संजय जाधव
सध्या जगभरात करोना विषाणूचा उपप्रकार बीए.२.८६ वेगाने फैलावत आहे. पिरोला नावाने हा उपप्रकार ओळखला जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सार्स-कोव्ह-२च्या या उपप्रकारावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) या संस्थेनेही हा उपप्रकार निरीक्षणाच्या यादीत समाविष्ट केला. या संस्थेने १९ ऑगस्टपर्यंत पिरोलाचे केवळ सात रुग्ण नोंदविले होते. तरीही हा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिकेसह डेन्मार्क, इस्रायल आणि ब्रिटनमध्ये हा उपप्रकार आढळून आला आहे. यामुळे जगभरातील आरोग्य यंत्रणा दक्ष झाल्या आहेत. हा पिरोला उपप्रकार किती घातक आहे, याचा आढावा..
पिरोला म्हणजे काय?
करोना विषाणूचा उपप्रकार बीए.२.८६ चे पिरोला हे नामकरण करण्यात आले आहे. ओमायक्रॉन प्रकारातील हा विषाणू आहे. आतापर्यंत ओमायक्रॉन प्रकारातील एक हजार ६८० विषाणू उपप्रकार आढळले आहेत. पिरोला त्यांपैकीच एक आहे. असे असले तरी तो ओमायक्रॉन बीए.२ चा उपप्रकार आहे. विशेष म्हणजे, ओमायक्रॉन बीए.२ सध्या सक्रिय नसून, त्याचे रुग्णही आढळत नाहीत. या उपप्रकाराचे २०२१ च्या अखेर आणि २०२२ च्या सुरुवातीला मोठय़ा संख्येने रुग्ण आढळले होते. त्याचाच हा प्रकार असल्याने त्यापासून संसर्ग अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
हेही वाचा >>>‘सनातन’ वाद; ‘द्रमुक’ पक्षाचा इतिहास काय? पेरियार यांनीही केली होती हिंदू धर्मावर टीका
संसर्ग अधिक वाढण्याची कारणे कोणती?
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, पिरोलात ३० स्पाईक प्रोटीनमध्ये बदल झालेले आहेत. ते एक्सबीबी.१.५ या उपप्रकारापेक्षा वेगळे आहेत. पिरोला हा मानवी प्रतिकारशक्तीचा बचाव भेदण्यास अधिक सक्षम आहे. सध्या संसर्गास कारणीभूत असलेल्या ओमायक्रॉनच्या इतर उपप्रकारांपेक्षा तो अधिक संसर्गजन्य आहे. सध्या असलेले हे उपप्रकार प्रामुख्याने बीए.२.८६ आहेत. पिरोला मात्र, २०२२ च्या सुरुवातीला सक्रिय असलेल्या बीए.२ चा उपप्रकार आहे. तो ओमायक्रॉन बी.१.१.५२९ या मूळ विषाणू उपप्रकारापासून बनलेला असावा, अशी शक्यता आहे.
लक्षणे कोणती आहेत?
पिरोलाच्या रुग्णांमध्ये प्रामुख्याने करोनाची सर्वसाधारण लक्षणे दिसून येत आहेत. त्यात नाकातून पाणी येणे, डोकेदुखी, थकवा, वारंवार शिंका येणे, घसा दुखणे, खोकला आणि वास येणे बंद होणे अशा लक्षणांचा समावेश आहे. त्यामुळे ही लक्षणे दिसून आल्यास तातडीने तपासणी करून घेण्याची आवश्यकता आहे. त्याच वेळी वेगळी लक्षणे दिसून येत नसल्यामुळे रुग्णांच्या नमुन्यांची जनुकीय तपासणी केल्याशिवाय या उपप्रकाराचे अस्तित्व समोर येत नाही, ही अडचणही आहे.
हेही वाचा >>>उदयनिधींचे ‘सनातन धर्मा’वरील विधान काँग्रेससाठी अडचणीचे ठरणार? जाणून घ्या …
सध्याची लस प्रभावी ठरणार का?
पिरोला हा मागील काही महिन्यांपासून सक्रिय असल्याची नोंद काही संशोधन पत्रिकांनी केली आहे. बीए.२ पेक्षा एक्सबीबी.१.५ हा अँटीबॉडीजला जास्त प्रमाणात हुलकावणी देत होता. त्यापेक्षाही पिरोला अँटीबॉडीजला अधिक हुलकावणी देत आहे. त्यामुळे त्याच्या संसर्गाची गांभीर्याने दखल घेऊन त्यावर बारकाईने लक्ष ठेवायला हवे, असे अमेरिकेतील फ्रेड हचिन्सन कॅन्सर रिसर्च इन्स्टिटय़ूटमधील तज्ज्ञांचे मत आहे. जनुकीय बदलामुळे बीए.२.८६ ला विशिष्ट प्रकारचे गुणधर्म मिळाले असून, त्यामुळे संसर्गात वाढ होण्याची भीती आहे. असे असले, तरी लशीमुळे निर्माण झालेली प्रतिकारशक्ती काही प्रमाणात या विषाणूच्या संसर्गाचा धोका कमी करू शकते, कारण त्यामुळे संसर्ग झाला, तरी त्याचे प्रमाण गंभीर नसेल, असा दावाही तज्ज्ञांनी केला आहे.
काय काळजी घ्यावी?
लक्षणे दिसून आल्यानंतर घरातच विलगीकरणात राहावे. घरातील हवा खेळती राहील, याची काळजी घ्यावी. इतर व्यक्तींच्या संपर्कात रुग्ण येणार असेल, तर त्याने एन-९५ अथवा इतर उच्च दर्जाचे मास्क वापरावेत. करोना लस आणि बूस्टर डोस वेळेवर घ्यावेत. लक्षणे दिसताच आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार औषधे घेऊन उपचार करावेत. जास्तीत जास्त आराम करावा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, काही त्रास होतोय म्हणून परस्पर औषधे घेणे टाळावे. वारंवार हात धुणे, पृष्ठभाग स्वच्छ करणे यासह स्वच्छतेच्या इतर उपाययोजना कराव्यात.
हेही वाचा >>>कमळ, पृथ्वी अन् वसुधैव कुटुंबकम! जी-२० बैठकीच्या लोगोचा अर्थ काय?
भारतात काय स्थिती?
जगभरात सध्या ओमायक्रॉनचे उपप्रकार एरीस आणि पिरोला यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. एरीसचे रुग्ण भारतात आढळले असले, तरी त्यामुळे संसर्गात फार वाढ झालेली नाही. पिरोलाचा रुग्ण अद्याप भारतात आढळला नाही. तरीही जागतिक पातळीवर वाढलेल्या करोना संसर्गामुळे तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाचे प्रधान सचिव पी. के. मिश्रा यांनी नुकतीच बैठक घेतली. त्यात त्यांनी विषाणूच्या नवीन उपप्रकारांची जनुकीय तपासणी करण्यावर भर दिला. जगभरात संसर्ग वाढविणाऱ्या उपप्रकारांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. त्यामुळे भारताने याबाबत खबरदारी घेण्याची पावले उचलल्याचे दिसून येत आहे.