अन्वय सावंत
भारताचा युवा चालक जेहान दारुवालाने फॉर्म्युला-१ स्पर्धेतील पदार्पणाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले असून आघाडीचा संघ मक्लॅरेनने त्याला दोन दिवसीय चाचणीमध्ये आपली कार चालवण्याची संधी दिली आहे. २३ वर्षीय मुंबईकर जेहानने यंदा फॉर्म्युला-२ स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळेच फॉर्म्युला-१ मधील संघ मक्लॅरेनने त्याला ‘एमसीएल३५’ कारच्या चाचणीसाठी आमंत्रण दिले. मात्र, त्याला ही संधी कशी मिळाली आणि भारताच्या दृष्टीने याचे महत्त्व काय, याचा घेतलेला आढावा.
जेहानच्या कारकीर्दीची सुरुवात कशी झाली?
जेहानने २०११मध्ये वयाच्या १३व्या वर्षी कार्टिंग शर्यतींमार्फत आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. २०१२मध्ये त्याने आशिया-पॅसिफिक अजिंक्यपद, तर २०१३मध्ये सुपर-१ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धांचे जेतेपद पटकावले. तसेच २०१४मध्ये त्याने जागतिक कार्टिंग अजिंक्यपद स्पर्धेतही तिसरे स्थान मिळवले. त्यामुळे त्याला पुढचा टप्पा गाठण्याची संधी मिळाली. मग २०१५मध्ये त्याने फॉर्म्युला रेनॉ २.० अजिंक्यपद स्पर्धेत फोर्टेक मोटरस्पोर्ट संघाचे प्रतिनिधित्व करताना तीन वेळा अव्वल तीन चालकांमध्ये स्थान पटकावले. पुढील वर्षी त्याने संघ बदलताना जोसेफ कॉफमन रेसिंगचे प्रतिनिधित्व केले. हंगेरी येथे झालेल्या शर्यतीत त्याने नॉर्दर्न युरोपीय चषकातील पहिला विजय संपादला. पुढे २०१६च्या हंगामात टोयोटा रेसिंग सिरीजमध्ये त्याने तीन विजय आणि तीन अव्वल स्थानांसह एकूण स्पर्धेचे उपविजेतेपद मिळवले. त्यानंतर त्याने आपली प्रगती सुरू ठेवताना युरोपियन फॉर्म्युला-३ अजिंक्यपद, ‘एफआयए’ फॉर्म्युला-३ अजिंक्यपद आणि मग ‘एफआयए’ फॉर्म्युला-२ अजिंक्यपद स्पर्धांचा टप्पा गाठला.
यंदाच्या हंगामातील कामगिरी कशी आहे?
जेहानने फॉर्म्युला-२ स्पर्धेच्या २०२० आणि २०२१च्या हंगामात कार्लिन संघाचे प्रतिनिधित्व केले. तसेच त्याचा रेड बुलच्या कनिष्ठ संघातही समावेश करण्यात आला. फॉर्म्युला-२ स्पर्धेतील २०२०च्या हंगामात एकूण ७२ गुणांसह १२वे स्थान मिळवल्यानंतर त्याने कामगिरीत सुधारणा करत २०२१मध्ये ११३ गुणांसह सातवे स्थान कमावले. २०२२च्या हंगामासाठी त्याने प्रेमा पॉवरटीम या गतविजेत्या संघात प्रवेश केला. फॉर्म्युला-१ स्पर्धेत सहभागी होण्याच्या स्वप्नपूर्तीसाठी या हंगामात दर्जेदार कामगिरी करणे गरजेचे असल्याचे जेहानने म्हटले होते. त्याने आतापर्यंतच्या १२ शर्यतींमध्ये अप्रतिम कामगिरी करताना पाच वेळा अव्वल तीन चालकांमध्ये स्थान मिळवले. त्यामुळे अजिंक्यपदाच्या गुणतालिकेत तो सध्या ७३ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. याच कामगिरीमुळे त्याला मक्लॅरेनने दोन दिवसीय चाचणीमध्ये आपली कार चालवण्याची संधी दिली.
भारतासाठी महत्त्व काय?
जेहानने मंगळवार आणि बुधवारी (२१ व २२ जून) इंग्लंडमधील सिल्व्हरस्टोन रेसिंग ट्रॅकवर मक्लॅरेनच्या कारची चाचणी केली. जेहानने या दोन दिवसीय चाचणीमध्ये अपेक्षित कामगिरी केली असल्यास, तसेच फॉर्म्युला-२ मधील कामगिरीत सातत्य राखण्यात यश आल्यास त्याला फॉर्म्युला-१मध्ये पदार्पणाची संधी निर्माण होऊ शकेल. तसे झाल्यास फॉर्म्युला-१ स्पर्धेत सहभागी होणारा तो नारायण कार्तिकेयन आणि करुण चंडोकनंतरचा केवळ तिसरा भारतीय ठरेल.
फॉर्म्युला-१मध्ये पदार्पणाची संधी कधी मिळू शकेल?
फॉर्म्युला-१ स्पर्धेत पदार्पणासाठी जेहानला काही काळ वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. जेहान यंदा फॉर्म्युला-२ स्पर्धेत रेड बुलचा कनिष्ठ गटातील सर्वोत्तम चालक असला, तरी त्याला पुढील वर्षी रेड बुलच्या मुख्य संघात प्रवेश मिळणे अवघड आहे. फॉर्म्युला-१ स्पर्धेत सध्या विश्वविजेता मॅक्स व्हेर्स्टापेन आणि सर्जिओ पेरेझ हे दोन चालक रेड बुल संघाचे प्रतिनिधित्व करत असून अजिंक्यपदाच्या गुणतालिकेत ते अव्वल दोन स्थानांवर आहेत. तसेच रेड बुल समूहाचा भाग असलेल्या अल्फाटोराय संघाने फ्रान्सच्या पिएर गॅस्लेला पुढील हंगामासाठी करारबद्ध केले आहे. दुसरा चालक म्हणून जपानचा युकी सुनोदा संघात कायम राहणे अपेक्षित आहे. मात्र, जेहानने यंदा फॉर्म्युला-२ स्पर्धेचे जेतेपद पटकावल्यास अन्य संघ त्याला संधी देण्याबाबत विचार करण्याची शक्यताही नाकारता येत नाही.