राखी चव्हाण
भारतात कांगारू रस्त्यावर फिरताना दिसतात त्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे, पण पश्चिम बंगालच्या जलपायगुडी जिल्ह्यात नुकतेच कांगारू रस्त्यावर फिरताना आढळले. समाजमाध्यमावर त्याच्या चित्रफितीचा प्रसार झाल्यानंतर वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी जलपायगुडी आणि सिलीगुडी येथून दोन कांगारूंना ताब्यात घेतले. यात एका कांगारूच्या पिलाचा मृतदेह देखील आढळला. दोन कांगारूच्या शरीरावर जखमा आढळून आल्या. त्यामुळे भारतातील कांगारूच्या तस्करीवर शिक्कामोर्तब झाले.
ऑस्ट्रेलियात आढळणारे कांगारू भारतात कसे?
ऑस्ट्रेलिया आणि न्यूगिनी या छोट्या देशात कांगारू आढळतात. तस्करीच्या माध्यमातून ते दक्षिण आशिया खंडातील काही देशांमध्ये आणले जात असल्याची शंका आहे. या देशांमध्ये फार्म हाऊसमध्ये कांगारू पाळले जातात आणि वाढत्या मागणीनुसार त्यांचा पुरवठा केला जातो. तेथून त्यांची तस्करी भारतात होत असावी, असा वन खात्याचा कयास आहे. मागील वर्षी आसाममध्ये सिल्चरजवळ एका कांगारूला पकडण्यात आले, त्यालाही तस्करीच्या माध्यमातून भारतात आणले गेल्याचे नंतर तपासात निष्पन्न झाले.
विदेशी प्राणी का पाळले जातात?
विदेशी आणि धोकादायक प्राणी करमणुकीसाठी पाळण्याचा पायंडा आता भारतात रूढ होत चालला आहे. आधी श्वान, मासे, पोपट यांच्या विदेशी प्रजाती लोक पाळायचे. आता कासव, साप, शहामृग, कांगारूदेखील पाळले जातात. त्यासाठी या प्राण्यांची तस्करी केली जात आहे. ही प्रथा पाश्चिमात्य देशांमध्ये प्रचलित आहे. आता त्याची लागण भारतातही झाल्याचे या घटनांमधून दिसून आले आहे.
प्राण्यांची तस्करी कुठून होते?
भारतात समुद्रामार्गे, हवाईमार्गे किंवा नेपाळ, बांगलादेश, ईशान्य क्षेत्राच्या सीमेवरून प्राण्यांची तस्करी केली जाते. ही तस्करी थांबवण्यासाठी सीमाशुल्क विभाग व विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांना सरकारने याआधीच सतर्क केले आहे. ‘ट्रॅफिक’(ट्रेड रेकॉर्डस ॲनालिसिस फॉर फ्लोरा अँड फाैना इन कॉमर्स) आणि ‘यूएनईपी’(युनायटेड नेशन्स एन्वायर्नमेंट प्रोग्राम) सोबत मिळून यासाठी एक कार्ययोजना तयार करण्यात आली आहे, जेणेकरून तस्करीला आळा घालता येईल.
तस्करीला आळा घालण्यात कायद्याची भूमिका काय?
विदेशी प्राण्यांच्या तस्करीला अजूनही केंद्र सरकारला आळा घालत आला नाही, याला कारण सद्यःस्थितीत असलेला कायदा. घरून हे प्राणी जप्त करता येतील अशी तरतूद वन्यजीव संरक्षण कायद्यात नाही. त्यामुळे सीमाशुल्क खाते आंतरदेशीय सीमेवरून हे प्राणी जप्त करू शकतात. मात्र, सरकार आता वन्यजीव कायद्यात बदल करत असून त्यामुळे हे प्राणी जप्त करणे सोपे होऊ शकेल.
विदेशी प्राण्यांच्या तस्करीत धोका कोणता?
तस्करीच्या माध्यमातून येणाऱ्या विदेशी प्राण्यांपासून अनेक आजार पसरण्याचा धोका आहे. प्रामुख्याने प्राण्यांमधून माणसांमध्ये संक्रमित होणाऱ्या आजारांचा धोका जास्त आहे. कांगारूसारखे प्राणी भारतात आढळून येत नाही. त्यामुळे दुसऱ्या प्रदेशातून धोकादायक विषाणू आपल्या देशात पोहोचू शकतात. कांगारूपासून हा धोका नाही. कारण हा मोठा प्राणी आहे आणि सहजरित्या दिसून येतो. मात्र, असे अनेक प्राणी आहेत, जे येथील जैवयंत्रणेला धोका पोहचवू शकतात. चंडीगडच्या सुखना तलावात काही अमेरिकन कासवांना सोडण्यात आले. आता त्यांच्यामुळे स्थानिक कासवांच्या प्रजाती धोक्यात आल्या आहेत.
सर्वाधिक तस्करी कोणत्या प्राण्यांची?
तस्करी होणाऱ्या प्राण्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर खवले मांजर आणि दुसऱ्या क्रमांकावर कासव आहे. प्रामुख्याने निरुपद्रवी असणाऱ्या प्राण्यांचीच तस्करी जास्त होते. या दोन्ही प्राण्यांच्या तस्करीमागे अंधश्रद्धा हे प्रमुख कारण आहे.
rakhi.chavhan@expressindia.com