आयुर्मानातील तफावत –
जन्मावेळी आयुर्मानात दोन वर्षांची वाढ होण्यास भारताला जवळपास १० वर्षे लागली होती. १९७०-७५ मध्ये भारताचा जन्मदर ४९.५ वर्षे होता. पुढील ४५ वर्षात त्यात सुमारे २० वर्षांनी वाढ झाली. २०१५-१९ च्या आकडेवारीत भारताचे आयुर्मान ६९.७ वर्षांनी वाढले असले तरी, महिला आणि पुरुषांच्या आयुर्मानातील तफावत वाढलेली दिसून येत आहे. महिला पुरुषांपेक्षा अडीच वर्षे जास्त जगतात, असेही या अहवालात समोर आले आहे. देशातील पुरुषांचे सरासरी वय ६८ वर्षे ४ महिने आहे, तर महिलांचे सरासरी वय ७१ वर्षे १ महिना आहे. त्याच वेळी, शहरातील लोकांचे वय ग्रामीण भागातील लोकांपेक्षा जास्त आहे. शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांचे सरासरी वय ७३ वर्षे आहे, तर खेड्यात राहणाऱ्या लोकांचे वय ६८ वर्षे ३ महिने आहे.
महाराष्ट्राची काय आहे स्थिती? –
या अहवालानुसार सर्वाधिक सरासरी वय दिल्लीकरांचे आहे. येथील लोकांचे सरासरी वय ७५ वर्षे ९ महिने आहे. त्याच वेळी, सर्वात कमी सरासरी वय छत्तीसगडचे आहे, जेथे लोक ६५ वर्षे आणि ३ महिने जगू शकतात. दिल्लीपाठोपाठ केरळचा क्रमांक लागतो, जिथे लोकांचे सरासरी वय सर्वाधिक आहे. केरळच्या लोकांचे सरासरी वय ७५ वर्षे २ महिने आहे. तर महाराष्ट्राचे सरासरी वय ७२.७ आहे. महाराष्ट्रात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे आयुर्मान अधिक आहे. पुरुषांचे आयुष्य ७१.६ असून महिलांचे आयुर्मान ७४ आहे.
भारताच्या शेजारील देशांचे आयुर्मान किती? –
बांगलादेशचे आयुर्मान ७२.१ वर्षे आहे. नेपाळमध्ये ७०.५ वर्षे आहे. संयुक्त राष्ट्राच्या मानव विकास अहवाल- २०१९ नुसार दोन्ही देशांमध्ये नवजात मृत्यू दर (२८ – २४) आहे आणि हा भारतापेक्षा कमी आहे. जपानमध्ये सर्वाधिक ८५ एवढे आयुर्मान आहे. याशिवाय, नॉर्वे, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंडचे आयुर्मान ८३ इतके आहे. तर, मध्य आफ्रिकन रिपब्लिकमध्ये सर्वात कमी आयुर्मान ५४ एवढे आयुर्मान आहे.