चिन्मय पाटणकर
अमेरिकेत टेक्सासमधील सॅन अँटोनियो येथे इयत्ता आठवीत शिकणाऱ्या १३ वर्षांच्या हरिणी लोगान या मुलीनं २०२२च्या स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धेत नुकतेच विजेतेपद मिळवले. तिच्या विजयामुळे स्पेलिंग बी स्पर्धेतील दक्षिण आशियातील, विशेषतः भारतीय वंशाच्या मुलांचा प्रभाव यंदाही कायम राहिल्याचे दिसून आले. विजेतेपद मिळवलेल्या हरिणीला पारितोषिक म्हणून जवळपास ३८ लाख रुपये मिळाले. हरिणीच्या या विजेतेपदाच्या निमित्ताने या स्पर्धेतील भारतीय वंशाच्या मुलांच्या वर्चस्वाचा घेतलेला आढावा…

स्पेलिंग बी स्पर्धा काय आहे?

स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी या स्पर्धेत प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी सहभागी होतात. या स्पर्धेत स्पर्धकांना शब्दांचे उच्चार सांगितले जातात. त्यानंतर काही सेकंदात स्पर्धकांना त्या शब्दाचे स्पेलिंग सांगावे लागते. प्राथमिक, उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम अशा एकूण चार फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा घेतली जाते. १९२५मध्ये नऊ वृत्तपत्रांनी एकत्र येऊन नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धेचे आयोजन केले होते. आता ९९ वर्षांनंतर ही स्पर्धा १.१ कोटी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे जगभरात ही स्पर्धा अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते.

या स्पर्धेवर भारतीय मुलांचा प्रभाव कसा?

बालू नटराजन या भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याने सर्वांत पहिल्यांदा १९८५मध्ये स्पेलिंग बी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्यानंतर भारतीय वंशाच्याच रागेश्री रामचंद्रनने १९८८मध्ये स्पर्धा जिंकली. त्यानंतर भारतीय वंशांच्या विद्यार्थ्यांनी सातत्याने या स्पर्धेत वर्चस्व राखले. १९९९मध्ये नुपुर लालाने ही स्पर्धा जिंकली. त्यापाठोपाठ जॉर्ज थम्पीने २०००मध्ये, प्रत्युष बुड्डिगाने २००२मध्ये, साई गुंटुरीने २००३मध्ये आणि अनुराग कश्यप या विद्यार्थ्याने २००५मध्ये स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. समीर मिश्राने २००८मध्ये स्पर्धा जिंकल्यानंतर तर भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत जणू प्रभावच निर्माण केला. त्यानंतर २०१९पर्यंत सलग भारतीय वंशाच्याच विद्यार्थ्यांनी ही स्पर्धा जिंकली. दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच करोनाच्या प्रादुर्भावामुळे २०२०मध्ये स्पर्धा रद्द करावी लागली. तर २०२१मध्ये झैला अवान्त गर्डे या आफ्रिकी अमेरिकी वंशाच्या मुलीने स्पर्धा जिंकली. या विजेतेपदामुळे भारतीय वंशांच्या मुलांनी स्पर्धा जिंकण्यात बारा वर्षानंतर पहिल्यांदा खंड पडला.

हे यश कशामुळे मिळत असावे?

भारतातील बहुभाषिकता हे या स्पर्धेतील भारतीय वंशाच्या मुलांच्या वर्चस्वाचे प्रमुख कारण मानले जाते. भारतातील प्रत्येक राज्यात वेगळी भाषा बोलली जाते. त्यामुळे भारतीयांना मातृभाषेसह किमान तीन भाषा येतात. त्यामुळे लहानपणापासूनच असलेल्या बहुभाषिक कौशल्याचा अमेरिकेतील भारतीय वंशांच्या मुलांना मोठा फायदा होतो.

हरिणी लोगानचे वेगळेपण कोणते?

हरिणी लोगान ही १३ वर्षांची मुलगी इयत्ता आठवीत शिकते. या स्पर्धेत सहभागी होण्याची हरिणीची यंदा तिसरी वेळ होती. २०१८मध्ये तिने पहिल्यांदा भाग घेतला, त्यावेळी ती ३२३व्या स्थानी राहिली. गेल्या वर्षी, २०२१मध्ये ऑनलाइन पद्धतीने झालेल्या स्पर्धेत तिने आपल्या कामगिरीत जबरदस्त सुधारणा करून तिसावे स्थान प्राप्त केले. तर यंदा स्पेलऑफ फेरीपर्यंत (टायब्रेकर) चाललेल्या स्पर्धेत तिने विजेतेपद मिळवले. विशेष म्हणजे, यंदाच्या स्पर्धेतून हरिणी आधीच बाहेर पडली होती, मात्र तिला स्पर्धेत पुन्हा समाविष्ट करण्यात आले. बहुपर्यायी शब्दसंचय (मल्टिपल चॉईस व्होकॅब्युलरी) फेरीत हरिणीने ‘नेस्टिंग ऑफ मेटिंग बर्ड्स’ यासाठी ‘पुलुलेशन’ हा शब्द सांगितला होता. त्या शब्दामुळे स्पर्धेतला तिचा प्रवास संपुष्टात आला. मात्र अधिक खोलात जाऊन तपासल्यावर हरिणीने दिलेले उत्तर बरोबर असल्याचे परीक्षकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे परीक्षकांनी हरिणीला पुन्हा स्पर्धेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. हरिणीन अंतिम फेरीत धडक मारली. विक्रम राजू या भारतीय वंशाच्याच विद्यार्थ्यासमोर हरिणीची अंतिम फेरी झाली. विक्रम राजू हा इयत्ता सातवीतील विद्यार्थी आहे.

यंदाची स्पर्धा वेगळी का?

स्पर्धेच्या अंतिम फेरीत दोन्ही स्पर्धकांनी प्रत्येकी चार शब्दांची चुकीची उत्तरे दिली. त्यामुळे यंदा पहिल्यांदाच विजेता ठरवण्यासाठी टायब्रेकर फेरी घ्यावी लागली. टायब्रेकर फेरीत नव्वद सेकंदात जो स्पर्धक जास्त शब्दांची अचूक उत्तरे देईल तो स्पर्धेचा विजेता होईल असे जाहीर करण्यात आले. त्यानुसार टायब्रेकर फेरीत हरिणीने २६ पैकी २२ प्रश्नांची उत्तरे अचूक दिली, तर विक्रम राजूने १९ पैकी १५ प्रश्नांची उत्तरे उचूक दिली. त्यामुळे स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच टायब्रेकर फेरीद्वारे स्पर्धेचा विजेता निश्चित झाला. गेल्या काही वर्षांप्रमाणेच यंदाच्या स्पेलिंग बी स्पर्धेतही भारतीय वंशाच्या मुलांनी वरचष्मा राखला. अंतिम फेरीतील १३ मुलांपैकी नऊ मुले भारतीय वंशाची होती.

हरिणीला विजेतेपदाचे बक्षीस काय मिळाले?

स्पर्धेची विजेती हरिणी लोगानला ५० हजार अमेरिकी डॉलर्स (जवळपास ३८ लाख रुपये) पारितोषिक म्हणून मिळाले. तर १२ वर्षांच्या उपविजेत्या विक्रम राजूला २५ हजार डॉलर्स म्हणजे जवळपास १९ लाख रुपये मिळाले. हरिणीला सर्जनशील लेखनामध्ये रस आहे आणि पुस्तक प्रकाशित करण्याचीही तिची इच्छा आहे. नवनवे शब्द शिकण्याबरोबरच तिला पियानो, गिटार वाजवण्याचाही छंद आहे.

chinmay.patankar@expressindia.com