अभय नरहर जोशी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्या सौरमालेतील ग्रहांपैकी शनी हा इतर ग्रहांपेक्षा ‘हट के’ दिसणारा ग्रह. याचे कारण त्याच्याभोवती असलेले कडे. शनीची ही कडी त्याचे वेगळेपण आणि सौंदर्य अधोरेखित करतात. खगोलशास्त्रानुसार शनी हा सौरमालेतील गुरूनंतरचा आकारमानाने मोठा, दुसऱ्या क्रमांकाचा ग्रह. शनी त्याच्या अक्षाभोवती साधारण २८ अंशांनी कललेला असल्याने पृथ्वीवरून आपणास शनीची कडी व्यवस्थित दिसतात.

शनीच्या सौंदर्याला ‘दृष्ट’?

आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार शनी साडेसातीचा त्रास घेऊन येणाऱ्या या ग्रहाविषयी बरेच ‘पूर्वग्रह’ आहेत. काही राशींचा तो मित्रग्रह असला तरी अनेक राशींचा शत्रूग्रह असल्याने त्यांच्या राशीलाच तो लागतो. त्यामुळे त्याची भारी दहशत. पण या शनीलाच आता ‘साडेसाती’ लागण्याची चिन्हे आहेत. ज्या कड्यांमुळे त्याच्या सौंदर्यात भर पडली, ती शनीची कडीच नष्ट होण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे वृत्त आहे! दस्तुरखुद्द शनीच्या मागे ही साडेसाती लावणारा ग्रह कोणता, असा शोध घेतला असता त्यामागे ज्योतिषशास्त्रीय नव्हे तर खगोलशास्त्रीय कारण असल्याचे लक्षात आले.

किरणोत्सर्ग हे एक कारण…

शनीच्या या कड्यांमध्ये बर्फ, अवकाशातील खडकांचा समावेश आहे. गुलाबी, राखाडी आणि तपकिरी रंगांत दिसणारी ही कडी अवकाशातील अंधारात चमकताना दिसतात. त्यामुळे सुंदर दिसणारे शनिभाऊ दिमाखात शिष्टपणे मान वाकडी करून आपल्याकडे पाहत आहेत, असा भास होतो. लांबून त्यांनी असे पाहिले तर चालेल पण राशीत वाकडे शिरून साडेसाती आणू नका, एवढे मात्र वाटते… तर अशा या कड्यांशिवाय शनीच्या अस्तित्वाची कल्पनाच आपण करू शकत नाही. पण म्हणतात ना, ‘बदल हाच जगाचा स्थायिभाव’ आहे. सौरमालेतही सतत खगोलशास्त्रीय बदल घडतात. शनीभोवती ही कडी निर्माण होणे, ही जशी खगोलशास्त्रीय घटना आहे, तशीच ती संपण्याची प्रक्रिया, हीसुद्धा तशीच अपरिहार्य घटना आहे. या कड्यांमधील घटक दरवर्षी थोडे थोडे नष्ट होत आहेत. सूर्याचा किरणोत्सर्ग आणि अवकाशातील सूक्ष्म कणांमुळे या कड्यांची हानी होत आहे. त्यातील घटक कमी होत चाललेत.

बाष्पीभवनाने ‘कवचकुंडले’ हरपणार

या कड्यांतील घटक त्यामुळे रूपांतरित होऊन शनीच्या चुंबकीय क्षेत्रात शिरून अनिश्चित कक्षेत फिरू लागतात व शनीच्या वातावरणाच्या निकट आल्यावर शनीचे गुरुत्वाकर्षण त्यांना खेचून घेते. त्यानंतर शनीच्या वातावरणीय ढगांमध्ये या कड्यांतील घटकांचे बाष्पीभवन होऊन ते नष्ट होत चालले आहेत. खगोलशास्त्रज्ञ याला ‘रिंग रेन’ म्हणजे ‘कड्यांचा पाऊस’ असे संबोधत आहेत. कालांतराने शनीची ही ‘कवचकुंडले’ हरपणार असल्याने शनी हा कडे परिधान करणारा रुबाबदार शनी राहणार नाही. जाक्सा (JAXA) या जपानच्या अवकाश संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ जेम्स ओ’डोनोघ्यू यांच्या मते सध्या आपण शनीच्या कड्यांचा चांगला काळ अनुभवत आहोत. लांबून पाहताना शनीची ही कडी भव्य-सुंदर व अपरिवर्तनीय भासतात. परंतु, त्यांनाही भंगुरतेचा शाप लाभलाय.

संपूर्ण नष्ट व्हायला ३० कोटी वर्षे!

खगोलशास्त्रीय गणितानुसार शनीची कडी संपूर्ण नष्ट व्हायला, काही कोटी वर्षांचा अवधी आहे. तोपर्यंत आपण शनीचे कड्यांसह सौंदर्य अनुभवणार आहोत. जेम्स आणि इतर शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार शनीची ही कडी संपूर्ण नष्ट व्हायला, ३० कोटी वर्षे लागणार आहेत. पण त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु कड्यांच्या निर्मितीची व इतर इत्थंभूत माहिती शास्त्रज्ञांनाही अद्याप ठाऊक झालेली नाही. व्हॉयेजर उपग्रहाने शनीच्या टिपलेल्या कड्यांचा अभ्यास केल्यानंतर असे निदर्शनास आले, की या कड्यांचे वस्तुमान संशोधकांनी लावलेल्या अनुमानापेक्षा कमी आहे.

कडी काही कोटी वर्षांपूर्वीचीच

याचा अर्थ शनीची कडी ही काही अब्ज वर्षांपूर्वीची नसून, एक ते दहा कोटी वर्षांपूर्वी शनीभोवती ती निर्माण झाली आहेत. यापूर्वी ही कडी ४ अब्ज ६० लाख वर्षांपूर्वीची असावीत, असा कयास होता. पण नव्या अभ्यासानुसार ही कडी जास्तीत जास्त १० कोटी वर्षांपूर्वीची असल्याने खगोलशास्त्रीय संकल्पनेनुसार अलीकडच्या काळातील आहेत. म्हणजे सौरमाला तयार होताना शनीभोवती कडी नव्हती. म्हणजेच पृथ्वीवरील डायनासोरच्या काळात शनी बिनकड्याचाच होता, असे दिसते.

चंद्रामुळे कड्यांची निर्मिती?

शनीभोवती ही कडी कशी निर्माण झाली, यावर संशोधकांत एकमत नसले तरी ही कडी अलीकडच्या काळातील असल्याने काही शास्त्रज्ञ म्हणतात, की शनीच्या चंद्रांपैकी एक चंद्र शनीच्या खूप जवळ आल्याने त्याचे तुकडे होऊन ही कडी निर्माण झाली असावीत. थोडक्यात शनीने आपल्या चंद्रालाच कड्यात रूपांतरित करून परिधान केले, असे म्हणावे लागेल. हा छोटा चंद्र असावा. जेम्स यांच्या मतानुसार पृथ्वीचा चंद्र त्या तुलनेत एवढा मोठा आहे, की जर त्याचे असे झाले तर हजारो कडी पृथ्वीभोवती निर्माण होतील.

मंगळही कडे धारण करणार?

अवकाश हे नवनवीन नक्षीकाम करणारे कल्पक कलावंत आहे. गुरू, नेपच्युन, युरेनसलाही कडी आहेत. ती अस्पष्ट दिसतात. अवकाशातील या रचना सतत बदलत्या असतात. एका अभ्यासानुसार आपल्या मंगळाच्या ‘फोबॉस’ या लहान चंद्राचे दोन ते आठ कोटी वर्षांनी मंगळाच्या संपर्कात येऊन तुकडे होणार आहेत. ते तुकडे मंगळाभोवती कडी करण्याची शक्यता आहे. कल्पना करा… कडे असलेला मंगळ कसा लोभस तांबूस दिसेल.

कड्यांसाठी शनीचे कुणाला साकडे?

शनीभोवतीची ही कडी नष्ट व्हायला काही कोटी वर्षे लागणार असली, तरीही हे वृत्त खेद निर्माण करतेच. परंतु शास्त्रज्ञांना अशी आशा वाटते, की शनीचा दुसरा एखादा चंद्र किंवा एखादा धूमकेतू शनीच्या जवळ येऊन नवे कडे निर्माण करेल. मात्र, तोपर्यंत साडेसातीची अशी फळेच मिळू नयेत व आपले कडे नष्ट न होण्यासाठी शनी कुणाला बरे साकडे घालणार?

abhay.joshi@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained is saturn losing its ring print exp sgy