संतोष प्रधान
आपल्या विचारांचे किंवा पक्षाचे सरकार प्रत्येक राज्यात असावे ही केंद्रातील सत्ताधारी पक्षाची अपेक्षा असते. काँग्रेस सरकारच्या काळात हाच विचार व्हायचा. भाजपनेही यावरच भर दिला आहे. झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस-राजद सरकार पाडण्यासाठी भाजपकडून विविध प्रलोभने दाखविली जात असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाकडून नेहमीच केला जातो. दोनच दिवसांपूर्वी पश्चिम बंगाल पोलिसांनी काँग्रेसच्या तीन आमदारांच्या वाहनाची झडती घेतली असता त्यात पैसे मिळाले. सरकार पाडण्यासाठी या तीन आमदारांनी भाजपकडून पैसे घेतल्याचा आरोप झाला. या प्रकारानंतर काँग्रेसने या तिन्ही आमदारांना पक्षातून निलंबित केले.
झारखंडमधील प्रकार नक्की काय आहे ?
झारखंड विधानसभेतील काँग्रेसचे तीन आमदार प्रवास करीत असलेले वाहन पश्चिम बंगालमध्ये पोलिसांनी अडविले असता त्यात बेहिशेबी ५० लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली. या रक्कमेबाबत हे आमदार खुलासा देऊ शकले नाहीत. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिश्व सरमा यांच्याकडून या आमदारांनी पैसे घेतल्याचा आरोप होत आहे. झारखंडमधील हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच भाग म्हणून हे आमदार पैसे घेऊन येत होते. या तिघांना पश्चिम बंगाल पोलिसांनी अटक केली. त्यानंतर काँग्रेसने या तिन्ही आमदारांना पक्षातून निलंबित केले. या प्रकरणी रांचीमध्ये आसामचे मुख्यमंत्री सरमा यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्रानंतर झारखंड असाही आरोप होत आहे, त्याबाबत…
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळले. गेल्या तीन-चार वर्षांत विरोधी पक्षांची सरकारे भाजपने पद्धतशीरपणे पाडली. मध्य प्रदेश, कर्नाटकात काँग्रेसमधील बंडामुळे सरकारे कोसळली. राजस्थानात सचिन पायलट यांचे बंड यशस्वी झाले नाही. त्यामुळे अशोक गहलोट यांच्या नेतृत्वाखालील सरकार तगले. पुण्डेचरीतील काँग्रेस सरकार आमदारांच्या बंडामुळे गडगडले होते. विरोधी पक्षाची सरकारे असलेल्या राज्यांमध्ये आमदारांचा गट फुटू शकतो का, कोण नेता बंड करू शकतो याचा बारीक अभ्यास भाजपच्या गोटातून केला जातो, या चर्चेत तथ्यही आहे. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांना वश करण्यात भाजपला यश आले. त्यांच्याबरोबर असणाऱ्या २२ आमदारांनी राजीनामा देताच काँग्रेसचे सरकार अल्पमतात गेले. कर्नाटकात कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील सरकार काँग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दलातील आमदारांच्या बंडानंतर पडले होते. राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांचे सरकार पडले. झारखंडमध्येही तीन पक्षांच्या सरकारमध्ये असलेल्या नाराजीचा लाभ उठविण्याचा प्रयत्न केला जात आहे. गोव्यात अलीकडेच काँग्रेसच्या दोन तृतीयांश आमदारांमध्ये फूट पाडून विरोधी पक्ष कमकुवत करण्याचा प्रयत्न काँग्रेस नेत्यांच्या सावध भूमिकेमुळे यशस्वी होऊ शकला नाही. पण त्यातून आमदारांमध्ये सारे काही आलबेल नाही हे स्पष्ट झाले.
काँग्रेसचे आमदारच गळाला कसे लागतात ?
नेतृत्वाच्या अभावी काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढत चालली आहे. लोकसभेपाठोपाठ विविध राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची पीछेहाटच होत आहे. भविष्यात निवडून येण्याची विरोधी व विशेषत: काँग्रेसच्या आमदारांना खात्री वाटत नाही. त्यातूनच भाजपच्या सापळ्यात हे आमदार अलगदपणे अडकतात हे अनुभवास येते. कर्नाटक, मध्य प्रदेश, पुण्डेचरी, अरुणाचल प्रदेश, गोवा (आधीच्या विधानसभेतील आमदार)आदी राज्यांतील काँग्रेस आमदारांना भाजपचे आकर्षण वाटले. त्यातच काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा धाक राहिलेला नाही. गोवा आणि झारखंड या लागोपाठ दोन घटनांवरून तरी काँग्रेसचे नेते बोध घेतील, ही अपेक्षा.