अन्वय सावंत
भारताच्या खुल्या विभागातील ‘ब’ संघाने, तर महिला विभागातील ‘अ’ संघाने बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत कांस्यपदके पटकावली. परंतु वेगाने प्रगती करणाऱ्या भारतीय बुद्धिबळ क्षेत्रासाठी हा निकाल काहीसा निराशाजनक होता. भारताला यंदा प्रथमच बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची संधी मिळाली. चेन्नईजवळील महाबलीपूरम येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे जगभरातून कौतुक झाले. यजमान असलेल्या भारताला या स्पर्धेत खुल्या आणि महिला या दोन्ही विभागांत प्रत्येकी तीन संघ खेळवण्याची संधी मिळाली. मात्र, यापैकी केवळ दोन संघांना पदके जिंकता येणे, हे नक्कीच अपेक्षित यश म्हणता येणार नाही. परंतु भारताच्या दृष्टीने अनेक सकारात्मक गोष्टीही या स्पर्धेदरम्यान घडल्या. या स्पर्धेतील भारताच्या कामगिरीचा घेतलेला आढावा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खुल्या विभागातील पदकविजेत्या संघाची कामगिरी कशी होती?

खुल्या विभागात भारताच्या ‘अ’ संघाला दुसरे मानांकन मिळाले होते. त्यामुळे विदित गुजराथी आणि पी. हरिकृष्णा यांसारख्या अनुभवी खेळाडूंसह अर्जुन इरिगेसीसारख्या लयीत असलेल्या उदयोन्मुख खेळाडूचा समावेश असलेल्या ‘अ’ संघाला पदकासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. त्यांना अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आले आणि चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मात्र, युवा ग्रँडमास्टर खेळाडूंचा समावेश असलेल्या भारताच्या ‘ब’ संघाने अनपेक्षित यश प्राप्त करताना कांस्यपदकाची कमाई केली. या संघात डी. गुकेश, आर. प्रज्ञानंद आणि रौनक साधवानी या १६ वर्षीय त्रिकुटासह, १८ वर्षीय निहाल सरिन आणि २९ वर्षीय बी. अधिबान यांचा समावेश होता. या संघाने ११ पैकी आठ लढती जिंकल्या, तर त्यांच्या दोन लढती बरोबरीत सुटल्या. त्यांना केवळ एका पराभवाचा सामना करावा लागला. परंतु त्यांच्या अखेरच्या तीनपैकी दोन लढती बरोबरीत सुटल्याने अव्वल दोन स्थानांपासून वंचित राहावे लागले. याच विभागातील भारताच्या ‘क’ संघाने ३१वे स्थान मिळवले.

महिला ‘अ’ संघाचे यश की अपयश?

कोनेरू हम्पी आणि द्रोणवल्ली हरिका या तारांकित खेळाडूंसह अनुभवी तानिया सचदेव, भक्ती कुलकर्णी, तसेच युवा आर. वैशालीचा समावेश असलेल्या भारताच्या ‘अ’ संघाला महिला विभागात अग्रमानांकन लाभले होते. त्यांनी या स्पर्धेची दमदार सुरुवात करताना सलग सात लढती जिंकल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्यांचा खेळ खालावला. आठव्या फेरीत त्यांना युक्रेनने बरोबरीत रोखले, तर नवव्या फेरीत त्यांना पोलंडने पराभूत केले. दहाव्या फेरीत त्यांनी पुनरागमन करताना कझाकस्तानवर सरशी साधत गुणतालिकेत अग्रस्थान मिळवले होते. परंतु ११व्या आणि अखेरच्या फेरीत अमेरिकेकडून १-३ अशी मोठी हार पत्करल्याने त्यांचे सुवर्णपदकाचे स्वप्न अधुरे राहिले आणि त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. ‘‘ऑलिम्पियाडमध्ये भारतीय महिला संघाने पहिले पदक जिंकले, याचा आनंद असण्यापेक्षा ते सुवर्णपदक नसल्याचे दु:ख अधिक आहे,’’ असे अखेरच्या सामन्यानंतर तानिया सचदेव म्हणाली. महिला विभागातील भारताच्या ‘ब’ संघाने स्पर्धेअंती सन्मानजनक आठवे, तर ‘क’ संघाने १७वे स्थान मिळवले.

खुल्या विभागात कोणत्या खेळाडूंनी केले प्रभावित?

यंदाच्या ऑलिम्पियाडमध्ये भारताकडून खुल्या विभागातील ‘ब’ संघाच्या गुकेशने सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने सुरुवातीचे आठपैकी आठ डाव जिंकले होते. त्यानंतरच्या तीन फेऱ्यांमध्ये त्याचे दोन डाव बरोबरीत सुटले, तर एक गमावला. त्याने ११ डावांमध्ये ९ गुण मिळवले. तसेच गुकेशचे ‘ब’ संघातील सहकारी निहाल, प्रज्ञानंद आणि रौनक यांनीही चमक दाखवली. ‘अ’ संघाकडून अर्जुन इरिगेसीने ११ डावांत ८.५ गुणांसह आपली छाप पाडली. तसेच ‘क’ संघाचा एस. पी. सेतुरामनही चांगला खेळला. विदित आणि हरिकृष्णा यांन मात्र निराशा करताना १० पैकी अनुक्रमे दोन आणि तीनच डाव जिंकले.

महिला विभागात कोणत्या खेळाडूंनी छाप पाडली?

महिलांमध्ये ‘अ’ तानिया सचदेवने आपला खेळ उंचावताना ११ डावांत आठ गुण कमावले. तसेच आर. वैशालीने ११ पैकी पाच डाव जिंकत आणि पाच डाव बरोबरीत सोडवत चमक दाखवली. ‘ब’ संघाकडून वंतिका अगरवाल (११ डावांत ७.५ गुण) आणि नागपूरची दिव्या देशमुख (९ डावांत ७ गुण), तर ‘क’ संघाकडून पी. व्ही. नंदिता (११ डावांत ८.५ गुण) यांनी प्रभाव पाडला. हम्पी (१० डावांत ६ गुण) आणि हरिका (७ डावांत ३.५ गुण) यांनी निराशा केली.

ऑलिम्पियाडचे जेतेपद कोणाला?

खुल्या आणि महिला विभागात अनुक्रमे उझबेकिस्तान आणि युक्रेन यांनी जेतेपदे पटकावली. १३व्या मानांकित उझबेकिस्तानने अखेरच्या फेरीत नेदरलँड्सला २.५-१.५ असे नमवले. युवा खेळाडूंचा समावेश असलेल्या उझबेकिस्तानच्या संघाने या स्पर्धेत अपराजित राहताना एकूण १९ गुण मिळवले. आर्मेनियाने दुसऱ्या स्थानासह रौप्यपदक पटकावले. महिला विभागात युद्धजर्जर युक्रेनने १८ गुणांसह सुवर्णपदक कमावले. जॉर्जियाच्या संघाला रौप्यपदक जिंकण्यात यश आले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained indias performance in chess olympiad print exp sgy