प्रशांत केणी
जगभरातील क्रीडा क्षेत्राचे लक्ष लागलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या प्रसारण हक्क लिलावात अपेक्षेप्रमाणेच एकूण मूल्य तिपटीने वधारले. तीन दिवस चाललेल्या चढाओढीनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) तिजोरीत ४८,३९० कोटी रुपयांची भर पडणार हे निश्चित झाले. डिझ्नी-स्टारने सोनीला शह देत टीव्ही प्रक्षेपणाचे हक्क टिकवण्यात यश मिळवले. परंतु रिलायन्सच्या व्हायाकॉम१८ने अन्य तिन्ही विभागांमध्ये लक्षवेधी मुसंडी मारली. ‘आयपीएल’ प्रसारण हक्काची आकडेवारी आतापर्यंत कशी उंचावली, सामन्याचे प्रक्षेपण मूल्य कसे वधारले, क्रीडा वाहिन्यांची एकाधिकारशाही कशी संपुष्टात आली, प्रक्षेपणात ‘डिजिटल क्रांती’ कशी झाली आणि स्टार इंडियाचे माजी अध्यक्ष उदय शंकर यांची भूमिका कशी महत्त्वाची ठरली, हे समजून घेऊया.
‘आयपीएल’ प्रसारण हक्काची आकडेवारी कशा रीतीने उंचावत गेली?
२००८मध्ये सोनी पिक्चर्स नेटवर्कने ८२०० कोटी रुपये रकमेला १० वर्षांसाठी ‘आयपीएल’ प्रसारणाचे हक्क मिळवले होते. मग सप्टेंबर २०१७मध्ये स्टार इंडियाने २०१७ ते २०२२ या पाच वर्षांसाठी १६,३४७.५० कोटी रुपयांची बोली लावली. त्यानंतर ताज्या २०२३ ते २०२७ या पाच वर्षांच्या करारात हेच प्रक्षेपण मूल्य ४८,३९०.५० कोटी रुपयांपर्यंत उंचावले आहे. म्हणजेच याआधीच्या कराराशी तुलना केल्यास ‘बीसीसीआय’ने तिप्पट रक्कम कमावली आहे. ‘आयपीएल’च्या प्रति सामन्याचे प्रक्षेपण मूल्य १०० टक्क्यांहून अधिक वधारले आहे. याआधीच्या करारात प्रति सामन्याचे प्रक्षेपण मूल्य ५४.५ कोटी रुपये होते, ते आता ११८.०२ कोटी रुपये झाले आहे.
प्रसारण हक्क वर्गीकरणामुळे स्टारची मक्तेदारी कशी संपुष्टात आली?
‘आयपीएल’ प्रक्षेपणाच्या आधीच्या दोन्ही लिलाव प्रक्रियेत एकत्रित पॅकेजचा समावेश होता. त्यामुळेच ‘आयपीएल’ प्रसारण हक्क पूर्णत: एकाच कंपनीकडे गेले. परंतु यंदाच्या लिलावासाठी ‘बीसीसीआय’ने त्याचे चार भागांमध्ये वर्गीकरण करून एका कंपनीकडे जाणारी मक्तेदारी संपुष्टात आणली. सोनीकडे पहिल्या १० वर्षांसाठी ‘आयपीएल’ प्रसारण हक्क होते. मग स्टारने पुढील पाच वर्षांसाठी हे हक्क मिळवले. परंतु यंदा अ, ब, क आणि ड अशा चार भागांत विभागण्यात आलेल्या हक्कांमध्ये टीव्ही प्रक्षेपणाचे हक्क जरी डिझ्नी-स्टारने टिकवण्यात यश मिळवले असले तरी उर्वरित तिन्ही विभागांत व्हायाकॉम१८चे लक्षवेधी वर्चस्व गाजवले.
‘आयपीएल’ने प्रसारण हक्क कराराद्वारे दुसऱ्या क्रमांकाची लीग हा बहुमान कसा मिळवला?
प्रसारण हक्क लिलावातील उच्चांकी कामगिरीमुळे ‘आयपीएल’चे प्रति सामन्याचे प्रक्षेपण मूल्य ११८.०२ कोटी रुपये झाले आहे. त्यामुळे ‘आयपीएल’ने इंग्लिश प्रीमियर लीग (८५.९ कोटी रु.), मेजर लीग बेसबॉल (८५.९ कोटी रु.) आणि एनबीए (१५.६ कोटी रु.) या क्रीडा स्पर्धांना मागे टाकत दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे. या क्रमवारीत अमेरिकेची नॅशनल फुटबॉल लीग (१३२ कोटी रु.) अग्रेसर आहे.
‘आयपीएल’ प्रसारण हक्क लिलावात ‘डिजिटल क्रांती’ कशा रीतीने अधोरेखित झाली ?
ई-लिलावात टीव्ही प्रक्षेपणाच्या अ-विभागाला डिझ्नी-स्टारकडून २३,५७५ कोटी रुपये भाव मिळाला, तर डिजिटल प्रक्षेपणाचा ब-विभाग आणि निवडक सामन्यांच्या डिजिटल प्रक्षेपणाचा क-विभाग यांच्यासाठी रिलायन्सच्या व्हायाकॉम१८कडून एकूण २३,७५८ रुपयांची (ब आणि क विभाग) गुंतवणूक करण्यात आली. प्रति सामन्याच्या प्रक्षेपण मूल्याची तुलना केल्यास तिथेही डिजिटल मूल्य किंचित पुढे गेले आहे. टीव्ही प्रक्षेपणाचे प्रति सामन्याचे मूल्य ५७.४ कोटी रुपये आहे, तर डिजिटल प्रक्षेपणाचे मूल्य ५७.९८ कोटी रुपये (ब आणि क विभाग) आहे. २००८मध्ये जेव्हा प्रथमच ‘आयपीएल’ प्रसारण हक्क विकले गेले, तेव्हा डिजिटल प्रक्षेपणाला त्यात स्थान नव्हते. २०१७मध्ये झालेल्या १६,३४७ कोटी रुपयांच्या एकूण करारातील ३९०० कोटी रुपये म्हणजेच २५ टक्के रक्कम ही डिजिटल सामन्यांसाठीच्या प्रक्षेपणाची होती. ताज्या करारात टीव्ही प्रक्षेपणाचा वाटा ४९ टक्के आणि डिजिटल प्रक्षेपणाचा ५१ टक्के आहे. त्यामुळेच क्रिकेट प्रक्षेपणविश्वात ‘डिजिटल क्रांती’ दिसून आल्याचे ‘बीसीसीआय’चे सचिव जय शाह यांनी म्हटले आहे.
व्हायाकाॅम१८च्या तिहेरी यशात उदय शंकर यांची भूमिका कितपत महत्त्वाची होती?
पाच वर्षांपूर्वी स्टार इंडियाने सोनीची मक्तेदारी झुगारत ‘आयपीएल’चे प्रक्षेपण हक्क मिळवले, तेव्हा उदय शंकर यांची भूमिका महत्त्वाची होती. अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अशी पदे ते सांभाळत होते. ८ ऑक्टोबर २०२० रोजी त्यांनी डिझ्नी-स्टारच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. परंतु ‘आयपीएल’ प्रसारण हक्काचा ई-लिलाव होण्याआधी व्हायाकॉमच्या पाठीशी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रिजने बोधी ट्री सिस्टिम्सशी केलेला गुंतवणूक करार अत्यंत महत्त्वाचा ठरला. रुपर्ट मरडॉक यांचा मुलगा जेम्स संस्थापक असलेल्या या गुंतवणूक व्यवसाय उद्याेगात उदय शंकर आणि ल्युपा सिस्टिम्स हेसुद्धा हिस्सेदार आहेत. त्यामुळेच टीव्ही वगळता अन्य तीन विभागांतील प्रक्षेपण हक्क मिळवताना शंकर यांचा अनुभव आणि रणनीती उपयुक्त ठरली.
ट्वेन्टी-२० प्रकारात भारताची कामगिरी उंचावते आहे का?
‘आयपीएल’चे आकडे उंचावतायत, पण भारताची ट्वेन्टी-२० प्रकारातील कामगिरी मात्र तितकीशी समाधानकारक नाही. २००७मध्ये भारताने पहिली ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर पुढील वर्षी म्हणजे २००८मध्ये ‘आयपीएल’च्या अध्यायाला प्रारंभ झाला. ललित मोदी यांनी सादर केलेल्या कॉर्पोरेट स्पर्धेच्या पहिल्या योजनेपासून आतापर्यंत अनेक ‘आयपीएल’ पर्वांमध्ये स्पर्धा आणि तिचे अर्थकारण विकसित झाले. पण भारताने २०१४मध्ये उपविजेतेपद आणि २०१६मध्ये उपांत्य फेरी वगळता अन्य ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धांमध्ये दुसऱ्या फेरीतच गाशा गुंडाळला आहे.